चरखा योजना

या योजनेतील पहिलंच कलम होतं, ‘चरखा योजना’. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात चरख्याने इतिहास घडविला. ह्याच चरख्याच्या सूताने अवघा भारत एकसंध, घट्ट बांधला गेला होता. महात्मा गांधींनी या चरख्याचा वापर ब्रिटीशांविरोधात शस्त्रासारखा केला. स्वदेशी खादी कापड तयार करण्याचे हे शस्त्र हाती घेऊन ब्रिटनमधून आयात होणार्‍या कापडाला त्यांनी लाथाडले होते. परकीय मालाविरोधात सुरू झालेला हा मोठा संघर्ष होता कारण ब्रिटीश येण्यापूर्वी कित्येक वर्ष भारतात कापसाचे पीक घेतले जाई व त्यातून वस्त्रनिर्मिती होत असे. अनेक घरांमध्ये चरख्यावर सूत कातले जात असे. ब्रिटीशांनी हा वस्त्रोद्योगच नष्ट केला आणि आपल्याकडूनच कच्चा माल म्हणून कापूस घेऊन त्यापासून कापड बनवून भारतात आयात करू लागले. ब्रिटीशांविरोधात महात्मा गांधींनी स्वदेशी वस्तू निर्माण करून त्यांचा वापर दैनंदिन जीवनात आणून भारतीयांचा आत्मसन्मान ’चरखा’ हे शस्त्र वापरून जागविला.

३ ऑक्टोबर २००२ रोजी सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी तेरा कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. अन्न-वस्त्र-निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, मात्र आजही भारतात कोट्यवधी नागरिक यापासून वंचित आहेत. चरखा योजनेअंतर्गत श्रद्धावान स्वत: चरखा खरेदी करतात किंवा संस्था किंवा उपासना केंद्रांकडे असलेल्या चरख्यांवर सूत विणतात. यासाठी लागणारे पेळूही श्रद्धावान स्वत:च खरेदी करतात. ज्यांना चरखा चालविणे शक्य नाही, असे कित्येक श्रद्धावान हे पेळू व चरखाही दान करतात. या चरख्यातून निघणार्‍या सुतापासून संस्थेतर्फे कापड तयार केले जाते व या कापडापासून शाळेतील मुलांसाठी गणवेश शिवून त्याचे वाटप केले जाते. श्रद्धावानही आपापल्या घरी सोयीच्या वेळेत हा चरखा चालवून सूत काढतात. तसेच संस्थेतर्फे व विविध उपासना केंद्रांतर्फे वेळोवेळी चरखा शिबीरही आयोजित केले जाते.

सद्‍गुरु बापूंनी ही योजना प्रथम जाहीर केली, तेव्हा एक गोष्ट सांगितली होती. ‘जे कोणी खादी वापरतात, त्यांना माहिती आहे ते कापड फाटता फाटत नाही, टिकाऊ असतं आणि ती आज आमची गरज आहे, स्त्रियांची गरज आहे, विद्यार्थ्यांची गरज आहे.’

‘विद्यार्थ्यांनी विद्या घेणं आवश्यक आहे कारण जोपर्यंत हे विद्यार्थी विद्या घेत नाहीत, तोपर्यंत ह्या भारतामध्ये खूप मोठा समाज आहे, जो अंधश्रद्धांच्या, जातिभेदांच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे, जो राष्ट्रहितापासून दूर आहे. या सगळ्यांना जाणीव व्हायला लागते, स्वतःच्या हक्कांची त्याचप्रमाणे स्वतःच्या कर्तव्यांचीही आणि म्हणूनच पहिल्या कलमाचे ध्येय आहे, नुसत्या मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतातल्या गरीब विद्यार्थ्यांना कपडे विनामूल्य पुरवणं.’

तसेच ‘हे कापड विनामूल्य म्हणजे एकही पैसा, एकही रुपया टोकन म्हणून न घेता भारतातील सर्व जातीच्या, सर्व पंथांच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात येईल, भीक म्हणून नाही, तर आमची भेट म्हणून, हे आम्हाला कळलं पाहिजे. भीक म्हणून आम्ही देणार असू, मदत म्हणून आम्ही देणार असू तर चरखा चालवू नका. मी एकटा चालवीन, त्यातून जेवढं सूत निघेल, ते माझ्यासाठी पुरेसं असेल.’ असे बापूंनी श्रद्धावानांना निक्षून सांगितले होते.

संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला अध्यात्माचाच पाया असतो. श्रद्धावान चरखा चालविताना बापूंनी दिलेला जप सतत म्हणतात. त्यामुळे चरखा चालविताना होणार्‍या शारीरिक श्रमाचे रूपांतर शेवटी भक्तिमय सेवेत होते. अशा श्रमातून तयार झालेल्या सुताचे रूपांतर शेवटी वस्त्र बनण्यात होते. कष्टकरी गरजू, निराधार देश बांधवांना या वस्त्रांची अत्यंत गरज आहे. श्रद्धावान चरखा चालवून श्रमदान करतात व मुखाने नामस्मरण केल्याने ही सेवा परमेश्वर-चरणी अर्पण केली जाते.

२०१० साली ‘श्रीकृष्णाचे हात’ या दैनिक प्रत्यक्षमध्ये बापूंनी लिहलेल्या अग्रलेखात चरख्याबरोबर नाम-जपाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक विशद करून सांगितले आहे.

‘हाताने हँडल फिरवीत असताना व दृष्टीसमोर कापसाचे (पेळूचे) सूत बनत असताना ते पाहताना आपोआप मन बुद्धीच्या कक्षेत स्थिर होत राहते कारण कर्मेंद्रियांनी (हातांनी) करत असलेली निर्मिती तिच्या नाजूकपणासकट दृष्टीमधून अर्थात ज्ञानेंद्रियांमधून बुद्धीला सतत प्रेरित करत राहते व मनाची निर्मितिक्षमता वाढवीत राहते. ह्याच वेळेस जर मुखाने भगवंताचे नामस्मरण चालू असेल तर मनाचे चित्तात रूपांतर होणे अधिक वेगाने घडू शकते व हे चित्तच मनुष्याच्या प्रारब्धनाशासाठी आवश्यक असते.’ असे बापूंनी म्हटले आहे.

दरवर्षी चरख्यातून कातलेल्या सुतापासून ४५ ते ५० हजार मीटर कापड बनविलं जातं. त्यानंतर त्यापासून विविध मापाचे गणवेश शिवण्यात येतात. यासाठी होणार्‍या खर्चाचा भार संस्था उचलते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत…… ४,६७,४५८ मीटर इतके कापड विणून…… १,०८,१२८ इतक्या गणवेशांचे वाटप करण्यात आले आहे.

कोणताही उपक्रम सुरू करण्यापूर्वी संस्था त्या विभागाची पूर्ण पहाणी करूनच तेथील रहिवाशांच्या गरजांनुसार कार्यक्रम राबवण्याचे निश्चित करीत असते. अशा पहाणीत दुर्गम भागांतील शाळांत मुलांची उपस्थिती फारशी नसल्याचं आढळून आलं. जिथे अन्न-वस्त्र ह्याच समस्या आ वासून उभ्या आहेत, तिथे साहजिकच शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. आज संस्थेच्या विद्यमाने कोल्हापूरजवळील आर्थिक दृष्ट्या मागास भागामध्ये २००४ सालापासून वैद्यकीय व आरोग्य शिबिराचं दरवर्षी आयोजन केले जाते. तेथेही आजूबाजूच्या खेड्यांतील शाळांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येते. चरखा योजनेच्या माध्यमातून वस्त्र ही समस्या दूर करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. असेच प्रयत्न भारतात व्यापक प्रमाणावर झाले, तर कदाचित वस्त्राच्या मूलभूत गरजेपासून कोणीही वंचित राहणार नाही.