विद्या प्रकाश योजना

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी २ ऑक्टोंबर २००२ साली तेरा कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. या तेरा कलमी कार्यक्रमातील चौथे कलम होते, ‘विद्या प्रकाश योजना’.

भारतात आजही असंख्य ग्रामीण भाग असे आहेत की तेथे वीज पोहोचलेली नाही आणि ज्या गावांमध्ये वीज पोहोचली आहे, त्यांना दिवसातील काही तासच वीज मिळते. दहा ते अठरा तासांचे भारनियमन होते. ग्रामीण क्षेत्रात बहुतांशी शाळा मध्यवर्ती गावात असतात आणि त्या शाळेत आजूबाजूच्या गावातून मुले येतात. बहुतांश भागात ही मुले पायीच मोठे अंतर कापतात. थकून भागून संध्याकाळी घरी आलेली मुले आपला आभ्यास करणार कधी? सूर्यास्तानंतर वीज नसेल तर मुलांना आपला अभ्यास करता येत नाही. यामुळे आपल्याकडे क्षमता असूनही अनेक मुले आपली शैक्षणिक प्रगती साधू शकत नाहीत. त्यांच्या शैक्षणिक विकासाला खीळ बसते. विद्याप्रकाश योजनेद्वारे अशाच मुलांना काळोखात प्रकाश उपलब्ध करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्याचा सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा संकल्प आहे.

वीजेची उपलब्धता नसलेल्या भागातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची, गृहपाठाची समस्या सोडविण्यासाठी विद्याप्रकाश योजनेअंतर्गत अशा ठिकाणी मेणबत्त्या आणि काडेपेटी यांचे वाटप केले जाते. या मेणबत्तीच्या प्रकाशात ही मुले अभ्यास करू शकतात. या विद्याप्रकाश योजनेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी विजेवर अवलंबून रहावे लागत नाही.

या विद्याप्रकाश योजनेचे एक आध्यात्मिक महत्त्वही आहे. श्रीराम म्हणजेच सूर्य, आपल्या जीवनातील प्रकाश. जीवनातील सकारात्मकता म्हणजेच श्रीराम, जो आपल्याला जीवनातील नकारात्मकतेशी, अंधाराशी आणि सैतानाशी लढण्याची ताकद देतो. या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मेणबत्त्या भेट देणे म्हणजे प्रकाशाचा आणि जीवनाचा मूळ स्रोत असणार्‍या श्रीरामाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करणे होय. या विद्यार्थ्यांना जीवनात विद्येचा प्रकाश आणल्याने श्रद्धावानांचे जीवनसुद्धा प्रकाशमान होते.

या विद्याप्रकाश योजनेसाठी अनेक श्रध्दावान मेणबत्ती व काडेपेट्या दान करतात. श्रीहरिगुरुग्राम अथवा श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रांवर दान स्वीकारले जाते. अनेकजण तर आपल्या जीवनातील विशेष प्रसंगी उदाहरणार्थ वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या वेळेस मेणबत्ती व काडेपेट्यांचे दान करतात. श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, अशा दान स्वरूपात आलेल्या या मेणबत्त्या आणि काडेपेट्यांचे दुर्गम गावातील गरजू विद्यार्थांना वाटप करते.

या मेणबत्त्यांचे वाटप धुळे, नांदेड येथील गावांमध्ये होत होते. तसेच शहापूर व कोल्हापूर आणि विरार येथे होणार्‍या वैद्यकिय शिबिरातदेखील हे वाटप केले जाते. या मेणबत्त्यांचे वाटप विद्यार्थ्यांना वर्षभर करण्यात येते.

ज्या भागातील गावांमध्ये विद्याप्रकाश योजनेअंतर्गत या वस्तूंचे वाटप करण्यात आले, तेथे विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटल्याचे लक्षात आले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. विद्यार्थांची चांगली प्रगती घडून आलेली आहे. एक सक्षम व साक्षर भारत घडविण्यात विद्या प्रकाश योजना आपले छोटेसे योगदान देत आहे.