भारतीय प्राचीन बलविद्या

   लढाई फक्त शक्तिनेच जिंकली पाहिजे असं अजिबात नाही, मन आणि बुद्धीही आपल्या शरीराच्या बरोबरीने ताकदवान असायला हवी. कारण युद्ध काही फक्त शारीरिक सामर्थ्याचा वापर करून खेळलं जात नाही तर आपल्या मानसिक आणि बौद्धिक पातळीवरूनही खेळलं जातं. म्हणूनच, युद्धकलेच्या प्राच्यविद्येचा अभ्यास करणे आणि त्याचे योग्य ठिकाणी सरावाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.

    सध्याच्या जीवघेण्या स्पर्धा युगामुळे व अनियमित जीवनशैलीमुळे तरुणवर्ग तणावग्रस्त बनला आहे. या तणावामुळे तो स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाही, ज्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. अशा वेळेस शरीर, मन व बुद्धीला चालना देणार्‍या  बहुगुणी ‘भारतीय प्राचीन बलविद्येचे’ प्रशिक्षण तरुणांचे शारीरीक आरोग्य उत्तम ठेवेल. शिवाय मन व बुद्धीला चालना मिळाल्याने ते ज्या क्षेत्रात कार्यरत असतील, त्या क्षेत्रातही चांगले यश मिळविणे त्यांना सहज शक्य होऊ शकेल.

     खरं तर ‘भारतीय प्राचीन बलविद्या’ हा विषय त्याच्या नावावरूनच गूढ वाटतो, ज्याचे कुतूहल व आकर्षण शतकानुशतके विदेशी जनतेलाही वाटत आले आहे. जोपर्यंत ही भारतीय प्राचीन बलविद्या आपल्या देशात कळसाला पोहोचली होती व तिचा आपल्या देशात आदर केला जात होता तोपर्यंत भारतदेशही वैभवाच्या शिखरावर होता. देशातील तरुणांना ह्या प्राचीन बलविद्येचे प्रशिक्षण स्वाभाविकपणे मिळत असल्यामुळे देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणत्याही शत्रूची हिंमत नव्हती. पण काळाच्या ओघात ह्या बलविद्यांचे महत्त्व कमी होऊन त्या हळूहळू लोप पावल्या व त्यानंतर भारत विदेशी आक्रमकांच्या तावडीत गेला.

    ह्या लोप पावलेल्या भारतीय प्राचीन बलविद्यांचे अशारीतीने पुनरुज्जीवन झाले, तर आपला देश पुन्हा आपले गतवैभवाचे स्थान प्राप्त करेल व भारतात पूर्वीचेच सुवर्णयुग अवतरेल, यासाठी भारतीय प्राचीन बलविद्येचे’ संशोधक-मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) (एम.डी. मेडिसिन) गेली अनेक वर्ष ह्या प्राचीन बलविद्येचा अभ्यास करीत होते. एक यशस्वी ’ह्रुमॅटोलॉजिस्ट’ अशी ख्याती असलेल्या डॉ. अनिरुद्धांनी आपल्या अनेक वर्षाच्या व्यासंगाने या भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रकार सर्वांकरीता खुले केले.

    आज या लोप पावलेल्या भारतीय प्राचीन बलविद्या, मुद्गलविद्या व सूर्यभेदन विद्येच्या पुनरुज्जीवनाचे कार्य डॉ. अनिरुद्धांनी हाती घेतले आहे असे म्हटले तर संयुक्तिक ठरेल. आधी स्वत: ह्या विद्यांमध्ये निष्णात झाल्यानंतर स्वत: शिकवून बल आचार्य व विद्यार्थ्यांचा संघ बापूंनी तयार केला आहे. आता डॉ. अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ह्या भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रशिक्षणवर्ग चालवले जातात.

बल विद्येचा इतिहास

   खूप प्राचीन काळी भारतामध्ये ६४ विविध कला आणि ६५ विविध प्रकारच्या विद्या अस्तित्वात होत्या. प्रत्येक प्रकारची कला आणि विद्या पूर्णत्वास पोहोचलेली होती. ह्या सर्वांचा अभ्यास करणार्‍या प्रत्येक व्यक्तिचा सर्वांगिण विकास झालेला होता. अशी व्यक्ति नेहमीच राष्ट्रीय समाजिक आणि कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यात यशस्वी होत असे. अशी विविध कौशल्ये आणि ज्ञानाचा वटवृक्ष ह्यांना एकत्रितपणे बलविद्या असे म्हटले जाते आणि त्यातून मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक शक्तिची वाढ होते. त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी एकत्रितरीत्या काम करण्याची शक्तिसुद्धा प्राप्त होते.

   पण या प्राचीन भारतीय बलविद्येचा इतिहास व्यवस्थितरीत्या व क्रमवार तपशीलासह लिहिण्याची प्राचीन भारतीयांना फारशी सवय नव्हती व त्यामुळे बर्‍याचवेळा परदेशी प्रवाशांचे निरीक्षण भारतीय ग्रंथापेक्षाही प्राचीन भारताची विस्तृत माहिती देणारी ठरते. प्राचीन भारतवर्ष जरी अनेक राज्यांमध्ये विभागलेले असले तरीही वेगवेगळ्या भाषा, आचार, भौगोलिक परिस्थिती व वेगवेगळे उपासनामार्ग ह्या सर्वांना छेद देऊन सर्व भारतवर्षाला सांस्कृतिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या एकसंघ ठेवण्याचे कार्य भारतीय ऋषींनी व आचार्यानी केले.

   अगस्त्य, वसिष्ठ, अंगरिस, पराशर, भारद्वाज, शौनक, याज्ञवल्क, भृगु व विश्वामित्र इत्यादि प्रमुख आचार्यांनी सातत्याने प्रवास करून ही एकात्मता साधली व वेदव्यासांच्या परंपरेने ती जतन केली. भारतात आलेल्या ग्रीकांनी भारतातील सर्व प्रकारच्या शिक्षणाची व गुरुकुल पद्धतीची फार स्तुती केली आणि भारतीय ह्या बाबतीत निष्णात असल्याची ग्वाही दिली आहे.

    या प्राचीन मल्लविद्येविषयी मेगॅस्तनीसने लिहून ठेवले आहे ‘मल्लयुद्धात भारतीय निष्णात आहेत. ते अंगास एक प्रकारचे चिकट तेल लावतात. नंतर मालिश करून घेतात व स्नान करतात. पुरातनकाळापासून धंदेवाईक अंग रगडणारी (मालिश करणारी) माणसे तेथे होती, प्राथमिक व्यायाम करून, जोरबैठका मारून, मुद्गल फिरवित, वाटल्यास लाठीकाठी खेळत, भाला, तलवार (शस्त्र) ह्यांचा सराव करीत. प्राचीन काळात भारतामध्ये मोठमोठे आश्रम होते. त्यापैकी काही नामवंत गाजलेले आश्रम म्हणजे- विश्वामित्र आश्रम, अगस्त्याश्रम, जमदग्नि आश्रम, द्रोणाश्रम, भारद्वाज आश्रम, कृपाश्रम, अग्निवेश आश्रम, सांदीपनी आश्रम (यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे शिक्षण झाले) या प्रमुख आश्रमांबरोबरच बलरामाची मल्लशाळा, २. जरासंधाची मल्लशाळा’.

    स्वत: श्रीपरशुरामांनी भारतातील सर्व प्रकारच्या युद्धविद्या, मल्लविद्या, क्रीडाप्रकार व त्यांच्या शिक्षणपद्धती ह्यांचे देशाटनात निरीक्षण केले व त्यातून स्वत:च्या आश्रमामध्ये नेहमीच्या गुरुकुलाबरोबरच स्वतंत्र ‘बलविद्यासंकुल’ निर्माण केले. या बलविद्यासंकुलात विविध प्रकारच्या बलविद्या शिकवल्या जात होत्या. त्याची माहिती पुढीलप्रमाणे :

त्रिधा बलविद्या

निरनिराळ्या प्रदेशात व निरनिराळ्या आश्रमातून विखुरलेली बलविद्या श्रीपरशुरामांनी श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार अभ्यासपूर्वक व अथक परीश्रमांनी संकलित करून त्यातून ‘त्रिधा बलविद्या’ संहिता तयार केली. हिचे तीन प्रमुख विभाग होते.

१) मुद्गल विद्या – आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या हातातील दंड तिच्याच ‘रक्तदंतिका’ अवताराच्या हातातील व ‘महासरस्वती’ अवताराच्या हातातील मुसळ ह्या शस्त्रांच्या वापराच्या अभ्यासातूनच श्रीपरशुरामाने मुद्गलविद्या सुघटित केली.

तोपर्यंत दंड, काळदंड, मुसळ, हेकट, ओंडा अशा विविध स्वरूपात भारताच्या विविध प्रदेशांमध्ये मुद्गल प्रचलित होते. त्याची आजची आकृती व त्याच्या उपयोगाचे मुद्गलविद्याशास्त्र श्रीपरशुरामाने योगपरमेश्वरी रक्तदंतिकेच्या आशिर्वादाने संपन्न केले. श्री हनुमंत हाही मुद्गलाच्या विविध स्वरूपांचा तज्ञ होता.

‘Defence is Defeat, Attack is Best Defence’. बचाव करून सावरणे व नंतर प्रतिहल्ला (प्रत्याघात करणे) हा मार्ग मुद्गलशास्त्राला मान्य नाही. बचाव व आक्रमण एकाच वेळेस व एकाच कृतीतून साध्य केले जावेत, हे मुद्गलशास्त्राचे मूलतत्व आहे. मुद्गल धीरशास्त्र, कंठमुसल व अस्थिदंड ह्या नावांनीही काही भागात ओळखली जातात.

श्रीपरशुरामांच्या ह्या मुद्गलविद्येमध्ये केवळ शारीरीक हाणामारीचे तंत्र नाही, तर या विद्येच्या सरावामध्ये आपोआपच एकाग्रता, निरीक्षणशक्ती, विरोधीबल जोखण्याचा आवाका, अचूक निर्णयक्षमता व सहज सतर्कता ह्या गुणांची जोपासना होत रहाते. श्रीपरशुरामाने मुद्गलाच्या सर्व प्रकारांची तशीच योजना केलेली आहे.

२) वज्रमुष्टी – ’वज्र’ ह्या शब्दाची ओळख प्रत्येक भारतीयाला असते. देवांचा राजा इंद्र ह्याने दधिचि ऋषींच्या अस्थींमधून हे अस्त्र तयार केले व वृत्रासुरासारख्या अवध्य ठरलेल्या भयानक ताकदीच्या दैत्याचा वध केला. वज्रमुष्टीमध्ये नुसत्या मुठी व हात मजबूत करण्याकडेच लक्ष न देता शरीराच्या प्रत्येक अवयवात सामर्थ्य, शक्ती, धमक, तग धरण्याची क्षमता, दणकटपणा व त्राण ह्यांची वृद्धी कशी होईल, ह्याकडे लक्ष पुरविले जाते. वज्रमुष्टी विद्येतील तज्ञ मनुष्य कितीही किरकोळ अंगकाठीचा दिसला, तरीही त्याने अलगद केलेला प्रहार एखाद्या मल्लालाही सहजपणे लोळवू शकतो.

३) सूर्यभेदनविद्या – सूर्यभेदनविद्येच्या १२ अंगापैकी मंत्रोच्चारासहित केलेले नमस्कार हे प्रथम अंग आहे आणि मूलाधारचक्र पूर्णत: शुद्ध करणे व ते परत कधीही अशुद्ध होणार नाही असा ‘मूलाधार’ प्राप्त करणे हे १२ वे अंग. सूर्यभेदनविद्येच्या अभ्यासामुळे शरीर, मन व बुद्धी ह्या तीन घटकांना एकत्रितरीत्या व समानपणे समर्थ करून महाप्राणाच्या ताब्यात देणे ही अभ्युदयाची क्रिया सोपी होते व त्या मानवास सूर्य व चंद्र ह्या दोघांच्या संतुलित तेजाची प्राप्ती होते.

‘एकीकडे दररोज नवनवीन व अधिकाधिक घातक शस्त्रे जगभर सर्वत्र निर्माण होत आहेत. ह्या क्षेपणास्त्रांपुढे व अणुबॉम्बपुढे किंवा अगदी गावठी हातबॉम्बपुढे ही तुमची प्राचीन त्रिधा बलविद्या किती उपयोगाची ठरणार? हा प्रश्न काहीजणांना पडू शकतो. परंतु ही त्रिधा बलविद्या ह्या आण्विक शस्त्रास्त्रांप्रमाणे केवळ संहारविद्या नाही. ही मनुष्याच्या कुठल्याही क्षेत्रातील क्षमतेचा व कुवतीचा उत्कर्ष करणारी विद्या आहे आणि त्याचबरोबर हे ही लक्षात घेतले पाहिजे की शस्त्रास्त्रापेक्षाही शस्त्र चालविणारा अधिक महत्त्वाचा असतो व त्रिधा बलविद्या उत्कृष्टरित्या शस्त्र वापरणारे वीर निर्माण करते’, असे डॉ. अनिरुद्ध जोशी सांगतात. ‘मुख्य म्हणजे स्वयं श्रीपरशुराम ह्या विद्येच्या रक्षणासाठी अतिवाहिक स्वरूपात वावरत असल्यामुळे ह्या विद्येचा दुरुपयोग कुणासही शक्य नाही.  माझ्या मातेच्या १८ हातातील प्रत्येक शस्त्र व अस्त्र, तिचे स्मरण करून बलविद्या शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी सिद्ध असेल, हा माझा विश्वास आहे.’ असेही डॉ. अनिरुद्ध जोशी म्हणतात.

डॉ. अनिरुद्धांनी दिलेल्या प्रशिक्षणावरून व ह्या प्रशिक्षणवर्गात शिकविल्या जाणार्‍या बलविद्येच्या प्रकारावरून २४ ऑक्टोबर २०१२, विजयादशमी ह्या दिवशी बलविद्येची तंत्रे, हालचाली यांचा अभ्यास, सुव्यवस्थितरित्या मांडणारे ‘भारतीय प्राचीन बलविद्या’ नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतरच सरावासाठी ह्या पुस्तकाचा आधार घेतल्यास अधिक अचूकतेने व जलदरित्या प्रगती साधता येते. बलविद्येत नैपुण्य व अचूकता येण्यासाठी ह्या पुस्तकात सुस्पष्ट रेखाचित्रांचाही वापर करण्यात आला आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थींना नक्कीच फायदा होईल.

ह्या पुस्तकाचा देशातील तरुण वर्गाला विशेष लाभ नक्कीच घेता येऊ शकेल.

बलविद्येचे पुस्तक (टेक्स्टबुक) संकलित करण्यात आलेले आहे. मात्र हा विषय त्याच्या नावामुळे कितीही रहस्यमय वाटत असला, तरी त्यामध्ये खरे तर उघड न करण्यासारखी अशी कुठलीच रहस्ये दडलेली नसल्यामुळे ह्या पुस्तकात (टेक्स्टबुकच्या) रुपाने ‘भारतीय प्राचीन बलविद्ये’ च्या अभ्यासाकरीता खुले करण्याचा उद्देश आहे. ह्या टेक्स्ट्बुकमध्ये परिपूर्णता येण्याच्या दृष्टीने, साधीसुधी तंत्रे आणि हालचाली ह्यांचा शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास करून व त्यांचे नीट वर्गीकरण करून त्यांना सुव्यवस्थितरीत्या मांडण्यात आले आहे.

मात्र हे टेक्स्टबुक हे प्रशिक्षित तज्ञ मार्गदर्शकाला पर्याय ठरू शकत नाही, त्याचा वापर केवळ सरावात सफाई येण्यापुरताच मर्यादित ठेवावा. केवळ टेक्स्टबुक वाचून ही बलविद्या शिकण्याचा प्रयत्न न करता, तज्ञ मार्गदर्शकाच्या देखरेखीखालीच ह्या बलविद्येचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे; कारण सदोष पद्धतीने ह्या बलविद्येचे प्रशिक्षण घेतल्यास वा सराव केल्यास शारीरीक दुखापत होण्याचा संभव जास्त असतो.

बापू म्हणतात, ह्या ग्रंथाच्या रचनेत ‘माझे’ काहीही नाही. हे सर्व माझ्याकडे अनेक स्तरावरील अनेकांकडून आले आहे व महाप्राण श्रीहनुमंताच्या प्रेरणेने माझ्यात रोवले गेले आहे. त्या महाप्राण हनुमंताच्या चरणी हा ग्रंथ सादर समर्पण.

या बलविद्येचे पुस्तक  आपण ई-शॉप आंजनेय’ येथे खरेदी करू शकता. 

WP2FB Auto Publish Powered By : XYZScripts.com