अनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)

शेतकऱ्यांच्या उत्कर्षाशिवाय ग्रामविकास साध्य होणार नाही. म्हणूनच गावातील उपेक्षित शेतकऱ्यांचा विकास घडवून आणण्यासाठी या शेतकऱ्यांकडे असलेल्या ताकदीची (साधनांची) जाणीव करून देणे व त्याला स्वावलंबी बनविणे, यासाठी डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी ६ मे २०१० साली ’अनिरुद्धाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास’ म्हणजेच ‘ए.आय.जी.व्ही.’ची स्थापना केली.

गावातील उपेक्षित कष्टकरी शेतकरी समाजाला मदत करणे हा ‘ए.आय.जी.व्ही.’ चा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पादन वाढविणे हे महत्त्वाचे आहेच. पण त्याहीपेक्षा या शेतीसाठी त्यांना येणार्‍या उत्पादनाचा खर्च कमी करणे व वैयक्तिक घरच्या गरजा बिनखर्ची भागविणे हे जास्त महत्त्वाचे आहे तसेच लहान-लहान योजना राबवत बळीराजाची प्रगती साधणे हे ‘ए.आय.जी.व्ही.’चे मुख्य उद्दिष्ट आहे.

यासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापूंनी) मुंबईपासून जवळ अंतरावर असलेल्या कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथील संस्थेच्या ‘श्रीगोविद्यापीठम्’ या जागेची निवड केली.

या ग्रामविकासातील पहिला आणि सोपा उपाय म्हणजे ‘परसबाग.’ परसबागेत आपल्याकडील उपलब्ध जागेत घरातील साधनसामग्री, स्वयंपाकातील पाणी यांचा सुयोग्य वापर करून रोजच्या आहारात लागणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या यांची ऋतुमानाप्रमाणे नियोजित लागवड करता येते. गावात मागच्या अंगणात अथवा घरासमोर असणार्‍या छोट्याशा जागेत तर शहरात हीच परसबाग स्वयंपाक घरात म्हणजेच किचन गार्डन, तर गच्चीवर म्हणजेच टेरेस गार्डन म्हणून प्रचलित आहे.

ए.आय.जी.व्ही. अंतर्गत गोविद्यापीठम् येथे अनेक उपक्रम राबविण्यात आले. प्रायोगिक तत्वावर काही गोष्टी सुरू करण्यात आल्या. २०१३ सालापासून  गोविद्यापीठम् येथे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या कालावधीत सेंद्रीयशेती व पशुपालन यांचे वर्ग घेतले जातात. या निवासी पदविका वर्गात उपलब्ध साधनांतून संपन्नतेकडे नेणारी कमी खर्चाची, बिनविषारी शाश्वत शेतीपद्धती प्रात्यक्षिकांसह शिकविण्यात येते.

या पदविका वर्गात आतापर्यंत मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद इत्यादी भागातून अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत व जवळील ग्रामीण भागात हे ग्रामविकासाचे कार्य पुढे नेण्यात येत आहे. तसेच संस्थेचे कार्यकर्ते ग्रामीण भागात जाऊन परसबाग, गांडूळ खत असे १/२ दिवसांचे Crash Course सुद्धा घेत आहेत. शेतकर्‍याकडे असलेली जमीन, पाणी, पशूधन या उपलब्ध साधनसंपत्तीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे तंत्र शेतकर्‍यांना शिकविण्याचे काम ए.आय.जी.व्ही. मार्फत सुरू आहे.

ए.आय.जी.व्ही. मध्ये सेंद्रीय शेती पद्धती अवलंबिण्यात येते. त्यामुळे रासायनिक खते व किटकनाशके यावरील खर्च वाचतो. गांडूळखत, शेणखत, सोनखत, कंपोस्टखत बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आवश्यक असणारा निमार्क, दशपर्णीअर्क, जीवामृत, बीजामृत बनविण्यासाठी शिकवले जाते. तसेच या ठिकाणी अजोला (Azolla) प्रकल्प उभारला आहे ज्यामुळे शेतीला खत व गुरांना चारा मिळतो.

वनीकरणामध्ये उपयुक्त झाडांची माहिती दिली जाते. जी झाडे रेताड जमिनीत लावली असता दुष्काळी जमिनीचे रुपांतर सुपीक जमिनीमध्ये करतात, जमिनीची धूप थांबवितात तसेच जमिनीतील पाणी धरून ठेवतात, अशा झाडांचे ज्ञान आणि त्यांचे रोपण कसे करायची ती माहिती येथे दिली जाते.

पशुपालन अंतर्गत गायी, म्हशी, शेळीपालनाबरोबरच कुक्कुटपालन, बटेरपालन, ससेपालन यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येते. ज्यात त्यांच्या आहारापासून स्वच्छता व आरोग्यविमा पर्यंत सर्व माहिती पुरविण्यात येते. शेतीबरोबरच ‘ए.आय.जी.व्ही.’मध्ये शिकविल्या जाणार्‍या या जोड व्यवसायामुळे लाभ मिळणार्‍यांची संख्या वाढत आहे

नुकतेच मातीविना शेती म्हणजेच हायड्रोपोनिक्स (Hydroponics) या तंत्रज्ञानाचा वापर करून गायी-म्हशींना वर्षभर हिरवा व पौष्टिक चारा मिळावा यासाठी हरीतगृह अत्यंत कमी खर्चात यशस्वीरीत्या उभारले आहे. सेंद्रिय शेती अंतर्गत केळी, पपई, कलिंगड, भोपळा, आले, हळद, स्ट्रॉबेरी यांचेही उत्पादन घेण्यात येते. येथे विविध प्रयोग व संशोधन करून घेण्यात आलेली फळे व भाज्या आकाराने मोठ्या आहे. शेतकर्‍यांना असे प्रयोग भरपूर उत्पन्नासाठी फायदेशीर ठरू शकतात.

‘Common Interest of Common Man’ या डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या तत्वानुसार आपले ‘ए.आय.जी.व्ही.’चे कार्य अविरत सुरू आहे. निर्धन कष्टकरी शेतकर्‍यांना घरगुती गरजा पुरविण्यासाठी आवश्यक ती माहिती दिल्यास व मदत केल्यास ग्रामीण विकास नक्की होणार व शेतकर्‍यांच्या आत्महत्येला आळा बसेल, असा विश्‍वास  सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी व्यक्त केला आहे.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध आपल्या रामराज्यातील प्रवचनात बोलले होते की, रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्थानापासून सुरू होतो आणि ग्रामराज्य म्हणजे ग्रामविकास. ग्रामीण जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय रामराज्य भारतामध्ये अवतरु शकणार नाही.” यातूनच ’अनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास’ याचे महत्व आपल्याला कळून येते.

Leave a Reply