वृक्षारोपण

शहरात वाढत असलेले सिमेंटचे जंगल, कॉंक्रिटीकरण, वृक्षांसह वनराई व जंगलांची होणारी बेसुमार कत्तल, वणव्यांमुळे जंगलांचे घटते प्रमाण ह्यामुळे जागतिक तापमानवाढीचे अवाढव्य संकट आज आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा र्‍हास, त्याचा चढत्या क्रमाने ढासळणारा दर्जा व वातावरणाचे वाढते असंतुलन ह्यामुळे पृथ्वीवरील सामान्य माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याची इशारा-घंटा सातत्याने वाजत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपलब्ध भूभागाच्या कमीत कमी ३३% भूभागावर घनदाट झाडे असणे आवश्यक आहे. आपल्या भारतात मात्र अशी परिस्थिती नाही आणि अनेक कारणांमुळे याकडे दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे हे संकट कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप समोर आलेली नाही. ह्याची जाणीव ठेवून व सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून निसर्गाचे व पर्यावरणाचे संतुलन पूर्ववत करण्यासाठी श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन व संलग्न संस्था अनिरुध्दाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्याची पाऊले उचलण्यात आली आहेत. वृक्षारोपण / वनीकरण म्हणजे विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे नीट संगोपन करणे!

३० नोव्हेंबर २०१७ रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्ध यांनी वांद्रे येथील ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’च्या मैदानात आपल्या श्रद्धावान मित्रांना संबोधित करताना चार योजना भेट म्हणून दिल्या होत्या. यावेळी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ‘श्रीवनदुर्गा योजने’विषयी माहिती दिली होती.

आपण घरात फळ खातो. चिकू, सीताफळ यांच्या बिया मोठ्या असतात आणि त्या लवकर खराबही होत नाहीत. अशा या बिया फेकून न देता त्या खतमिश्रित मातीमध्ये रोवायच्या आणि त्यांचा एक लहान आकाराचा बॉल तयार करायचा. अशा प्रकारे तयार होणारे ‘सिडबॉल्स’ आपण पिकनिक किंवा विकेन्डला शहराबाहेर जाताना रस्त्याच्या दुतर्फा जिथे रिकामी जागा आहे आणि थोडीशी माती आहे, तिथे पेरायचे व त्यावर थोडेसे पाणी ओतायचे. प्रत्येकाने असे किमान दहा ‘सिडबॉल्स’ जरी पेरले आणि त्यातून किमान दोन बियांमधून झाडं मोठी झाली तर नक्कीच वृक्षारोपण यशस्वी होईल, अशी माहिती सद्गुरु श्री अनिरुद्धांनी दिली होती.

‘श्रीवनदुर्गा योजने’च्या घोषणेनंतर संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमातून सिडबॉल्सचे वाटप करून ‘श्रीवनदुर्गा योजना’ राबविली गेली आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीवनदुर्गा योजने’च्या अंतर्गत पहिल्यांदाच अशी वृक्षारोपण किंवा वनीकरण सेवा हाती घेतलेली नाही, या वृक्षारोपण योजनेच्या बीजाची रोपणी श्रीअनिरुद्धांनी २००४ रोजीच केली होती.

डॉ. अनिरुध्द जोशी ह्यांची वृक्षारोपणाची संकल्पना

‘काही विशिष्ट वृक्षांची व झुडपांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास डिफॉरेस्टेशन (निर्वनीकरण), जमिनीची धूप, वाळवंटाचे अतिक्रमण ह्यांसारख्या समस्यांवर निश्चित व उत्तमरित्या मात करता येते’, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दिनांक ६ मे २०१० रोजी हरिगुरूग्राम येथे ‘रामराज्य’ ह्या विषयावरील प्रवचनात सांगितले होते. वृक्षारोपण कसे करावे?, कुठल्या प्रकारच्या जागेत कसे वनीकरण करावे? ह्याची सखोल माहिती श्री अनिरुद्धांनी दिली.

त्यानंतर ‘श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन’ तर्फे संस्थेतील इच्छुक श्रद्धावान कार्यकर्त्यांना ह्याचे प्रशिक्षण ‘अनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामीण विकास’, गोविद्यापीठम्, कोठिंबे, कर्जत येथे दिले गेले आणि ते अजूनही सुरूच आहे.

सद्‌गुरु श्री अनिरूध्द उपासना फाउंडेशनच्या वेगवेगळ्या उपासना केंद्रांद्वारे सामूहिकरित्या वृक्षारोपण आयोजित केले जाते. त्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून कधी महामार्गाच्या दुतर्फा, कधी डोंगरावर वा अन्य मोकळ्या जागा उपलब्ध करून देणे, कधी वृक्षारोपणासाठी आवश्यक उत्तम प्रतीचे बी-बियाणे पुरविणे अशा प्रकारचे सहाय्य मिळते, तर कधी श्रद्धावान कार्यकर्ते स्वप्रयत्नाने वृक्षारोपणासाठी उपलब्ध जागांचा तपास करून, बी-बियाणे आणून स्वखर्चाने सुध्दा सामूहिकरित्या वृक्षारोपण करतात.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या श्रध्दावान मित्रांना वैयक्तिक पातळीवरसुध्दा वनीकरणाचे कार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. श्रध्दावान वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या घरी कमीत कमी तुळस व त्याचबरोबर ५ झाडे (कढीपत्ता, मोगरा, गुलाब, आलं व झिपरी) खिडकीत किंवा गॅलरीत लावून वृक्षारोपणासाठी आपापल्या परीने हातभार लावीत आहेत. तसेच वाढदिवसाच्या दिवशी किंवा हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांना तुळशीची वा अन्य फुलझाडांची लहानशी रोपे देऊन समाजात ह्याचे प्रबोधनही केले जात आहे.

आपापल्या राहत्या निवासस्थानी, बिल्डिंगच्या वा बंगल्याच्या आवारात किमान कडुलिंबाचे झाड व शक्य असल्यास वड, पिंपळ, आंबा इत्यादी वृक्ष वा लहान झाडे लावण्यासाठीही सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रेरीत केले आहे. श्रद्धावानांना वृक्षारोपण व वनीकरणाबाबत सांगण्याआधीच सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी स्वत:च्या इमारतीच्या छतावर वेगवेगळ्या फळा-फुलांची बाग तयार केली आहे. स्वत:पासून या योजनेची सुरुवात केल्यानंतरच सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या मित्रांना वृक्षारोपणासारख्या योजनेसाठी प्रेरित केले.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या या प्रेरणेने आतापर्यंत ६० हजाराहून अधिक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

वृक्षारोपणाचे महत्त्व

वृक्षारोपणाने निसर्गाच्या सौंदर्यात तर भर पडतेच, पण त्याच बरोबरीने जागतिक तापमानवाढ रोखून वातावरणाचा समतोलही साधता येतो व पर्यावरणाचेही संतुलन राखता येण्यास मदतच होते. पाऊस पडण्यास घनदाट जंगलं मदत करतात. महापूरापासून बचाव होण्यासही या झाडांची मदत होते. झाडांमुळे पावसाचे पाणी जमिनीत अधिक खोल जाऊन जिरते व भूगर्भातील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होते, जमिनीची धूप कमी होऊन जमिनीचा कस कायम राखला जातो.

वृक्ष हे वातावरणातील दुर्गंधी व घातक विषारी वायु (नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, अमोनिया इत्यादी) शोषून घेतात आणि ऑक्सिजनयुक्त शुध्द हवेचा पुरवठा देखील करतात. वातावरणातून एका दिवसात एक माणूस सुमारे ३ सिंलेडर इतका ऑक्सिजन श्वासावाटे आपल्या शरीरात घेत असतो. एक वृक्ष वर्षाला सुमारे २६० पौंड वजनाचा ऑक्सिजन वातावरणात सोडत असतो. ह्याच प्रकारे एक एकर जमिनीवरील संपूर्ण वाढ झालेले वृक्ष हे १८ माणसांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण वर्षभर करू शकतात!

ह्यावरून वृक्षारोपणाचे मानवासाठी किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे ध्यानात येते आणि ह्या उद्देशाने सद्गुरु श्री अनिरूध्द उपासना फाउंडेशन व अनिरुध्दाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करीत राहण्याचा संकल्प केला आहे.

रामराज्य पुस्तक लिंक