श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा

शिर्डीमध्ये श्रीसाईनाथांच्या मधाळ चरित्राचा रस प्राशन केल्यानंतर अर्थात शिर्डी रसयात्रेनंतर म्हणजेच १९९७ साली सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांसाठी श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रेची घोषणा केली. शिर्डी पाठोपाठ झालेल्या अक्कलकोट रसयात्रेच्या या घोषणेमुळे श्रद्धावानांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सद्गुरु श्री अनिरुद्धांबरोबर तब्बल चार दिवस ह्या रसयात्रेचा आनंद लुटायला मिळणे ही श्रद्धावानांसाठी आनंदाची पर्वणीच होती. ’श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी’च्या अंतर्गत या रसयात्रेचे आयोजन केले गेले.

११ सप्टेंबर १९९७ रोजी या यात्रेचा प्रारंभ झाला. सद्गुरु श्रीअनिरुद्धांसह श्रीस्वामीसमर्थांच्या श्रीक्षेत्र अक्कलकोटचे दर्शन घेण्यासाठी व तेथील पावन स्थानांची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येक श्रद्धावान उत्सुक होता.

श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा दर्शन व उपासना – (१२ सप्टेंबर १९९७)

श्रीक्षेत्र अक्कलकोटला पोहोचल्यानंतर दुपारी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जाधव सभागृहात ‘श्री अमृतमंथन’ उपासना सुरू झाली.

‘ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम:|’ ह्या सिद्धमंत्राचे १२ वेळा पठण झाले. त्यानंतर सर्व भक्तांना केळीच्या पानावर चिकणमातीचा गोळा देण्यात आला व त्यापासून श्रीस्वामींच्या प्रतिकात्मक पादुका तयार करण्यास सांगितले गेले. पादुकांवर वाहण्यासाठी प्रत्येकाला अर्चनद्रव्य देण्यात आले होते. पादुका तयार करत असताना आणि त्यानंतर त्यावर अर्चनद्रव्य वाहून अभिषेक करताना खाली दिलेल्या ‘श्रीस्वामीसमर्थ गायत्री मंत्राचा’ १०८ वेळा जप करण्यात आला.

श्रीस्वामीसमर्थ गायत्री मंत्र

ॐ भूर्भुव: स्व:| ॐ स्वामीसमर्थाय विद्महे| पूर्णपुरुषाय धीमहि| तन्नो सद्गुरु: प्रचोदयात्|

ह्या पादुका नंतर लोण्याच्या पादुकांवर अर्पण करण्यात आल्या. या लोण्याच्या पादुका साईसच्चरितकार हेमाडपंत (श्री. गोविंद रधुनाथ दाभोलकर) यांचे नातू श्री अप्पासाहेब दाभोलकर व नातसून सौ. मीनावैनी दाभोलकर ह्या श्रद्धावान दांपत्याने सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार तयार केल्या होत्या.

त्याचबरोबर सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्री. अप्पासाहेब दाभोलकर यांनी मातीचे शिवलिंग बनविले होते. त्या शिवलिंगावर श्रीशिवगायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करत १०८ बेलपत्रे अर्पण करण्यात आली. सर्व श्रद्धावान श्रीशिवगायत्री मंत्रपठणात सहभागी झाले होते.

श्रीशिवगायत्री मंत्र

ॐ भूर्भुव: स्व:| ॐ तत्पुरुषाय विद्महे | महादेवाय धीमहि | तन्नो रुद्र: प्रचोदयात्॥’

आरती –

श्रीशिवगायत्री मंत्रपठणानंतर आरती झाली. त्यानंतर संपूर्ण समर्पण भावाने श्री स्वामी समर्थांची भक्ती – सेवा करणार्‍या स्वामी समर्थांच्या चोळप्पा व बाळप्पा या दोन श्रेष्ठ भक्तांचे गुणगान करणारा एक गजर सद्गुरु श्रीअनिरुद्धांसमवेत सर्वांनी आनंदाने केला. ‘स्वामी समर्थांची भक्ती करणार्‍या या श्रेष्ठ भक्तांच्या जीवनात ज्याप्रमाणे भक्तिरस प्रवाहित झाला, त्याचप्रमाणे तो आमच्या जीवनातही प्रवाहित व्हावा, आमच्या जीवनात विभक्तीचा अंशही न राहता सद्गुरुभक्तिरस सदैव प्रवाहित रहावा’ या भावाने सर्व श्रद्धावान आनंदाने बेभान होऊन या गजरात सहभागी झाले.

तो गजर असा होता –

चोळप्पाचे प्रेम हवे मज, बाळप्पाची भक्ती हवी | विभक्तीचा अंश नको मज, स्वामी तुमची कृपा हवी॥’

आरती समाप्तीनंतर भोजनोत्तर रात्री ११ वाजता सर्वांना सद्गुरु श्री अनिरुद्धांसमवेत सत्संगात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली.

श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा दुसरा दिवस– (१३ सप्टेंबर १९९७)

अल्पोपहारानंतरचा कार्यक्रम म्हणजे अक्कलकोट स्थळदर्शन! ह्या स्थळांच्या भेटीचा क्रमही सद्गुरु श्री अनिरुद्धांनी आखून दिल्याप्रमाणेच होता. त्यानंतर दुपारी १२ वाजता भोजनापूर्वी वटवृक्ष मंदिरात सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार ५ पुरुष व ५ स्त्रिया यांनी महाभोग अर्पण केला. सर्वजण प्रथम स्वामींच्या मूळ समाधी मंदिरात गेले. ही समाधी चोळप्पाच्या घराजवळ आहे. तेथेच स्वामी ज्या गाईचे दूध प्राशन करत, त्या गाईचीही समाधी आहे. त्यानंतर सर्वजण जोशीबुवा मठात गेले. इथे पाटावर उमटलेल्या स्वामींच्या चरणमुद्रांचे दर्शन सर्वांनी घेतले.

तद्‌नंतर ज्या वटवृक्षाखाली स्वामींचा वास होता, त्या मंदिरातील वटवृक्षाचे दर्शन घेऊन मग सर्व जण बाळप्पा मठात गेले. स्वामींनी अंतसमयी स्वत:च्या पादुका, दंड, रुद्राक्षमाळ ह्या पवित्र वस्तु बाळप्पांच्या स्वाधीन केल्या होत्या, त्या बाळप्पा मठात ठेवल्या आहेत, त्यांचे सर्वांनी दर्शन घेतले.

रात्री १०.३० वाजता सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या सान्निध्यात सत्संगास सुरुवात झाली.

 श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा तिसरा दिवस– (१४ सप्टेंबर १९९७)

सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार अल्पोपहारानंतर ठीक ९.३० वाजता श्रीदत्त उपासना सुरू झाली. यावेळी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पाच श्रद्धावानांकडून गुरुचरित्राचे पूजन करून घेतले.

त्यानंतर श्री दत्त मंत्राचा १०८ वेळा जप करण्यात आला. तो मंत्र असा –

ॐ अत्रिनंदनाय दत्तात्रेयाय विश्वाध्यक्षाय नम : |

त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्या नामगजरात सर्व श्रद्धावान भक्त प्रेमभावाने नाचत गात सहभागी झाले.

सांगता समारंभ

नामगजरानंतर १२.३० वाजता श्रद्धावानांना पुन्हा सद्गुरु श्री अनिरुद्धांसह काही काळ सत्संगात सहभागी होण्याचा लाभ मिळाला. त्यानंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी वटवृक्षमंदिरात ठेवण्यासाठी ५ भत्कांच्या हातांत ५ श्रीफळे दिली. त्यानंतर पेरुचा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला व रसयात्रेच्या भक्तिमय आठवणींची उजळणी करत सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झाला.