श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव

        ओरिसाच्या पुरीतले जगन्नाथाचे मंदिर भारताच्या चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक. भगवान श्रीकृष्ण जगन्नाथाच्या रूपात विराजमान असलेले हे मंदिर प्राचीन आहे. ह्या मंदिरात श्री जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रेच्या मूर्ती आहेत. दर आषाढात इथे जगन्नाथाचा उत्सव साजरा होतो. त्यासाठी देशातूनच नव्हे तर जगातून लक्षावधी भाविक हा अनुपम सोहळा बघण्यासाठी पुरीत दाखल होतात. जे भक्त दर्शनाला येतात त्यांच्यावर श्री जगन्नाथ प्रेमवर्षाव तर करतातच शिवाय त्यांना उत्साह, आनंद, व शांती प्रदान करतात, अशी धामयात्रा करणार्‍या भाविकांची दृढ श्रद्धा असते.

परंतु प्रत्येकाला ह्या सोहळ्यात सहभागी होणं जमत नाही. अशा श्रद्धावानांना या अनुपम सोहळ्याचा लाभ मिळावा यासाठी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव’ आयोजित करण्यात आला. हा महोत्सव ’सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट’ व ’सद्गुरू अनिरुद्ध समर्पण पथक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ मे ते १२ मे २००३ या काळात सोमैया कॉलेज, सायन, मुंबई येथे संपन्न झाला.

भारताची आध्यात्मिक उन्नती होऊन सर्व स्तरावर प्रगती व्हावी व एक समर्थ राष्ट्र म्हणून भारताचा लौकिक व्हावा आणि प्रत्येक श्रद्धावानाला मंत्रपठणाच्या सहाय्याने सकारात्मक ऊर्जा लाभावी असा ह्या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

सद्गुरुचं आपल्या आयुष्यात येणं हेच खर्‍या अर्थाने जीवनाचं सार्थक आहे. त्यांच्या सान्निध्यात अष्टतीर्थ यात्राही आपोआप घडतच असतात. श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सवसुध्दा अशाचप्रकारे सद्गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शनाखाली सुंदररित्या पार पडला आणि श्रध्दावानांनी देखील अतिशय आनंदाने यामध्ये सहभाग घेतला.

पुरीमध्ये जगन्नाथाचा उत्सव साजरा केला जातो त्या श्री जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रेच्या मूर्ती लाकडाच्या असतात. ‘पाद अंगुली नहीं है हाथ, दारुब्रम्ह जगन्नाथ’ – आरतीच्या ह्या ओळीतून श्री जगन्नाथाचे वर्णन केले जाते. ह्या मूर्तींसाठी ब्रह्मवृक्षाचे म्हणजेच ‘दारूब्रह्म’ नावाच्या विशिष्ट प्रकारच्या वृक्षाचे लाकूड वापरतात. दारुब्रह्म म्हणजे श्रेष्ठ वृक्षापासून मिळालेल्या श्रेष्ठ लाकडामध्ये वसणारं ब्रह्म म्हणजे दारुब्रह्म आणि ह्या तीनही मूर्ती ह्याखोडापासून बनविलेल्या असतात आणि दर तीस वर्षांनी ह्या बदलल्या जातात. श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सवातही जगन्नाथपुरीमधील मूर्तींसारख्याच मूर्ती  उत्सवासाठी घडविण्यात आल्या होत्या. महोत्सवात या मूर्तींच्या सजावटीसाठी २७ प्रकारचे पारंपारिक पोषाख खास तयार करण्यात आले होते.


श्री जगन्नाथाचे परमभक्त श्री गौरांगचैतन्य प्रभू यांनी ‘ॐ रामाय जगन्नाथाय नमः| हा सिद्ध मंत्र दिला असे मानले जाते. ह्या सिद्ध मंत्राचे, सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावानांनी १२ कोटी वेळा पठण केले. या पठणासाठी अभूतपूर्व संख्येत श्रद्धावान सहभागी झाले होते. उत्सवकाळात दररोज सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत हे मंत्रपठण चालू असायचे. ठरविलेल्या कालावधीच्या आधीच मंत्रपठणाची १२ कोटी ही संख्या पूर्ण झाली.

जगन्नाथ पुरीचा आकार ज्याप्रमाणे शंखाकृती आहे तसेच्या तसे शंखाकृती आकाराचे श्री जगन्नाथ क्षेत्र बनविण्यात आले होते व वैदिक पद्धतीने तेथील सर्व विधी, विशिष्ट पूजापद्धती, जगन्नाथाच्या मंदिराच्या प्रथेप्रमाणेच पावित्र्याचे जतन करुन केले जात होते.

या धामात प्रत्येक तासाला ‘पाद अंगुली नहीं हैं हाथ, दारुब्रह्म जगन्नाथ’ श्री जगन्नाथाची आरती केली जात होती. मूर्तींचे पारंपारिक वस्त्र दिवसातून ३ वेळा बदलले जात होते. शिवाय सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या उपस्थितीत दररोज रात्री ९.०० वाजता सत्संग पार पडत होता. लाखो श्रद्धावानांनी या सत्संगाचा आनंद लुटला.

श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सवात १) श्री जगन्नाथ क्षेत्र यांसह श्रीसंतपुरी, यज्ञपुरी व मोक्षपुरी अशा तीन पुरी आणि श्रीपतितपावन, श्रीहयग्रीव, श्रीसावित्री, पितृ आणि अनिरुद्ध असे पाच धाम बनविण्यात आले होते.         

या सर्व धामांची माहिती व त्याचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊ.

‘श्रीसंतपुरी’ धाम –  ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ, नारायण वासुदेव राधे…’ ह्या गजरात पूर्णपणे रंगून जाण्याची संधी फक्त या संतपुरीमध्येच मिळत होती. श्रीकृष्णाचा अखंड जप चालू असल्यामुळे ही संतपुरी जणू सर्व संतांचे निवासस्थानच वाटत होती. श्रीगौरांगचैतन्य महाप्रभुंचे अस्तित्वच जणू संतपुरीमध्ये प्रत्येकाला जाणवत होते.

‘यज्ञपुरी’ धाम – अग्नी, दीप, आरती, धुनी आणि पवित्र ज्योती हे यज्ञपुरुषाचे पाच मूलभूत घटक मानले जातात. यज्ञ आचारसंहितेनुसार यज्ञपुरीमध्ये पाच प्रकारचे यज्ञ पार पडत होते. श्रीदत्तगुरु, श्रीजगन्नाथ, श्रीराम, श्रीपरब्रह्म आणि श्रीचतुर्व्यूह ह्यांच्या मंत्रांचे पठण तेथे सतत चालू होते.

‘श्रीपतितपावन’ धाम – ह्या धामामध्ये एका भव्य जलकुंडात सात पवित्र नद्यांमधील जल साठविले होते. आतील बाजूला वड, पिंपळ व औदुंबर ह्या तीन वृक्षांच्या फांद्यांचे रोपण केले होते. गंगोत्री व जमनोत्री येथील पवित्र मृत्तिका व गंगा-यमुना नद्यांचे पाणी यांचा वापर करून बनविलेली श्रीदत्तदिगंबरांची मूर्ती ह्या जलकुंडात प्रतिष्ठित होती. या जलकुंडाभोवती सर्व श्रद्धावान प्रदक्षिणा घालत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या सूचनेनुसार ह्या पवित्र धामाचे स्थान व रचना अतिशय सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण बनविण्यात आली होती आणि तेथील वातावरण अतिशय पवित्र व मनाला स्फूर्ती देणारे होते.

‘मोक्षपुरी’ धाम – मोक्षाबद्दल भारतीय मनाला असणारे आकर्षण खूप मोठं आहे. ह्या मोक्षपुरीमध्ये जैनधर्मीयांचे पहिले तीर्थंकर श्रीभगवान ऋषभनाथ यांची मूर्ती प्रतिष्ठित करण्यात आली होती. यांना विष्णूचा अवतारही मानले जाते. येथे सद्गुरु श्री अनिरुद्धांनी नवकार मंत्राचे १ कोटी वेळा पठण करण्याचा संकल्प केला होता. मात्र श्रद्धावानांकडून त्याहीपेक्षा जास्त वेळा ह्या मंत्राचे पठण केले गेले. हा नवकार मंत्र अत्यंत पवित्र मानला जातो.

श्रीहयग्रीव’ धाम – ‘हयग्रीव’ म्हणजे घोड्याचे मुख असलेला महाविष्णूचा अवतार. शक्तीचे प्रतीक असलेल्या हयग्रीवाबरोबर नेहमीच ‘बला’ व ‘अतिबला’ ह्या देवता असतात. जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी ह्या धामामध्ये फक्त पुरुषभक्तांनाच प्रवेश होता. यातून पुरुषभक्तांना स्वत:च्या कर्तव्याची जाणीव, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी हा त्यामागचा उद्देशही होताच. चाव्यमुनी, पराशर ऋषी, अगस्त्य ऋषी व अर्जुन हे हयग्रीव ह्या महाविष्णूच्या अवताराचे कडवे भक्त होते.

श्रीसावित्री’ धाम – आदिमाता सावित्री ही स्त्रियांच्या शक्तीचे प्रतीक. सत्यवान राजाची पत्नी सावित्री ही सुलक्षणा सावित्री. ह्या सावित्रीचे रूप हे भक्ती आणि निष्ठेचे प्रतिक. ‘आदिमाता सावित्री’ आणि ‘सुलक्षणा सावित्री’ ह्या दोन्ही मूर्ती सावित्रीधामामध्ये प्रतिष्ठित होत्या. माता व पत्नी ह्या दोन्ही रुपांच्या जबाबदार्‍या स्त्रीला सशक्तपणे पार पाडता येण्यासाठी भक्ती, शक्ती आणि निष्ठा तिच्याठायी रूजाव्यात हा सावित्रीधाम उभारण्यामागील उद्देश्य होता. ज्या सावित्रीने मृत्युच्या जबड्यातून पतीचे प्राण खेचून आणले तिचे पूजन रोज ह्या धामामध्ये केले जात होते. इथे कुमारिका, अविवाहित, पती नसलेल्या, वृद्ध अशा सर्व स्त्रियांना ह्या धामामध्ये प्रवेश होता.

पितृधाम – पूर्वजांसाठी काही क्रियाकर्मे करण्याची, कर्तव्य पालनाची प्रत्येकाचीच इच्छा असते. श्रीशंकराचे ‘परमहंस बाणलिंग’ रुप जे मृत्युनंतर आत्म्याला शांति देते, त्या रुपाच्या प्रतिकात्मक मूर्तीला बिल्वपत्र अर्पण करण्याची संधी प्रत्येक श्रद्धावानाला ह्या धामामध्ये मिळत होती. तेथे सतत मंत्रपठण चालू होते.

अनिरुद्धधाम – नववे धाम हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या श्रद्धावानांनी त्यांच्या सद्गुरुप्रति असलेल्या प्रेमापोटी उभारले होते. इथे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार चालणार्‍या ज्या भक्तीसेवा ’श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ तर्फे दिल्या जातात त्याबद्दलची सर्व माहिती व सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या विविध कार्यांबद्दलची माहिती श्रद्धावानांना दिली जात होती.

या उत्सवात रोज श्रीजगन्नाथाला महाभोग चढविण्यात येत होता व तो प्रसाद वृद्धाश्रम, अनाथालय येथे वाटण्यात येत होता. या उत्सवातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे दर्शन विनामूल्य होते. देणगीसाठी दानपेट्या किंवा तत्सम काहीही नव्हते. फुले, मिठाई वगैरे काहीही स्वीकारले जात नव्हते. श्रीजगन्नाथाला फक्त नारळ व तुलसीपत्र अर्पण करण्यास परवानगी होती. सर्व श्रद्धावानांनी श्रीजगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव अत्यंत यशस्वी होण्यास मोलाचे योगदान दिले.