श्रीक्षेत्र पंढरपूर भावयात्रा

विठ्ठल भक्तीची चंद्रभागा केवळ महाराष्ट्रात वाहत नाही, तर देशविदेशात विठ्ठल भक्तीचा हा नाद दुमदुमतो. केवळ विठ्ठल नामाचा उच्चार होताच त्याच्या प्रेमाने अंग शहारून जाते आणि एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो. विठ्ठल, विठ्ठल…, ग्यानबा तुकाराम.. असे गजर करीत विठ्ठल भेटीच्या ओढीने तापलेल्या रस्त्याने नाचत गात दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला जाणार्‍या वारकर्‍यांनी या विठ्ठल नामाची ही चंद्रभागा दूरवर पोहोचविली. ‘जेव्हा नव्हत्या गंगा-गोदा, तेव्हा होती चंद्रभागा’, ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’, असे संत-वारकरी मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. पंढरीनाथ, विठ्ठल, विठू, पांडूरंग अशा असंख्य नावाने ज्या लाडक्या दैवताला श्रद्धावान हाक मारतात, त्या विठ्ठलाचे निवासस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर भावयात्रेचे आयोजन सद्गुरु श्री अनिरुद्धांनी (बापू) २००१ साली केले होते.

शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा-गोवा या चार रसयात्रांनंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी या भावयात्रेची घोषणा केली. ही घोषणा होताच उपस्थित श्रद्धावानांच्या मनात एकच उत्साह संचारला. कधी एकदा भावयात्रा सुरू होते अशी ओढ प्रत्येकाला लागली.

‘भक्ती हे सोळावे ऐश्वर्य आम्हाला पंढरपूरमध्ये विठ्ठलासह मिळते. संतांना पंढरपूर ‘माहेरघर’ वाटते. ‘चंद्रभागा’ बहीण आणि ‘पुंडलिक’ भाऊ आहे असे संतांना वाटते. हे सोळावे ऐश्वर्य, हे माहेरघर प्राप्त करण्यासाठीच भक्ताची पावले पंढरीची वाट चालत राहतात’, असे पंढरपुरच्या भावयात्रेच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध म्हणाले होते. परमेश्वर व भक्त यामध्ये ‘भक्ती’ हाच एजंट, अन्य कुणीही नाही. अत्यंत प्रेमाने आपल्या आयुष्याचे सोने करण्यासाठी, सावळ्या विठ्ठल परब्रह्माच्या नामात गुंगून जाण्यासाठी आणि आनंदाचा न संपणारा खजिना परत बरोबर घेऊन येण्यासाठी ही भावयात्रा आवश्यक ठरते, असे बापूंनी सांगितले होते. अशी ही पंढरपूर भावयात्रा ५ मे २००१ ते ८ मे २००१ ह्या ४ दिवसांमध्ये पार पडली.

पंढरपूर भावयात्रा पहिला दिवस

दिनांक ५ मे २००१ रोजी संध्याकाळपर्यंत सर्व श्रद्धावान पंढरपूरच्या पवित्र श्रीक्षेत्री पोहोचले. रात्री १० वाजता बापूंचे आगमन झाले, तेव्हा सद्‌गुरुंना पाहताच सर्वांचाच आनंद ओसंडून वाहू लागला. सर्वांची भोजने झाल्यावर सर्वांनी सद्‌गुरुंसह ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट पाहिला. पांडुरंगाप्रती असणार्‍या अनन्यभावाने भरलेला हा नितांतसुन्दर चित्रपट पाहताना सर्वांचे अंत:करण भक्तिभावाने ओतप्रोत भरून गेले आणि अशा प्रकारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी वंदन करून भावयात्रेची दमदार सुरुवात झाली.

दुसरा दिवस (६ मे)

सर्व श्रद्धावान सकाळी उत्सवस्थळी मंडपात उपस्थित झाले. सर्वप्रथम सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाचा लाभ श्रद्धावानांना झाला. ‘‘पूर्ण अंध:कार व पूर्ण प्रकाश या दोन्हींवर समानपणे नियंत्रण ठेवणारा हा महाविष्णू म्हणजे पांडुरंग! कारण हा पांढरा वर्ण (गौर वर्ण) म्हणून पांडुरंग, पण ‘सावळा’, ‘काळा’ असं संत म्हणतात म्हणजेच एकाच वेळेस तो सावळा, काळा पण आहे आणि गोरा पण आहे. अशा ह्या पांडुरंगाबद्द्ल ‘तो माझा आहे आणि मला त्याचं व्हायचयं’ ही भावना पाहिजे.’’, असे ह्यावेळी बोलताना बापू म्हणाले होते.

बापूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार विठ्ठलाच्या प्रेमभावात रंगण्याचा निर्धार प्रत्येकाने केला. यानंतर श्रद्धावानांना ओली माती आणि अर्चनद्रव्ये देण्यात आली. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘हरि ॐ’ म्हणून सुरुवात करायला सांगितल्यापासून ते परत त्यांनी ‘हरि ॐ’ म्हणेपर्यंतच्या अवधीत श्रद्धावानांना त्या मातीपासून शंख, चक्र, गदा आणि पद्म ही महाविष्णूची आयुधे तयार करायची होती. मुखाने मन:पूर्वक ‘श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल’ हा गजर करत सर्वांनी ती आयुधे बनविली. त्यानंतर पांडुरंग गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप सुरू असताना दिले गेलेले अर्चनद्रव्य श्रद्धावानांनी त्या आयुधांवर अर्पण केले.

पांडुरंग गायत्री मंत्र :

ॐ पद्मनाभाय विद्महे| पांडुरंगाय धीमहि| तन्नो हरि: प्रचोदयात्॥

त्यानंतर त्या आयुधांवर तुलसीपत्रे अर्पण करण्यात आली. त्यावेळी, ‘हे देवा, ह्यातलं एक तरी आयुध माझ्या आयुष्यात येऊ दे आणि माझ्या प्रारब्धाचा नाश करू दे’ अशी प्रार्थना पांडुरंगाला करायची असे परमपूज्य बापूंनी श्रद्धावानांना सांगितले होते.

महाविष्णुच्या आयुधांचे अनोखे पूजन बापूंनी श्रद्धावानांकडून करून घेतल्यावर सायंकाळी ‘श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रेची’ सुरुवात झाली.

खरं तर ही रथयात्रा दुपारी सुरू होणार होती, परंतु श्रद्धावानांचे पाय मे महिन्याच्या दुपारच्या कडक उन्हामुळे भाजू नयेत हा प्रेमाचा कळवळा परमपूज्य बापूंच्या मनी होता, त्यामुळे ही रथयात्रा सायंकाळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘‘रथ ओढताना मला वाटलं पाहिजे की मी परमेश्वराचे वाहन आहे, तसेच त्याची वहाणही आहे म्हणजेच त्याचं पादत्राण आहे, आणि एकदा का त्याने पादत्राण घातले की भार तोच वाहणार! हे लक्षात ठेवा” असे बापूंनी श्रद्धावानांना मार्गदर्शन केले.

ही रथयात्रा पाहून म्हणजे २ टन (म्हणजे २००० किलो) वजनाचा रथ आणि त्यामध्ये आरुढ झालेली भव्य-दिव्य विठ्ठलमूर्ती पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. रथाच्या माथ्यावर हनुमंताची प्रतिमा आणि ‘श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रा’ असा नामनिर्देश फलक होता. रथयात्रेचे मनोहारी दृश्य श्रद्धावान कौतुकाने न्याहाळत होते. एवढ्या मोठ्या जड रथास पुढे व्यवस्थितपणे दोरखंड बांधण्यात आला होता आणि सर्व श्रद्धावान विठ्ठलाचा गजर करत श्रद्धेने, अफाट उत्साहाने, आनंदाने तो दोरखंड ओढत रथ पुढे नेत होते.

श्रद्धावान भक्तांनी सकाळी बनवलेली महाविष्णूची मृत्तिकेची आयुधेही ह्या रथात विठोबाच्या मूर्तीच्या चरणी अर्पण करण्यात आली होती.

डोक्यावर भगवे फेटे परिधान करून व हातात भगवे झेंडे घेऊन ‘जय जय रामकृष्णहरि’, ‘माझा विठू, माझा विठू, माझा विठू, विठू विठू’, ‘आला रे आला माझा सावळा विठ्ठल आला’ अशा बहारदार गजरांच्या ठेक्यावर नाचणार्‍या हजारो श्रद्धावानांनी आसमंत फुलून गेला होता. नंदाई, सुचितदादांसह स्वत: सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध रथयात्रेच्या मार्गावर सर्वांबरोबर चालत असल्यामुळे रथ ओढणार्‍या श्रद्धावानांच्या उत्साहाला उधाण आले होते.

भक्तस्त्रियाही नऊवारी साडी, नथ वगैरे घालून पारंपारिक वेषात गजराच्या तालावर नाचत, ढोल-ताशांच्या साथीने रथ खेचत होत्या. अशा ह्या विठुमाऊलीचा रथ ओढताना प्रत्येक श्रद्धावानाला धन्य धन्य वाटत होते आणि आपले आयुष्य सार्थकी लागल्याचा आनंद होत होता. रात्री ‘संत तुकाराम’ हा चित्रपट सर्व श्रद्धावानांनी बापूंसह एकत्र बसून बघितला. ह्या भावयात्रेचे केंद्रस्थान होते श्रीविठ्ठल आणि ह्या विठ्ठलाबद्दलचा एकविध भाव दृढ करणारे ‘संत तुकाराम’ श्रद्धावानांना समजावेत म्हणूनच श्रीअनिरुद्धांनी ह्या चित्रपटाचा लाभ श्रद्धावानांना करून दिला.

तिसरा दिवस (७ मे)

रसयात्रेच्या तिसर्‍या दिवशी सकाळी श्रद्धावानांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांना आवर्जून सांगितले की ‘आम्हाला फक्त तूच हवास, दुसरं काहीही नको, पण तुझी भक्ती मात्र दे! हाच भाव ठेवून श्री विठ्ठलमाऊलीचे दर्शन घ्या’; सर्व श्रद्धावानांनी आधी संत नामदेव महाराजांच्या पायरीचे, नंतर चोखोबा महाराजांच्या समाधिचे दर्शन घेतले, तरट वृक्षरुपी कान्होपात्रा माऊलीला मनोभावे प्रणाम केला आणि मगच विठ्ठलचरणी माथा टेकला. यापूर्वी बापूंनी सर्व श्रद्धवानांना या तीन महान संताच्या कथा सांगितल्या होत्या.

कालियामर्दन मनामध्ये असणार्‍या अहंकाररूपी विषारी कालियाचे, मनातील वाईट विचारांचे, पापांचे, दुष्कृत्यांचे प्रतीकात्मक मर्दन करण्यासाठी श्रद्धावानांनी शाडूच्या मातीपासून एक प्रतीकात्मक ‘कालिया नाग’ तयार केला. प्रत्येकजण ‘माझ्यातील पाप आणि अहंकाराचा नाश व्हावा’ अशी प्रार्थना श्रीकृष्णरूपी विठ्ठलाच्या चरणी मनोमन करत, मुखाने जप आणि विशेष नामगजर करत करत कालिया नाग तयार करीत होते व स्वत:च ह्या पवित्र नामगजरात त्याच प्रतीकात्मक कालियाचे मर्दन प्रत्येकाने केले. कालियामर्दनाने आनंदित झालेल्या श्रद्धावानांनी भगवंताच्या नामगजरात उत्स्फूर्तपणे नृत्य करून आनंद साजरा केला.

दहीकाला हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या डोळ्यांसमोर उत्साह आणि ऊर्जेने भरलेला सोहळा उभा राहतो. मग येथे तर प्रत्यक्ष पंढरीतील दहीकाला साजरा होणार होता. ‘गोविंदा रे गोपाला’, ‘बोलो बजरंग बली की जय’ असा जयघोष करीत, चैतन्याने भारलेल्या वातावरणात एकावर एक असे तीन थर लावून दहीहंडी फोडण्यात आली. ह्या उपक्रमामुळे श्रद्धावानांमधील आपुलकी, सहकार्य, बंधुभाव ह्या गुणांचे दर्शन तर घडलेच पण सामूहिक उपासनेची शिकवणही श्रद्धावानांना मिळाली.

चौथा दिवस (८ मे)

रसयात्रेच्या चौथ्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत प्रथम हरिपाठ झाला. हा दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी वैशाख पौर्णिमेचे महत्व व त्या दिवशीच्या उपासनेची महती विशद केल्यामुळे प्रत्येक श्रद्धावानाचा भाव उपासना करताना वृद्धिंगत झाला होता.

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंच्या उपस्थितीत सांघिक उपासना करण्यात आली, जिचा क्रम पुढीलप्रमाणे होता –

१) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:| गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:| – (१ वेळा)
२) सद्गुरु तारकमंत्र (ॐ मन:सामर्थ्यदाता श्रीअनिरुद्धाय नम:|) – (१०८ वेळा)
३) श्रीहनुमानचलीसा – (११ वेळा)
यानंतर ‘वैशाख पौर्णिमेचा सर्वश्रेष्ठ प्रसाद’ मानले जाणारे कैरीचे पन्हे व आंबेडाळ या तीर्थप्रसादाचे सेवन सर्वांनी केले.

चंद्रभागा नदीच्या तीरावर जाण्यापूर्वी सायंकाळी ठीक ५.०० वाजता सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांशी संवाद साधला.

नदीतीरावर छोटेखानी, आकर्षक मंडप घालून त्यासमोरील व्यासपीठावर असलेले भगवान श्रीकृष्णाचे मोहक चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ध्वनिक्षेपकाची उत्तम सोय होतीच. स्त्री श्रद्धावान व पुरुष श्रद्धावान ह्यांची टिपरी खेळण्याची वेगवेगळी सोय करण्यात आली होती. स्वत: श्रीअनिरुद्ध व नंदाई तसेच सुचितदादा स्टेजवर हजर झाले आणि ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ ह्या अभंगाने सुरुवात करून सर्व जणांनी चंद्रभागेच्या वाळवंटात टिपर्‍या खेळण्याचा आनंद लुटला.

भक्तांच्या मागे युगानुयुगे धावूनही, दुष्टांचा संहार युगानुयुगे करूनही हा खेळिया श्रीकृष्ण जराही थकत नाही, यासंबंधी एक आख्यायिका श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांना सांगितली व टिपर्‍या खेळताना ‘मी श्रीकृष्णाचा गोप आहे’ हा भाव मनात ठेवून टिपर्‍या खेळायच्या हेदेखील बजावले.

श्रद्धावान पावित्र्य, प्रेम, श्रद्धा, भक्ती, आनंद यांनी भरलेल्या अंतकरणाने उत्साहात टिपर्‍यांचा रास खेळले व आयुष्यभर पुरेल असा आनंदाचा ठेवा मनात साठवला.

अखेरच्या दिवशी निघण्यापूर्वी या भावयात्रेत अनुभवलेला आनंद सोहळा आठवून आणि पंढरपूरवरून पुन्हा परतण्याच्या भावनेने प्रत्येक श्रद्धावानांचा ऊर भरून आला होता. पंढरपूरला संताचे माहेरघर म्हटलले जाते. विठूरायाच्या पंढरीतील ही भावयात्रा संपली ही भावना कोणालाही सहन होत नव्हती. अखेरीस, देवा! तू माझाच आहेस, पण मला तुझं व्हायचयं’ ह्या भावाने जगा. ह्यामुळे तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा होईल, प्रेमाने भरुन जाईल, असे बापूंनी पंढरपूरहून निघण्यापूर्वी श्रद्धवानांना सांगितले. प्रेमळ आणि आत्मीयतेने भरलेल्या ह्या शब्दांना हृदयात धारण करून प्रत्येक जण जड अंत:करणाने आनंदाची, भावाची प्रचंड राशी स्वत:सह घेऊन परत येण्यास निघाला.