श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती
सद्गुरू श्रीअनिरुद्धांनी ६ मे २०१० साली रामराज्यावरील प्रवचनामध्ये आपल्या समाजात, आपल्या आयुष्यात रामराज्य आणण्यासाठी श्रद्धावानांना मार्गदर्शन केले होते.
‘रामराज्य म्हणजे रामाने अयोध्येत चालवले तसं राज्य. अयोध्येतले नागरिक जसे होते, तसे सर्वांनी बनणे, तशी समाज व्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती तशी तयार होणे, तसा समष्टीचा प्रतिसाद येणे म्हणजे रामराज्य’ असे सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणाले होते. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर रामराज्य आणण्यासाठी बापूंनी काही उपक्रमांची घोषणा केली होती. तसेच वैयक्तिक पातळीवर काही उपासना व गोष्टीही करण्यास सांगितल्या होत्या. यामध्ये स्त्री आणि पुरुषांसाठीच्या प्रपत्तीचा समावेश होता.
“प्रपत्तीचा अर्थ होतो, ‘आपत्तिनिवारण करणारी शरणागती’. शरण जाण्याची क्रिया म्हणजे आदिमाता चण्डिकेला व तिच्या पुत्राला म्हणजे त्रिविक्रमाला ’तुम बिन कौन सहारा’, ’तूच एकमेव आधार’, ’अनन्यभाव’, ’पूर्ण प्रामाणिकपणा’ ह्या निष्ठेने शरणागत असणे. श्रीगुरुक्षेत्रम् मंत्राचा विश्वासपूर्वक स्विकार करून नित्य म्हणण्याने ती ’नित्यप्रपत्ती’ होते. ’नैमित्तिकप्रपत्ती’ म्हणजे पुरुषांसाठी असलेली ’रणचण्डिका प्रपत्ती’ व महिलांसाठी असलेली ’श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती’. या प्रपत्ती प्रत्येक श्रद्धावान पुरुष व स्त्रिला प्रापंचिक व आध्यात्मिक स्तरावर एक पराक्रमी सैनिक बनविते” असे बापू म्हणाले होते. श्रावणी सोमवार रोजी ही रणचण्डिका ही प्रपत्ती केली जात असे. ’श्रावणतल्या कोणत्याही एका सोमवारी ही प्रपत्ती श्रद्वावान पुरुष करू शकतात. दोन सोमवारी केली तर अधिक चांगले आणि सर्व सोमवारी केली तर अधिक आनंद आहे, पण निदान एक सोमवारी तरी करा’ असे बापू म्हणाले होते.
स्त्रिया व पुरुषांची ग्रहणक्षमता भिन्न भिन्न आहे. तो निसर्गानेच केलेला बदल आहे. त्यामुळे पुरुषांना श्रावण महिन्यात येणारे सोमवार तर स्त्रियांना फक्त मकरसंक्रांतीच्या एकाच दिवशी प्रपत्ती दिली गेली आहे.
पुढे पुरुषांसाठीच्या रणचण्डिका प्रपत्तीत बापूंनी काळानुरुप बदल केले व ही रणचण्डिका प्रपत्ती आता ‘महादुर्गेश्वर प्रपत्ती’ झाली. श्रावणी सोमवारी शिवशंकराबरोबर नृसिंह अवताराच्या पूजेचाही मान असतो. बापू त्यांच्या रामराज्याच्या प्रवचनात म्हणतात की प्रत्येक पुरुषाची त्रिविक्रम हाच नृसिंह आहे ही श्रद्धा असली पाहिजे. या त्रिविक्रमाच्या प्रतिमेचे पूजन महादुर्गेश्वर प्रपत्तीमध्ये केले जाते. तसेच त्रिविक्रमाच्या मागे चण्डिकाकुलाची तसबीर मांडणीमध्ये लावली जाते. श्रीचण्डिकाकुलाच्या तसबिरीत श्रीहनुमंतापुढे विराजमान असणारे ‘शिवलिंग’ हे हनुमंताचे ‘आत्मलिंग’ अर्थात् श्रीमहादुर्गेश्वरच आहे. श्रीचण्डिकाकुलाच्या तसबिरीतच श्रीमहादुर्गेश्वर विराजमान आहेतच आणि म्हणूनच महादुर्गेश्वर प्रपत्तीसमयी श्रीचण्डिकाकुलाची तसबीर मांडणीत ठेवण्यात येते. ही प्रपत्ती शक्यतो सामूहिकरित्या करावी; मात्र जर तसे शक्य नसेल तर एकट्याने केली तरी चालू शकेल.
श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती कशी करावी?
श्रद्धावान पुरुषांनी एकत्र येऊन सूर्यास्तानंतर ही प्रपत्ती करावी. श्रद्धावानाच्या वेषात (सफेद शर्ट, लुंगी व उपरणे) ही प्रपत्ती केली जाते. ५ वेळा श्रीगुरुक्षेत्रम् मंत्राने सुरुवात केल्यानंतर महादुर्गेश्वराचा जप ११ वेळा घेण्यात येतो. त्यानंतर श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती कथेचे वाचन करण्यात येते. अतिशय सुंदर भक्तिभावपूर्ण अशी ही कथा आहे. श्रावणी सोमवारी केल्या जाणार्या या प्रपत्तीचे महत्त्व व ही प्रपत्ती केल्यानंतर काय बदल घडून येतात, हे ही कथा आपल्याला सांगते. सर्व प्रकारचे बल प्रदान करणारी ही कथा आहे.
त्यानंतर द्वादश-ज्योतिर्लिंग आरती म्हटली जाते. यावेळेस श्रद्धावान सामग्रीसह तबक ओवाळून आरती करतात. आरती झाल्यावर श्रद्धावान ’बम् बम् भोलेनाथ बम् बम् भोले’ हा गजर करीत मांडणीच्या भोवती १२ प्रदक्षिणा घालतात. या गजरातील हे बं बीज विकासाचं बीज आहे, बलचं बीज आहे, अनुग्रहाचं बीज आहे आणि याची शास्ता बलगंगागौरी म्हणजेच शिवगंगागौरी आहे जी सर्व अरिष्टांचे स्तंभन करते. त्यानंतर त्रिविक्रमाला पांढरी व पिवळी फुले अर्पण करण्यात येतात व नंतर अक्षता अर्पण करून हात जोडून नमस्कार करण्यात येतो.
या प्रपत्तीची अधिक माहिती श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती या पुस्तकात मिळू शकेल.