वैभवलक्ष्मी पूजन उत्सव

मार्गशीर्ष हा बारामासातला सर्वश्रेष्ठ महिना आहे, अशी मान्यता आहे. याच महिन्यात श्रद्धावान ‘वैभवलक्ष्मी व्रत’ करतात. वैभवलक्ष्मी माता श्रध्दावानाला सुख व आनंद देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते, त्याचबरोबर ती श्रध्दावानांच्या आयुष्यात येणार्‍या व्याधी, दुष्प्रारब्ध, संकटे यापासूनही रक्षण करते असा श्रद्धावानांचा विश्वास आहे. ही वैभवलक्ष्मी माता, भगवान महाविष्णुची शक्ती आहे. ती आपल्यासाठी अभ्युदय, वैभव, कृपा, सुख व षोडश ऐश्‍वर्ये देणारी महाविष्णुच्या कार्याची अधिष्ठात्री देवता आहे.

जेथे परमात्म्याचे चरण आहेत, त्याचे पूजन जेथे केले जाते, परमात्म्याने दिग्दर्शित केलेली श्रद्धायुक्त सेवा-भक्ती जेथे आहे, तेथे लक्ष्मीमातेचे वास्तव्य असते. नैवेद्य म्हणून श्रीलक्ष्मीमातेला पाच प्रकारची पक्वान्ने, वरण-भात, पोळी भाजी किंवा अगदी नुसते पाणीसुद्धा प्रेमाने अर्पण केले असेल तरीही ती गोड मानून घेते. पण देवीमातेला खर्‍या अर्थाने प्रिय असलेली पाच पक्वान्ने म्हणजे,

१) स्वच्छता

२) परिश्रम

३) श्रद्धा

४) सबुरी

५) उचित ठिकाणी केलेले दान

आणि अर्थातच हे सर्व ‘पावित्र्य हेच प्रमाण’ या एका तत्त्वावर. जे श्रध्दावान या पाच गुणांचा स्वीकार करतात त्यांना श्रीलक्ष्मीमातेचा प्रसाद नित्य मिळत राहतो.

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी श्री क्षेत्र जुईनगर येथे वैभवलक्ष्मी पूजनाचा उत्सव अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. श्रीवैभवलक्ष्मीची संगमरवरी मूर्ती मंदिरातील आद्यपिपा समाधी स्थानातील कमलदलामध्ये प्रतिष्ठित केली जाते. त्यानंतर अभिषेक व  होमाला सुरुवात होते. या उत्सवात अनेक श्रध्दावान आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात. होमाची आवर्तने सकाळी ८.३० वाजता सुरू होऊन रात्री ८ वाजता या होमाची सांगता होते.

श्रध्दावानांना होमाच्या वेळी केल्या जाणार्‍या आवर्तनात सहभागी होता येते. त्यानंतर श्रद्धावान पुरुष व स्त्रियांना इच्छेनुसार चुनरी किंवा ओटी वैभवलक्ष्मी मातेला अर्पण करता येते. श्रीक्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे साजरा केला जाणारा हा वैभवलक्ष्मी उत्सव म्हणजे श्रद्धावानांसाठी पर्वणीच असते.