अहिल्या संघ

 AniruddhaFoundation-Ahilya-Sangha

वर्षानुवर्षे कापल्या गेलेल्या ‘स्त्री’ शक्तीला परत एकदा जागृत करण्यासाठी, परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २००२ ला अहिल्या संघाची स्थापना झाली.

पुराणातल्या अहिल्येसारखी युगानुयुगे शिळाव्रत जीवन जगण्याची परिस्थिती कुठल्याही महिलेवर येऊ नये म्हणून चालविलेले अभियान म्हणजे ‘अहिल्या संघ’. ‘अहिल्या संघ’ हे कोणतेही स्त्री-मुक्ती आंदोलन नव्हे, तर स्त्रियांनी आपली अमाप शक्ती व सामर्थ्य ओळखून त्याचा उपयोग, स्वत:च्या, कुटुंबाच्या, समाजाच्या व पर्यायाने देशाच्या विकासासाठी करता यावा म्हणून केलेला प्रयास.

‘बलविद्या’ प्रशिक्षण :-

स्त्रियांना विविध क्षेत्रातील शैक्षणिक मार्ग मोकळे झाल्याने, अनेक स्त्रिया शिक्षणासाठी तसेच आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडतात. पण आजही त्या म्हणाव्या तशा सुरक्षित नाहीत. रस्त्यावर, गाडीत प्रवास करताना, ऑफिसच काय पण कधी कधी घरात देखील त्यांना मानसिक व शारिरीक अत्याचारांना सामोरे जावे लागते. कुठल्याही बिकट परिस्थितीला स्त्रियांना समर्थपणे सामोरे जाता यावे म्हणून स्त्रियांनी स्वयंनिर्भर, स्वसंरक्षित, तसेच शरीर, मन व बुध्दी ह्या तिनही स्तरांवर सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शरीर, मन व बुध्दी ह्या तीनही स्तरांवर सक्षम बनविण्यासाठी, अहिल्या संघातर्फे ‘प्राच्यविद्या’ अथवा ‘बलविद्या’ प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येतो. इतरांकडून आपल्या संरक्षणाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा, स्त्रीला स्वत:चे संरक्षण स्वत: करता यावे, तसेच अडचणीत सापडलेल्या इतर स्त्रियांनाही मदत करता यावी, ह्या हेतुने हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेले आहेत.

“Defence is defeat, attack is defence” म्हणजेच आक्रमण अथवा हल्ला हेच बचावाचे सूत्र आहे – ह्या तत्वावर ‘बलविद्या’ प्रशिक्षण दिले जाते. ह्या ‘बलविद्या’ प्रशिक्षणात पूर्व प्राथमिक सूर्यनमस्कार, विविध व्यायाम प्रकार, हस्तलाघव, हस्तकौशल्य, मुष्ठीलाघव, मुद्गलविद्या अशा अनेक प्राच्यविद्यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येते. आतापर्यंत ’बलविद्या’ प्रशिक्षणाच्या एकूण २१ बॅचेस झाल्या व एकूण १५२० स्त्रियांनी ह्याचा लाभ घेतला.

अहिल्या संघातर्फे ‘सूर्यनमस्कार शिबिराचे’ देखिल आयोजन करण्यात येते. आतापर्यंत अहिल्या संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर ३८ शिबीरे आयोजित केली गेली. त्याचा लाभ २०६० स्त्रियांनी घेतला.

वृक्षारोपण सेवा –

परमेश्वराने स्त्रियांना वात्सल्याची निसर्गदत्त देणगी बहाल केली आहे. जितक्या प्रेमाने ती लहान बाळांचे संगोपन करु शकते तितक्याच प्रेमाने ती वृक्षांचे पण संगोपन व संवर्धन करु शकते. म्हणूनच, जास्तीत जास्त स्त्रियांना सहभागी करुन अहिल्या संघातर्फे वृक्षारोपण सेवा देखील राबविण्यात येते. आतापर्यंत अहिल्या संघातर्फे १५१४ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.