श्रीअश्वत्थमारुती पूजन

प्रत्येक माणसाचा भक्तिमार्गावरील प्रवास, त्याचे भक्तिमार्गावरील प्रत्येक पाऊल हे हनुमंताच्या मार्गदर्शनानेच पुढे टाकले जाते. श्रीहनुमंतच बोट धरून श्रद्धावानाला भक्तिमार्गाने पुढे नेतो म्हणूनच हनुमंतांची भक्ती आवश्यक ठरते. आपल्या पंचगुरुंपैकी एक असणारा हनुमंत, हा आपला ‘रक्षकगुरु’ आहे.

– सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू

संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी यांनी हनुमान चलिसामधून ‘नासै रोग हरे सब पीरा| जो सुमिरै हनुमत बलबीरा|’ असे ज्याचे वर्णन केले आहे, अशा संकटमोचन हनुमंताची भक्ती करण्याचा किंबहुना त्याचे बोट पकडून भक्तीमार्गावर पाऊल टाकण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे ‘श्रीअश्‍वत्थमारुती पूजन’. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये ‘व्रत-पूजना’साठी अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या श्रावण महिन्यात आयोजित करण्यात येणारे हे पूजन म्हणजे भक्ताला भक्तिमार्गावरून प्रवास घडवणार्‍या हनुमंताला केलेले वंदन ठरते. गुरुस्थानी असणार्‍या या श्रीहनुमंताला वंदन करताना ‘अश्‍वत्थ’ वृक्षाची लाभलेली साथ म्हणजे वरदानच आहे. त्याचं मूळ या वृक्षाच्या माहात्म्यात दडलेलं आहे.

‘अश्‍वत्थ’ म्हणजे पिंपळ वृक्ष. या वृक्षाचे भारतीय शास्त्रांमधील स्थान असाधारण आहे. ‘ऊर्ध्व (वरच्या) दिशेने मुळे व अधो (खालच्या) दिशेने फांद्या’ असे संसाररूपी अश्वत्थ वृक्षाचे वर्णन केले गेले आहे. त्यामुळे ‘अश्‍वत्थवृक्ष’ परमात्मा व संपूर्ण विश्वाचे नाते स्पष्ट करणारा मानला गेला आहे (म्हणजेच मूळ परमात्म्याची दिशा वर आणि त्याची छत्रछाया खाली संपूर्ण विश्वावर असते). भगवान श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये स्वत:चे वर्णन करताना ‘वृक्षांमध्ये मी अश्‍वत्थ आहे’ असे सांगून ह्या वृक्षाचे महत्त्व अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे. यामुळेच पूजनामध्ये ‘अश्‍वत्थ’ वृक्षाचा समावेश आहे.

आपल्याकडे येणार्‍या प्रत्येकाला ‘श्रीहनुमंत’ व ‘अश्‍वत्थ’ वृक्षाचे महत्त्व तसेच पावित्र्य आणि त्याच्या पूजनाबाबत माहिती व्हावी, या सुंदर हेतूने सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी १९९७ साली ‘अश्‍वत्थ मारुती पूजन’ सुरू केले. ‘सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूं’नी एकसंध पाषाणातून कोरलेली श्रीहनुमंताची ‘एकमेवाव्दितीय’ रेखीव मूर्ती ही या ‘पूजन’ उत्सवाच्या केंद्रस्थानी आहे. प्रतिवर्षी हा उत्सव श्रावण महिन्याच्या दर शनिवारी ‘श्रीक्षेत्र सद्गुरु निवास-गुरुकुल, जुईनगर’ साजरा करण्यात येतो. श्रावण महिन्यातील अखेरच्या शनिवारी ‘श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्, खार’ येथे ‘अश्‍वत्थ मारुती पूजन’ सोहळा पार पडतो.

पूजनमांडणी, पूजनविधी व दर्शनसोहळा अशा क्रमबद्ध रितीने ‘अश्‍वत्थ मारुती पूजन’ उत्सवाचे नेटके आयोजन करण्यात येते.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पाषाणात कोरलेल्या श्रीहनुमंताच्या शिल्पाकृतीच्या मागे अश्‍वत्थ वृक्षाची (पिंपळ) एक फांदी प्रतीक म्हणून ठेवण्यात येते. ह्या शिल्पाकृतीच्या समोर तांब्याच्या परातीमध्ये श्रीहनुमंताची धातूची रेखीव मूर्ती ठेवलेली असते. सजावटीसाठी मागील बाजूस ऊसाच्या कांडापासून बनविलेली महिरप तयार केली जाते. प्रपाठकांचा एक गट अखंड पठण करत असतो.

सर्वप्रथम अश्‍वत्थाच्या (पिंपळाच्या) फांदीचे पूजन होते. अश्‍वत्थ पूजनाच्या कालावधीत, ‘ॐ अश्वत्थाय नम:|’, ‘ॐ ऊर्ध्वमुखाय नम:|’, ‘ॐ वनस्पतये नम:|’ अशा मंत्रोच्चारात वैदिक पद्धतीने पूजा होते व त्यानंतर नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर श्रीहनुमंताच्या शिल्पाकृतीचे षोडशोपचारे पूजन होते. ह्यावेळी ‘श्रीपंचमुखहनुमत्कवच’, संकटमोचन श्रीहनुमानस्तोत्र व ‘ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:| या मंत्राचे (५४ वेळा)’ चे पठण होते.

यावेळी पाच अविवाहित पुरुष श्रद्धावानांकडून शेंदूर अर्चन होते व लाह्या अर्पण केल्या जातात. समोर ठेवलेल्या परातीमधील छोट्या हनुमंताच्या मूर्तीवर नियोजित दांपत्याकडून दुधाचा अभिषेक केला जातो. ह्या बरोबरीने पंचमुखी हनुमंताच्या मूर्तीवरही अभिषेक होतो. यावेळी इच्छुक भाविकांना सुपारीवर प्रतिकात्मक अभिषेक करता येतो. सर्व श्रद्धावान भाविकांना शिल्पाकृती हनुमंताच्या मूर्तीला शेंदूर लावून दर्शन घेता येते. ‘भीमरुपी महारुद्रा’ या मारुतीस्तोत्राने व पूर्णाहुतीने पूजेची सांगता होते.

श्रीहनुमंताची माता म्हणजे अंजनीमाता. तिचे प्रतीक म्हणून हनुमंताच्या मूर्तीसमोर धुनीमाता उभारलेली असते व तिचीही पूजा केली जाते. धुनीमातेच्या पूजनात प्रज्वलित धुनीमध्ये लाह्या, कापूर, समिधा वाहिल्या जातात. धुनीमातेला हळद-कुंकू वाहून तिची पूर्ण ओटी भरली जाते. रात्री धुनीमाता शांत केली जाते. रामरक्षा, हनुमानचलिसा व अनिरुद्धचलिसाच्या पठणाने उत्सवाची सांगता होते.

एकाच वेळी परमात्म्याचे ‘महाप्राण’ स्वरुप आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा भक्तोत्तम अशा दोन अनोख्या रुपांचा संगम असणार्‍या ‘श्रीहनुमंता’चे पवित्र पूजन म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘श्रीअश्‍वत्थमारुती पूजन’ उत्सवाचे लाभ अतिशय महत्त्वाचे व जीवनात आमूलाग्र बदलांची सुरुवात घडविणारे आहेत. या पूजनाने, जीवनातील चुका सुधारण्यासाठी शक्ति व युक्ति यांचा स्रोत श्रीहनुमंताकडून प्रवाहित होतो.

आयुष्यातील संकटे व पापांना दूर करण्याचा मार्ग देणार्‍या ‘श्रीअश्‍वत्थमारुती पूजन’ उत्सवातील सहभागाने क्रोध व भय यांचे प्राबल्य कमी होते. प्रत्येक मानवाच्या जीवनात येणार्‍या शनिच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो व ग्रहांचे अनिष्ट परिणामही रोखले जातात. श्रीतुलसीदासांनी ‘हनुमान चलिसा’मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ‘जनम जनम के दुख बिसरावै|’चे सामर्थ्य असणार्‍या श्रीहनुमंताच्या भक्तीमध्ये वाढ करणारा हा ‘श्रीअश्‍वत्थमारुती पूजन’ म्हणजे अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्यात मिळणारी सुवर्णसंधीच आहे.