सच्चिदानंद उत्सव

श्रीराम वनवासात असताना आपल्या प्रिय जेष्ठ बंधूस अयोध्येस परत आणण्यासाठी भरत चित्रकूट पर्वतावर पोहोचले. यावेळी झालेल्या श्रीराम-भरत भेटीची ही कथा संपूर्ण भारतात नेहमी प्रेमपूर्वक श्रवण केली जाते. आपल्या पित्याने माता कैकयीस दिलेल्या वचनाचे पालन करण्याबद्दल स्वत:स बांधील मानून श्रीराम भरताला अयोध्येस येण्यास नकार देतात आणि भरताला प्रेमपूर्वक उपदेश करून अयोध्येस परत जाऊन आपले कर्तव्य पार पाडण्यास सांगतात. श्रीरामांच्या आज्ञेचे जड अंत:करणाने पालन करण्यासाठी अयोध्येकडे निघालेला भरत श्रीरामांच्या पायावर आपले मस्तक ठेवतात. त्यांच्या अश्रूंनी श्रीरामांचे चरण ओलेचिंब होतात.

भरतास श्रीरामांच्या चरणांपासून दूर करणे शक्य नाही, हे परमकृपाळू लक्ष्मण व वात्सल्यमूर्ती जानकी जाणून होते. म्हणून ते भरताला श्रीरामांच्या पादुका बरोबर घेऊन जाण्यास सांगतात. हेच ते विश्‍वातील परमात्म्याच्या पादुकांचे पहिले पादुकापूजन. पादुकापूजन म्हणजे श्रद्धावानांना आपल्या सद्गुरुप्रती असलेल्या कृतज्ञतेचा अंबज्ञतेचा भाव व्यक्त करण्याची अनोखी संधी.

मार्गशीर्ष महिना हा पवित्र आणि श्रेष्ठ महिना मानला जातो. या महिन्यात श्रध्दावान प्रेमाने दीड किंवा पाच दिवस ‘सच्चिदानंदोत्सव’ साजरा करतात. या उत्सवात रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या सद्‌गुरुंच्या पादुकांचे पूजन श्रद्धावान आपल्या घरी भक्तिभावाने करतात.

सच्चिदानंदोत्सव कसा साजरा केला जातो?

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसर्‍या शनिवारपासून हा सच्चिदानंदोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. सच्चिदानंदोत्सवाच्या पहिल्या दिवशी पादुकांची प्रतिष्ठापना पूजा संपन्न झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी व पादुका घरी असेपर्यंत (२ किंवा ५ दिवस) नित्य पूजा करण्यात येते. तसेच ज्या दिवशी पादुकांचे विसर्जन करायचे आहे, त्या दिवशी ‘पुनर्मिलाप आवाहन’ अर्थात श्रीसद्गुरुंचे अस्तित्व पुढील वर्षभर घरात रहावे म्हणून पुनर्मिलापासाठी निघण्यापूर्वी पूजन केले जाते. याबद्दलची सर्व माहिती ‘सच्चिदानंदोत्सव’ या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

सच्चिदानंदोत्सवाचे लाभ

श्रद्धावानांच्या जीवनात प्रेमभाव, कृतज्ञताभाव आणि शारण्यभाव वाढत रहावा, हा सच्चिदानंदोत्सव साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

मार्गशीर्ष महिन्यातल्या पादुकापूजनाने श्रद्धावानांचा मार्ग, विकासमार्ग, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो.

श्रद्धावान प्रेमाने पादुका पूजन करतात तेव्हा हे पूजन त्यांच्या देहातील मन, प्राण आणि प्रज्ञा ह्या तीनही स्तरांवरील अनुचितता दूर करून श्रद्धावानांचा समग्र विकास घडवून आणून आनंद प्रदान करते.

सच्चिदानंदोत्सवातील अनिरुद्ध-अथर्वस्तोत्र श्रद्धावानांमधील चंचलतेचा नाश करून गुरुतेज प्रदान करते. सच्चिदानंदोत्सव श्रध्दावानांना चंचलतेकडून गुरुत्वाकडे घेऊन जातो, अस्थिरतेकडून स्थैर्याकडे घेऊन जातो, क्लेशाकडून आनंदाकडे घेऊन जातो.

भक्तीमार्गावरील प्रवासात श्रद्धावानांचा प्रपंच व परमार्थ एकाच वेळेस सुखाचा होण्यासाठी मन, प्राण आणि प्रज्ञा ह्या तिन्ही स्तरांवर उचितत्व कायम राहणे महत्वाचे असते. सच्चिदानंदोत्सवात श्रद्धावान अनिरुद्ध-अथर्वस्तोत्र आणि अनिरुद्ध अष्टोत्तरशत-नामावलि यांसह सद्‌गुरुंच्या पादुकांचे पूजन करून हे उचितत्व साध्य व्हावे म्हणून सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांची प्रार्थना करतात.

‘जो कोणी सदगुरुंच्या पादुका आपल्या घरी आणून पूजन करतो, त्याची प्रगती कलि थांबवू शकत नाही’, असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.