गुरुपौर्णिमा

‘एक विश्‍वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरू ऐसा।’

भारतीय संस्कृतीत ‘गुरुपौर्णिमा’ उत्सवाला अन्यनसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला हे पर्व भारताच्या कानाकोपर्‍यात साजरे केले जाते. याच दिवशी आदिगुरु वेदव्यासांचा जन्म झाला होता. त्यामुळे  ह्या दिवसाला ‘व्यासपौर्णिमा’ही म्हणतात. सद्गुरुंच्या ऋणांचे आणि त्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे स्मरण करून ‘सद्गुरुंची सत्ता आपल्या आयुष्यात अखंड रहावी’ या भावातून सद्गुरुंना वंदन करून, त्यांचे पूजन करून हा उत्सव साजरा केला जातो.

या उत्सवाची परंपरा भारतात कशी सुरू झाली याची एक सुंदर कथा सांगितली जाते. अठरा पुराणे, महाभारतासारखे महाकाव्य लिहूनसुद्धा महर्षि वेदव्यासांचे तृप्त आणि समाधानी नव्हते. त्यांचे चित्त अशांत होते. अशा वेळी महर्षि वेदव्यासांचे गुरू नारदमुनी यांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांना श्रीकृष्णाच्या गुणसंकीर्तन करणार्‍या ग्रंथाची रचना करण्याची आज्ञा केली. महर्षि व्यासांनी ही आज्ञा शिरोधार्य मानून त्याचे तंतोतंत पालन केले व त्यांना गुरुवचनाची विलक्षण अनुभूती आली. ‘गुरुंचे आज्ञापालन केल्यानेच शांती, तृप्ती व समाधान मिळते. त्यांची आज्ञा हाच माझा संकल्प असे जेव्हा मी मानतो व त्याप्रमाणे जगतो तेव्हाच हा नरजन्म सार्थकी लागतो’ हा बोध व्यासमहर्षिंच्या या कथेने आम्हाला दिला. महर्षि वेदव्यासांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ अवघ्या भारतात साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याची ही कथा आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि सलग्न संस्थेतर्फे दरवर्षी ‘गुरुपौर्णिमा’ उत्सवपर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यामध्ये लाखो श्रद्धावान सहभागी होतात. संस्थेतर्फे पहिला गुरुपौर्णिमा उत्सव १९९६ साली दादर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता व त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.

या उत्सवाची सुरुवात सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या (बापू) घरातील गुरुपादुकांच्या अर्थात श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांच्या आगमनाने होते. याबराबेर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या देवघरातील श्रीगुरुदत्तात्रेयांची मूर्ती उत्सवस्थळी आणली जाते. श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांचे उत्सवस्थळी षोडश पुजन होते. त्यावर जलाभिषेक केला जातो. त्यानंतर या पादुकांच्या दर्शनाचा लाभ श्रद्धवानांना लुटता येतो. गुरुगीतेत सद्गुरुंचे चरणकमल सकलतीर्थमय असल्याचा उल्लेख येतो. त्यामुळे  श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांवर होणार्‍या जल-अभिषेकातील जल नंतर तीर्थ म्हणून श्रद्धवानांना दिले जाते.

तसेच श्रीगुरुदत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नम:|’ या मन्त्राचे अखंड पठण होते. (’द्राम्’ हा श्रीगुरु दत्तात्रेयांचा बीजमन्त्र आहे. दत्तमालामंत्रात ’द्राम्’ बीजाचा उल्लेख आहे.)

याशिवाय उत्सवस्थळी मूळ सद्गुरुतत्वस्वरूप स्वयंभगवान श्री त्रिविक्रमाचे  पूजन केले जाते.

त्रिविक्रम पूजनाचे महत्व

‘खरोखरच त्रिविक्रमाचा स्पर्श ज्याच्या बुद्धिला, मनाला किंवा तनुला एकदा तरी झाला आणि त्या व्यक्तिने तो भावस्पर्श भक्तीने किंवा पश्चात्तापाने किंवा चूक सुधारून स्वीकारला की त्या भक्ताचं जीवन म्हणजे सौंदर्याची खाणच बनते.’, असे बापू दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र १४८३ मध्ये स्पष्ट उल्लेख करतात.

‘श्रद्धवानांच्या जीवनात येणार्‍या संकटांच्या वेळी मूळ सद्गुरुतत्व अर्थात त्रिविक्रम श्रद्धवानाला आपल्याशी बांधून ठेवतो आणि खर्‍या श्रद्धवानाला कोणत्याही संकटातून दूर करतो. त्रिविक्रम कोणत्या मार्गाने श्रद्धवानाचे सहाय्य करतो, याची कल्पनाही श्रद्धवानाला येऊ शकत नाही’, असे  मूळ सद्गुरुतत्व असलेल्या त्रिविक्रमाबद्दल बापूंनी तुलसीपत्र १४६४ मध्ये लिहले आहे.

‘त्रिविक्रमाची पूजा, उपासना व कुठल्याही प्रकारची भक्ती करणे हा श्रद्धावानांना कुठल्याही पातळीवरील व कुठल्याही प्रकारचे अभाव, दैन्य व दुर्बलता दूर करण्याचा निश्चित मंगलदायी मार्ग आहे कारण त्रिविक्रम हा स्वत: ‘सगुण’ असून नव-अंकुर-ऐश्वर्यांनी खच्चून भरलेला आहे. हा त्रिविक्रम त्याच्या भक्तांना त्यांच्या त्रिविक्रमावरील श्रद्धेच्या व विश्वासाच्या चौपट फल देत राहतो’,. ‘हा त्रिविक्रम म्हणजे ह्या त्रिमितीतील (थ्री-डायमेन्शनल) जगात केवळ श्रद्धावानांसाठीच असणारा त्रिविध आधार आहे.’ असा उल्लेख तुलसीपत्र अग्रलेख क्र. ५२० मध्ये येतो.

अशा या भगवान त्रिविक्रमाच्या पूजनाची संधी या उत्सवात श्रद्धवानांना प्राप्त होते.

त्रिविक्रमाची उपासना अथवा पूजा ही केवळ ‘साकाराची’ किंवा पवित्र आकृतीची उपासना किंवा पूजा नाही, तर ती पवित्रतम व महादिव्य ‘सगुणाची’ उपासना आहे, गुणांची उपासना आहे. उत्सव स्थळावर त्रिविक्रम पूजनाच्या ठिकाणी मध्यभागी त्रिविक्रम लिंग असते, तर प्रत्येक पूजक श्रद्धवानासमोरील तबकात तीन पावले असतात. त्रिविक्रमाची ही तीन पावले म्हणजे अकारण कारुण्य, क्षमा व भक्तीचा स्वीकार. याच आपल्या तीन पावलांनी त्रिविक्रम नेहमी श्रद्धावानाच्या आयुष्यातील दुष्प्रारब्ध नष्ट करत असतो व श्रद्धवानाच्या जीवनात आनंद फुलवतो. या तबकातील तीन पावलांचे पूजन म्हणजे त्रिविक्रमाने आपल्या या पावलांनी आमचे जीवन व्यापावे, ही श्रद्धवानांनी केलेली त्रिविक्रमाला प्रार्थना.

भक्तिस्तंभाभोवती प्रदक्षिणा

गुरुपौर्णिमा उत्सवातील हा एकमहत्त्वाचा भाग! मध्यभागी उभारलेल्या भक्तिस्तंभावर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या ‘नित्यगुरुंच्या’ पादुका ठेवलेल्या असतात. तसेच अवधूतचिंतन उत्सवातील दोन अवधूतकुंभ सुद्धा ठेवलेले असतात. 

रामनाम वहीच्या पानांच्या लगद्यापासून बनविलेल्या रामनाम इष्टिका आपल्या शिरावर घेऊन गजराच्या तालात भक्तिस्तंभाभोवती श्रद्धावानांना प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळते, अर्थातच तेथील पवित्र स्पंदनांचा लाभ सर्व श्रद्धावानांना तेथे मिळतोच.

‘माझ्या सदगुरुभक्तीच्या इष्टिकेवर माझी सद्गुरुमाऊली उभी आहे आणि ही सद्गुरुभक्तीची इष्टिका शिरावर घेऊन मी सद्गुरुप्रदक्षिणा करत आहे, जेणेकरून सद्गुपरुरायाचे चरण माझ्या हृदयात कायमचे स्थानापन्न व्हावेत’ (कीजै नाथ हृदय महँ डेरा) हा भक्तिभाव धारण करून श्रद्धावान भक्तिस्तंभाभोवती प्रदक्षिणा घालतात.

याशिवाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तिगंगेमधून म्हणजेच सर्व श्रद्धावानांमधून सद्गुरु अनिरुद्धांची पद्‌चिन्हे ठेवलेली पालखी फिरविली जाते. ही पालखी घेऊन जाणारी दिंडी वाजत-गाजत, गजर करत उत्सव ठिकाणी सर्वत्र उत्सव ठिकाणी फिरत असते. यावेळी या पदचिन्हांवर मस्तक ठेवण्याची व दर्शन घेण्याची संधी प्रत्येक श्रद्धावानाला मिळते. या पदचिन्हांवर माथा टेकवणे हे प्रत्यक्ष सद्गुरु चरणांवर माथा टेकवणेच आहे, ही श्रद्धावानांची श्रद्धा असते.

गुरुपौर्णिमेला दिवसभर अखंड प्रज्वलित असलेल्या अग्निहोत्रात सर्व श्रद्धावानांना ऊद अर्पण करता येतो आणि श्रद्धावान योगक्षेमासाठी प्रार्थना करतात.

दर एक तासाने श्रीअनिरुद्धचलिसाचे पठण होते, त्याचा लाभ श्रद्धावानांना घेता येतो.

याशिवाय सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी हस्तस्पर्श केलेला ऊदी प्रसाद सर्व श्रद्धावानांना दिला जातो. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे दर्शन रात्रौ ९.०० वाजेपर्यंत श्रद्धावानांना घेता येते व त्यानंतर महाआरती होते.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध श्रद्धावानांकडून कधीच कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा, भेटवस्तू, ग्रीटींग कार्ड, फळे, हार, मिठाई, पैसे इ. काहीही स्वीकारत नाहीत.

गुरुकृपेचा व गुरुभक्तीचा आनंद लुटण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सद्गुरुंप्रति कृतज्ञताभाव व अढळ श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सद्गुरु श्री अनिरुद्धांबद्दल सप्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धावान गुरुपौर्णिमेचा दिवस सद्गुरुंच्या सान्निध्यात साजरा करतात.

‘अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो’ या ऋणज्ञापक स्तोत्रातील हाच भाव घेऊन या पावन दिवशी सद्गुरुंचे दर्शन घेतात.