श्रीश्वासम्

Shree Shwasam

‘द हिलिंग कोड ऑफ द युनिव्हर्स!’ प्रत्यक्ष आईने, आदिमातेने आपल्या सर्व बाळांना दिलेली ‘सर्वोच्च भेट’ म्हणजेच ‘श्रीश्‍वासम्‌’.

आदिमातेच्या सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट ‘निरोगीकरण’ शक्तीने ही सर्व चराचर सृष्टी व्यापलेली असते. ह्या शक्तीलाच ‘दि युनिव्हर्सल हिलिंग पॉवर’ म्हणजेच ‘अरूला’ असे म्हणतात. ही सर्वव्यापक अरूला शक्ति म्हणजेच आदिमातेचा करूणाघन अनुग्रह- कृपादृष्टी- अर्थात Grace किंवा Unmerited Favour सहाय्य, मदत, आधार असं ही म्हणता येईल. ही कृपादॄष्टी (अरुला) श्रध्दावानांना मिळावी म्हणुनच सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी अत्यंत पवित्र अशा श्रीश्‍वासम्‌ उत्सवाची योजना केली.‍

* मानवाला ही निरोगीकरण शक्ती प्राप्त करून देणारा,
* मानवाच्या जीवनात शरीर, मन, प्राण, प्रज्ञा ह्या सर्व पातळ्यांवर उत्साह निर्माण करून देणारा,
* मानवाचा अभ्युदय घडवून आणणारा,
* श्रद्धावानांचं जीवन सुंदर यशस्वी करणारा,
* श्रद्धावानांच्या आयुष्यात पवित्र व हितकारक परिवर्तन (Transformation) घडवून आणणारा,
* पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, अकरावे मन व बारावी प्रज्ञा तसेच बारा प्राण (स्रोत) यापैकी कुठेही अवरोध निर्माण झाल्यास उत्पन्न होणार्‍या दु:खांना दूर करणारा तसेच, त्यायोगे, अखिल मानवसमूहाला ‘आरोग्यं सुखसंपदा’ प्राप्त करून देणारा!

‘श्रीश्‍वासम्’ थोडक्यात समजावून सांगताना सद्गुरु श्री अनिरुद्धांनी स्पष्ट केले की, ‘श्रीश्‍वासम्’ हा माझा सत्संकल्प आहे. ते आई जगदंबेचे क्रियाशील श्वसन आहे. उदा. म्हणून बघायचे झाले तर एखादी जखम जशी औषध लावल्याने भरून येते, तशीच माझ्याकडे ज्या उचित गोष्टींची कमतरता आहे ते ते मला माझ्या कुवतीनुसार भरून काढण्यासाठी आदिमातेची व तिच्या पुत्राची झालेली कृपा म्हणजे ‘श्रीश्‍वासम्’.

बाळ उदरात असताना त्याच्यासाठी त्याची आईच श्वास घेत असते व तिच्या नाळेतून बाळाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट त्याला पुरविली जाते त्याचवेळी बाळासाठीच्या सर्व अनुचित गोष्टी ती स्वत: स्वीकारते. आदिमातेची कार्यप्रणालीसुद्धा याच प्रकारे समजून घेता येते. आदिमातेशी मला जोडणारी नाळ म्हणजे त्रिविक्रम. पुढे सद्गुरु श्री अनिरुद्ध अधिक व्यापक स्तरावर ह्या उत्सवाचा महिमा स्पष्ट करताना म्हणतात की, ‘श्रीश्‍वासम्’ आपल्या आध्यात्मिक जीवनाचा श्वास बनला तर जीवन आपोआप सुंदर होत राहिल. ‘श्रीश्‍वासम्’ मधून आपलं स्वत:चं आरोग्य जसं सुधारायचं आहे तसंच, संपूर्ण विश्वाचं आरोग्य सुधारण्यासाठी आदिमातेला साद घालायची आहे की, ‘हे आदिमाते, संपूर्ण वसुंधरेचे आरोग्य तू अबाधित ठेव!’ म्हणजेच ‘श्रीश्‍वासम्’ हा व्यक्तिगत तर आहेच पण त्याचबरोबर तो आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी तसेच धर्म, देश, मातृभूमीसाठी तसेच जगातील प्रत्येक चांगल्या जीवासाठीही आहेच.

असा वैशिष्ट्यपूर्ण ‘श्रीश्‍वासम्’ उत्सव सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार सोमवार दिनांक ४ मे २०१५ ते रविवार १० मे २०१५ ह्या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल म्हणजेच श्रीहरिगुरुग्राम वांद्रे येथे अतिशय उत्साहात व श्रद्धावानांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाला

मांडणी – तसबिर

१) मुख्य स्टेजवर चण्डिकाकुलासह अंजनामाता व तिच्या मांडीवर बाल हनुमंत तसेच दुसर्‍या बाजूला शताक्षी (शाकंभरी) माता यांच्या मोठ्या आकाराच्या सुंदर तसबिरी होत्या. त्यांचे उत्सव कालावधीत पूजन केले जात होते.

२) समोर ग्राऊंडमध्ये ‘परिक्रमाकक्ष’ होता तेथे पंचवीस तसबिरींची मांडणी अशाप्रकारे केली होती की श्रद्धावान प्रत्येक तसबिरीचे दर्शन घेत पुढे स्टेजकडे जाऊ शकत होते. त्या २५ तसबीरींचे पूजन करून शहाळे, गहू, हार अर्पण करून सद्गुरु अनिरुद्धांनी अनावरण केले होते.

त्या तसबिरींची मांडणी पुढील प्रमाणे होती :

१. मूलार्क गणपती २. आदिमाता महिषासूरमर्दिनी ३. अवधूत दत्तात्रेय ४. पंचमुखी हनुमान यांच्या तसबिरी होत्या.

त्यानंतर आदिमातेची विविध रुपे दर्शविणार्‍या तसबिरी पुढीलप्रमाणे –

५. आदिमाता नारायणी ६. आदिमाता अंबाबाई ७. आदिमाता बालत्रिपुरा ८. आदिमाता श्रीविद्या ९. आदिमाता रणदुर्गा १०. आदिमाता शारदांबा ११. आदिमाता भूवनेश्वरी १२. आदिमाता दंडनाथा १३. आदिमाता तुळजाभवानी १४. आदिमाता निसर्गमालिनी १५. आदिमाता रेणुका १६. आदिमाता महागौरी १७. आदिमाता महासिद्धेश्वरी १८. आदिमाता मीनाक्षी १९. आदिमाता अष्टभुजा २०. आदिमाता महायोगेश्वरी २१. आदिमाता ‘अदिती’ अर्थात्‘श्री’ अर्थात्‘शून्यानाम्‌शून्यसाक्षिणी’ २२. आदिमाता अनसूया-दुर्गा २३. आदिमाता सप्तशृंगी अशा अतिशय रेखीव, मनोहारी व विविध कार्याननुसार आदिमातेची विविध स्वरुपे दर्शविणार्‍या तसबिरींनंतर
२४. श्रीत्रिविक्रम २५. महाविष्णूच्या पाठीवर आरेखिलेल्या कूर्मपीठाची तसबिरी. ह्या कूर्मपीठाची छोटी तसबीर मुख्य स्टेजवरील आदिमातेच्या मूर्तीच्या चरणांजवळ ठेवली होती. हे कूर्माच्या पाठीवर आलेखलेले श्रीयंत्र अत्यंत पवित्र मानले जाते.

३) मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूच्या हॉलमध्ये महाप्राण हनुमंताची मूर्ती एका बाजूला व समोरील बाजूस दोन अश्विनीकुमारांच्या मूर्ती स्थानापन्न होत्या. ह्या मूर्तींची स्थापना सद्गुरु श्री अनिरुद्धांनी केली होती.

४) हॉलच्या दुसर्‍या बाजूस ‘उषा पुष्करिणी कुंड’ उभारले होते. त्या कुंडातील पाण्यावर श्रीत्रिविक्रमाची पंचधातूची मूर्ती होती, त्या मूर्तीची स्थापना व उषादेवीच्या तसबिरीचे सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पूजन करून अनावरण केले.

उत्सव कार्यक्रम

वैशाख पौर्णिमा ४ मे २०१५ सकाळी ८.०० वाजल्यापासून उत्सवास प्रारंभ झाला. त्याचे वर्णन तीन टप्प्यांमधून करता येईल.
१) जोगवा परिक्रमा २) गुह्यसूक्तम्‌ परिक्रमा आणि ३) समर्पणम्परिक्रमा.

१) जोगवा परिक्रमा –

ही परिक्रमा करण्यापूर्वी श्रद्धावान मंडपात येताना त्यांना ‘नाम’ काढले जात होते व त्यांच्या हाती मूषकाचे (गणपतिचे वाहन) एक चित्र काढलेला कागद देण्यात येत होता. त्याच कागदावर मूषकाच्या एका काढलेल्या चित्राच्या पुढे तीन मूषकांची चित्रे श्रद्धावानाला काढायला सांगण्यात येत होते. याबाबतचा सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सांगितलेला महिमा प्रथम पाहू व नंतर जोगवा परिक्रमा बाबत स्पष्टीकरण पाहू.

Shree Shwasam

मूषक महती – मूलाधार चक्राचा स्वामी महागणपती त्याचे वाहन मूषक. हा मूषक म्हणजे श्वासाचे प्रतीक! श्वासोच्छवास व त्याद्वारे मिळणारी ऊर्जा शरीरात पुरविली जाते. उंदीर जसा बिळात ये-जा करतो तसाच आपला श्वास व उच्छवास (श्वास बाहेर सोडणे) चालू असतो. म्हणूनच घनप्राण असणार्‍या गणपतीचा मूषक कागदावर तीन वेळा काढायचा होता. (१. श्वास नाकातून आत घेणे २. अंत:श्वसन ३. उच्छ्‌वास) हा कागद परिक्रमेच्या सुरूवातीसच मूलार्क गणपतीला अर्पण करायचा होता व त्याला प्रार्थना करायची होती की ‘हे घनप्राणा, तू माझ्या श्वासावर आरूढ होऊन माझ्या त्रिविध देहांचे रक्षण कर!’

Shree Shwasam

यानंतर जोगवा परिक्रमा करताना आदिमातेला अर्पण करण्यात येणार्‍या सुपामध्ये डाळ, तांदूळ, तीन केळी व पत्री घेऊन श्रद्धावान जात होते. सूप घेणे पूर्णपणे ऐच्छिक होते, नुसती परिक्रमा करण्यातही काही श्रद्धावान स्वत:ला धन्य मानत होते. परिक्रमा करताना श्रद्धावानांना आदिमातेच्या विविध फोटोंमधून विविध रुपांचे दर्शन घडत होते. ‘जय जगदंब जय दुर्गे, ॐ नमश्चण्डिकायै, तसेच ‘आई तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे’, ‘सद्गुरुराया, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे’, असा ध्वनी उमटत होता. परिक्रमा पूर्ण होत होती ती त्रिविक्रमाच्या दर्शनाने. ‘हा त्रिविक्रम श्रद्धावानांचा जीवनाचा एकमेव व संपूर्ण आधार आहे’ ही ग्वाहीच जणू परिक्रमा केलेल्या प्रत्येक श्रद्धावानाला त्रिविक्रमाने दिली असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

Shree Shwasam

पुढे ह्या सुपातील पत्री अर्पण करण्यासाठी उभारलेल्या जलकुंडात सुपातील डाळ, तांदूळ व तीन केळ्यांपैकी दोन केळी आदिमातेला अर्पण केली जात होती. डाळ व तांदूळ सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अन्नपूर्णा प्रसादम्‌ योजनेअंतर्गत गरजवंतांपर्यंत पोहचविण्यात आले. तीन केळ्यांपैकी एक केळे प्रसाद म्हणून श्रद्धावानाला देण्यात येत होते. परिक्रमा पूर्ण झाल्यावर श्रद्धावान मुख्य स्टेजवरील चण्डिकाकुल तसेच श्री आदिमातेचे मनोहर व सौम्य स्वरुप असलेली शताक्षीमाता (शाकंभरीदेवी) व अंजनामाता आणि मांडीवरील बालहनुमानाचे खूपच भक्तिभावाने दर्शन घेत होते.

शताक्षीमातेचे (शाकंभरीदेवी) महत्व – सद्गुरु श्री अनिरुद्ध लिखित ‘मातृवात्सल्यविंदानम्’ ह्या त्यांच्या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे शंभर वर्षे सतत दुष्काळ पडल्यामुळे सामान्य मानवांचे हाल पाहून ब्रम्हर्षी अगस्त्य व इतर अनेक महर्षिंनी पराम्बेचे स्तवन केले. तेव्हा ती चण्डिकामाता तेथे साक्षात अवतरली. सर्व महर्षिंनी तिचा एकमुखाने जयजयकार केला व प्रार्थना केली की ‘हे चण्डिकामाते तुझे उग्र रणरागिणी स्वरूप क्षणभर बाजूस सारून तू वत्सला रुपानं सर्व पृथ्वीपुत्रांकडे बघ.’ ऋषिमुनींच्या ह्या पवित्र इच्छेचा सन्मान करण्यासाठी आदिमातेने एक अत्यंत मनोहर व सौम्य स्वरूप धारण केले. आदिमातेच्या ह्या स्वरुपास शतनेत्र होते म्हणून तिला सर्व महर्षिंनी ‘शताक्षी’ हे नामभिधान केले. आदिमाता शताक्षीच्या हातात नवपल्लव शाखा, पुष्प, फल, कंदमुळे, अक्षय्य जलपात्र, धनुष्य, बाण, नांगर अशी साधने व आयुधे होती. शताक्षीने आपल्या शतनेत्रांनी कृपाळू नजरेने सर्व पृथ्वीकडे पाहिले व पृथ्वीस पुन्हा सुपीक वसुंधरा बनविले. ही लीला पाहून अगस्त्य आदि महर्षिंनी तिला शाकंभरी अन्नदा, नीलदुर्गा अशा विविध नामांनी गौरविले.

अशा शताक्षीमातेची तसबिर ‘श्रीश्‍वासम्’उत्सवात मुख्य स्टेजवर विराजमान होती. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ‘ही वसुंधरा सदैव सुजलाम् सुफलाम् रहावी, येथे समृद्धी नांदावी’ यासाठी शाकंभरीमातेला गार्‍हाणे घातले. जवान आणि किसान हे राष्ट्राचे आधारस्तंभ समर्थ व्हावे हाच उदात्त भाव ह्या ‘श्रीश्‍वासम्’मध्ये होता.

श्रद्धावान दर्शन घेत पुढे सरकत असताना १) श्रीमूलार्क गणेशमंत्र २) श्रीदत्तात्रेय स्तोत्रम् ३) श्रीसूक्तम् ४) पंचमुख हनुमानस्तोत्र ५) अश्विनीकुमार सूक्त ६) उषासूक्त हे स्तोत्र व मंत्रपठण एका पाठोपाठ एक असे सतत चालू होते. श्रद्धावान त्यामुळे भक्तिरसात रंगून जात तृप्त होत होते. त्रिविक्रम गायत्री मंत्रही म्हटला जात होता.

ॐ मातृवेदाय विद्महे। श्रीश्वासाय धीमहि। तन्नो त्रिविक्रमः प्रचोदयात्॥

मुख्य स्टेजकडे जाताना व दर्शन घेऊन मुख्य स्टेजकडून पुढे जाताना अशा दोन ठिकाणी उभारलेल्या आशीर्वादरुपी ‘झाली’ खालून श्रद्धावान पुढे बाहेर पडत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनातून सांगितल्याप्रमाणे ती ‘झाल’ म्हणजे आपल्या मोठ्या आईचा – आई चण्डिकेचा पदरच आहे. आईच्या पदराचा प्रत्येक श्रद्धावानाला ‘आसरा’ मिळत होता.

२) गुह्यसूक्तम्‌ परिक्रमा

Shree Shwasam

मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये पंचमुख हनुमंत व अश्विनीकुमारांच्या मूर्तींच्या कक्षेत श्रद्धावानांना परिक्रमा करायची होती. त्यासाठी तीर्थजलाने भरलेला कुंभ हातात घेऊन जाणे अशी सोय केली होती. कुंभात दिलेले जल तापी, इंद्रायणी व पांजरा ह्या पवित्र नद्यांमधून आणण्यात आले होते. श्रद्धावानांनी तीर्थजल कुंभ आपल्या डाव्या हातावर ठेवून त्या कुंभावर आपला उजवा हात ठेवून गुह्यसूक्तम्‌ ऐकत परिक्रमा करायची होती. हेच ह्या उत्सवाचे विशेष आकर्षण होतं.

Shree Shwasam

आज आम्ही पाहतो की, केवळ शारीरिक स्तरावरच नव्हे तर मानसिक व बौद्धिक स्तरांवरही रोगस्थिती निर्माण झाली आहे. नाती, नोकरी-धंदा, प्रपंच, शिक्षण, आर्थिक स्थिती अशा सर्वच स्तरांवर आम्हाला ‘निरोगीकरणाची’ (हिलिंग) गरज निर्माण झाली आहे. व्यक्ति, समाज, राष्ट्र, विश्व अशा सर्व ठिकाणी हे निरोगीकरण आवश्यक आहे हे पाहून सद्गुरु श्री अनिरुद्धांचे पित्याचे हृदय तळमळले आणि मोठ्या आईला अर्थात आदिमाता चण्डिकेला त्यांनी जे गार्‍हाणे घातले त्यातूनच प्रकटले ‘वैश्विक निरोगीकरणम्‌ गुह्यसूक्तम्’!

गर्भावस्थेतील शिशु ज्याप्रमाणे फक्त ऐकतो आणि मातेचा श्वास त्याच्या देहात फिरत असतो त्याप्रमाणेच आम्हा श्रद्धावानांना हे गुह्यसूक्तम् फक्त एकाग्रतेने ऐकायचे आहे. ते ऐकताना आमच्या जीवनातील सर्व प्रकारचे अनुचित ही आदिमाता तिच्या श्वासातून तिच्या ‘स्वत:मध्ये’ सामावून घेते आणि तिची करुणाघन वैश्विक अनुग्रह शक्ती (The Universal Healing Power) तिच्या उच्छ्वासामार्फत बाहेर सोडून श्रद्धावानाच्या श्वासातून त्याच्या देहात खेळवते.

म्हणूनच, गुह्यसूक्तम्‌ची बापूंनी मुक्तहस्ते दिलेली सर्वोत्कृष्ट भेट स्वीकारताना श्रद्धावान तृप्तीच्या सर्वोच्च शिखरावरच होते. हे गुह्यसूक्तम्‌ म्हणजेच ‘द युनिव्हर्सल हिलिंग कोड’ ऐकताना त्याचे प्रेमळ सुंदर शब्द तसेच त्याची चाल व संगीत मनाला विलक्षण शांती, तृप्ती, समाधान बहाल करत होते. गुह्यसूक्तातील प्रत्येक मंत्रमय अक्षर माझ्यात ‘हिलिंग’ करत आहे (म्हणजेच जखम भरून काढत आहे) याची जाणीव होत होती. आदिमातेची चराचरात भरून राहिलेली निरोगीकरणशक्ति श्रद्धावानांना इथे भरभरून मिळत होती. सद्गुरु श्री अनिरुद्ध लिखित मातृवात्सल्य उपनिषदात ‘विगताचा’ प्रवास जसा घडवला गेला तसा माझा जीवनप्रवास श्रीत्रिविक्रम घडवत आहे ह्या भावाने परिक्रमा पूर्ण करून श्रद्धावान पुढे जात होते.

हे गुह्यसूक्तम् केव्हा ऐकावे? तर;
आनंदाच्या क्षणी – आनंद द्विगुणित होण्यासाठी
दु:खाच्या काळात – दु:ख कमी होण्यासाठी
दररोज सकाळी – दिवस चांगला जाण्यासाठी
दररोज रात्री – शांत झोप लागण्यासाठी. तसेच,
आजारपणात – आजार बरा होण्यासाठी.
यासाठीच मराठी, हिंदी, इंग्लिश तसेच संस्कृत या भाषांमधील गुह्यसूक्तम्‌च्या सी. डी. संस्थेद्वारे मिळू शकतात.

३) समर्पण परिक्रमा

Shree Shwasam

गुह्यसूक्तम् प्रदक्षिणा कमीतकमी तीन वेळा पूर्ण केल्यावर श्रद्धावान हातातील जलकुंभ घेऊन हॉलच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या पुष्करिणी तीर्थाजवळ येत होते व उषादेवीची तसबीर आणि त्रिविक्रम मूर्तीकडे बघत बघत तीर्थजल अर्पण करत होते.

श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल वांद्रा) येथून जवळच असणार्‍या उत्तर भारतीय संघ हॉलमध्ये मोठ्या आईच्या (माता चण्डिकेच्या) प्रतिमेसमोर ‘सप्तचक्र-स्वामिनी महापूजन’ करण्याची सोय करण्यात आली होती. हे महापूजन केल्यानंतर श्रद्धावान पुन्हा मूळ मुख्य स्टेज (श्रीहरिगुरुग्राम) वरील शताक्षी (शाकंभरी) देवीसमोर पूजेतील भाज्या व फळ व अंजनामातेला कापडी खण अर्पण करीत होता. हे पूजन कृपेचा स्त्रोत प्राप्त करून देणारे होते. अर्थातच हे पूजनही ऐच्छिक होते.

Shree Shwasam

महानैवेद्य अर्पण सोहळा –

सकाळी ८.०० वाजता, दुपारी माध्यान्हसमयी, रात्री ८.०० वाजता स्टेजवरील देवतांचे पूजन होत असे व महानैवेद्य दुपारी १.०० वाजता व रात्री ८.०० वाजता मंगलवाद्यांच्या गजरात अर्पण होत असे. हा एक अनुपम सोहळा होता.

‘श्रीश्‍वासम्’ची फलश्रुति

१) आदिमातेची निरोगीकरण शक्ती (अरूला) गुह्यसूक्तम्‌द्वारे विनासायास, विनामूल्य श्रद्धावानांना प्राप्त झाली हे सद्गुरु श्री अनिरुद्ध व आदिमातेने दिलेले अचिन्त्यदान आहे.
२) श्रद्धावानांचा संपूर्ण भूतकाळ, अर्थात दुष्प्रारब्ध बदलण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय आहे आणि ते घडणारच कारण तो सद्गुरु श्री अनिरुद्धांचा शब्द आहे असा विश्वास श्रद्धावानांना आहे.
३) ‘श्रीश्‍वासम्’ हे जन्मजन्मांतरासाठी आहे कारण ते सद्गुरु अनिरुद्धांचं वचन आहे, अट एकच ‘संपूर्ण विश्वास’!
४) विश्वाच्या एकमेव अशा कूर्माच्या पाठीवरील श्रीयंत्राचे दर्शन सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपेने श्रद्धावानांना झाले.
५) ‘श्रीश्‍वासम्’ श्रद्धावानांच्या बारा प्रकारच्या अपायांवर उपचार करणारे आहे त्या बाबतची सविस्तर माहिती ‘श्रीश्‍वासम्‌गुह्यसूक्तम्‌’ पुस्तिकेत दिली आहे.

Shree Shwasam

* सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ह्या उत्सवाची सांगता ‘विश्वार्पण कलश’ सोहळ्याने केली. त्यावेळी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांना जो ‘श्वास’ प्राप्त करून दिला तो स्मरणात ठेवा असे सांगितले. ‘माझा श्वास मी तुम्हाला कायमचा दिला आहे’ हे सद्गुरु श्री अनिरुद्धांचे शब्द श्रद्धावानांना तृप्त करून गेले आणि अत्यंत समाधानाने व प्रसन्न चित्ताने पण जड अंत:करणाने ह्या अद्भुत आनंददायी उत्सवाची सांगता झाली.

॥ जय जगदंब जय दुर्गे’॥