मातृवात्सल्यविन्दानम्‌

मातृवात्सल्यविन्दानम्‌ ग्रंथ काय आहे?

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की, “हा ग्रंथही आहे, हे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे, ही भक्तीभागीरथीही आहे व आदिमातेचे आख्यान तर आहेच आहे. परंतु ह्या सर्वांच्या पलीकडे हे माझ्या आदिमातेचे शुभंकरा व अशुभनाशिनी स्वरुप आहे, वात्सल्य आहे व वरदानही आहे.

आदिमातेने केलेल्या आज्ञेनुसार श्रीपरशुराम श्रीगुरुदत्तात्रेयांकडून श्रवण केलेले व स्वतः अनुभवलेले चण्डिकेचे आख्यान नित्यस्मरण करीत राहिले व त्यांनी तिच्याच आज्ञेनुसार ऋषी सुमेधस, ऋषी हरितायन व मृकंड पुत्र ऋषि मार्कण्डेय ह्या स्वतःच्या तीन सत्‌-शिष्यांना ह्याचा उपदेश केला. ह्या आख्यानाचे काही पाठ मार्कण्डेयपुराण, कालिकापुराण आणि सप्तशती आख्यानात आलेले आहे.

मातृवात्सल्यविन्दानम्‌ ग्रंथाची रचना कशी झाली?

भारतामध्ये गुरु-शिष्य परंपरेला अनन्य महत्त्व आहे. ही परंपरा भारताची मूल्ये मजबूत करणारी आहे. “श्रीगुरु दत्तात्रेय” आणि त्यांचा शिष्य “श्रीपरशुराम” ही एक आदर्श गुरु-शिष्य जोडी आहे. श्रीगुरु दत्तात्रेयांनी परशुरामास आदिमातेच्या सर्व अवतारांबद्दल ज्ञान दिले. या गुरु-शिष्य संवादातून आदिमातेचे अवतार कार्य प्रकट झाले आहे आणि हा संवाद शब्दबद्ध केला आहे. सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांनी याच शब्दबद्ध केलेल्या ग्रंथालाच “मातृवात्सल्यविन्दानम्‌” म्हणजेच “मातरैश्र्वर्यवेद:” म्हणतात. या ग्रंथामध्ये गुरु-शिष्याच्या संवादातून आदिमातेच्या गायत्री, महिषासुरमर्दिनी आणि अनसूया रुपाचे आख्यान आपल्यासमोर येते. आदिमाता चण्डिकेचे रुप, कार्य, गुण यांची माहिती या ग्रंथामधून आपल्याला होते.

मातृवात्सल्यविन्दानम्‌ ग्रंथाचे वैशिष्ट्य

या ग्रंथाचे तीन भाग आहेत. तीन भागात आदिमाता गायत्री, आदिमाता महिषासुरमर्दिनी आणि आदिमाता अनसूया यांचे चरित्र सांगितलेले आहेत. मूळ चण्डिकेची ही तिन्ही रुपे एकमेकांपासून वेगळी नाहीत. मनुष्याच्या स्थूल, सूक्ष्म व तरल या तिन्ही पातळ्यांवर अनुक्रमे माता अनसूया, माता महिषासुरमर्दिनी, माता गायत्री कार्य करतात.

“आई ती आई बहु मायाळू। लेंकरालागी अति कनवाळू।

परी लेंकरेंच निघतां टवाळू। कैसा सांभाळू करी ती॥”

हे श्रीसाईनाथांचे प्रत्यक्ष उदगार म्हणजेच ह्या ग्रंथाची फलश्रुती.

मातृवात्सल्यविन्दानम्‌ ग्रंथ कुठे मिळेल?

हा ग्रंथ श्री‍हरिगुरुग्राम, संस्थेची विविध उपासना केंद्रे, संस्थेची सर्व तीर्थक्षेत्रे येथे विक्रीस उपलब्ध असतो. तसेच हा ग्रंथ आपल्याला ऑनलाईन ही आंजनेय ई शॉप या संस्थेच्या वेबसाईटवर विकत घेता येईल.