शिर्डी रसयात्रा

गुरुनाम आणि गुरुसहवास | गुरुकृपा आणि गुरुचरणपायस | गुरुमन्त्र आणि गुरुगृहवास | महत्प्रयास प्राप्ती ही ॥

श्रीसाईनाथांचे चरित्र लिहिणारे श्रेष्ठ साईभक्त श्री. गोविंद रघुनाथ दाभोळकर अर्थात हेमाडपंत यांनी लिहिलेल्या श्रीसाईसच्चरिताच्या पहिल्या अध्यायात ५८व्या ओवीमध्ये सद्गुरु सहवासाबाबत सांगितले आहे. असा हा सद्गुरु सहवास श्रीक्षेत्र शिर्डी रसयात्रेच्या निमित्ताने शेकडो श्रद्धावानांना पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला.

भारतीय संस्कृतीत तीर्थयात्रेला फार मोठे महत्त्व आहे. त्यातही आपल्या सद्गुरुंसह अशा पुण्यप्रद तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी मिळणे ही पर्वणीच असते. सद्गुरु श्री अनिरुद्धांसह चार रसयात्रा आणि एक भावयात्रा करण्याचे महद्भाग्य श्रद्धावानांना प्राप्त झाले.

‘साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी’ने सर्वप्रथम शिर्डी त्यानंतर पुढे अक्कलकोट, देहू-आळंदी आणि गोवा येथे रसयात्रा आयोजित केल्या आणि श्रद्धावानांनी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार या रसयात्रांमध्ये भक्तिरस संग्रहित करून आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार केला.

चार रसयात्रांचा क्रम –

‘श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी’ या नावातच चार रसयात्रांचे संकेत आहेत. साई (शिर्डीचे ‘साईनाथ’), समर्थ (अक्कलकोटचे ‘स्वामी समर्थ’), विज्ञान (‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ – आळंदीचे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि देहूचे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज) आणि प्रबोधिनी (भक्तांना बोध प्रदान करणारा ज्ञानोपदेष्टा शिव ‘मंगेश’ आणि त्याची अर्धांगिनी शांतादुर्गा) अशा या संकेतक्रमास अनुसरून चार रसयात्रांचे आयोजन केले गेले.

त्यानंतर पंढरपुर भावयात्रा झाली. ‘भाव तोचि देव’ हे तत्त्व स्पष्टपणे सांगत विठ्ठलचरणी रत असलेल्या संतांनी आपल्या रचनांमधून भगवंताप्रतीचा त्यांचा भक्तिभाव सर्वांना मुक्तहस्ताने दिला. चार रसयात्रांच्या आयोजनानंतर सर्व संतांचा भाव ज्याच्या चरणी एकवटला आहे, त्या श्रीक्षेत्र पंढरपुरची भावयात्रा सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित केली गेली.

चार रसयात्रांपैकी पहिली रसयात्रा – श्रीक्षेत्र शिर्डी रसयात्रा.

श्रीक्षेत्र शिर्डी रसयात्रा संकल्पना

‘साईनाथ माझे दिग्दर्शक गुरु आहेत’ हे श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराजात सुस्पष्टपणे सांगणारे सद्गुरु श्री अनिरुद्ध नेहमी म्हणतात की ‘श्रीसाईसच्चरित’ हा पवित्र ग्रंथ हे सद्गुरु श्रीसाईनाथांचे चरित्र तर आहेच, पण त्याचबरोबर हे साईनाथांच्या भक्तांचेही आचरित आहे. सद्गुरु श्री साईनाथांच्या या साईभक्तांकडून सद्गुरुभक्तीचा रस ग्रहण करण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शानाखाली सर्वप्रथम शिर्डी रसयात्रा आयोजित करण्यात आली. २२ व २३ सप्टेंबर १९९६ या दोन दिवसांसाठी ही रसयात्रा आयोजित केली गेली होती आणि अनेक श्रद्धावान त्यात भक्तिभावाने सहभागी झाले.

 

श्रीक्षेत्र शिर्डी रसयात्रेतील उपासना

) श्री साई गायत्री मंत्राची उपासना –

ॐ भूर्भुव: स्व:| ॐ साईनाथाय विद्महे| पूर्णपुरुषाय धीमहि| तन्नो सद्गुरु: प्रचोदयात्॥

हा श्री साईगायत्री मंत्र साईभक्तांमध्ये प्रचलित आहे. शिर्डी रसयात्रेत सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ह्या श्री साईगायत्री मंत्राचा जप उपस्थित श्रद्धावानांकडून करून घेतला. यावेळी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ह्या श्री साईगायत्री मंत्राचे महत्त्व सविस्तर समजावून सांगितले. त्यानंतर यमुनेच्या खोर्‍यातून आणलेल्या चिकणमातीचा गोळा केळीच्या पानावर प्रत्येक श्रद्धावानाला देण्यात आला. त्या मातीच्या गोळ्यापासून श्रीसाईनाथांच्या प्रतिकात्मक पादुका तयार करण्यास श्रद्धावानांना सांगितले गेले.

याबरोबरच श्रीसाईनाथांच्या ‘लोण्याच्या पादुका’ श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंतांचे नातू अप्पासाहेब दाभोळकर आणि अप्पासाहेबांच्या पत्नी म्हणजेच हेमाडपंतांची नातसून असणार्‍या मीनावैनी दाभोळकर ह्या श्रेष्ठ श्रध्दावान दांपत्याने सद्गुरु अनिरुध्दांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या होत्या. लोणी अर्थात नवनीत हे भक्तीचे निदर्शक मानले जाते आणि म्हणूनच सद्गुरुभक्तीरूपी लोण्याच्या पादुका साईचरणी अर्पण करण्यात आल्या.

लहानपणी श्रीसाईनाथांच्या मांडीवर खेळलेले, बागडलेले व साईनाथांच्या सहवासात राहिलेले भक्तश्रेष्ठ चौबळ आजोबा व चौबळ आजींनी या नवनीत-पादुकांवर सर्व श्रध्दावानांच्या वतीने समर्पणाचे प्रतिक असणारी १०८ तुलसीपत्रे अर्पण केली. त्यानंतर या नवनीत-पादुकांवर सर्व श्रद्धावानांनी स्वत: मातीच्या गोळ्यांपासून तयार केलेल्या प्रतिकात्मक साईंच्या पादुका आणि अर्चनद्रव्य अर्पण केले. या सर्व पादुकांचा दुसर्‍याच दिवशी पवित्र गोदावरी नदीत भक्तिमय वातावरणात पुर्नमिलाप करण्यात आला.

) श्री शिवगायत्री मंत्राची उपासना –

श्री शिवगायत्रीमंत्राची उपासना म्हणजेच ‘अमृतमंथन उपासना’. देव-दानवांच्या युद्धात देवांनी जेव्हा दानवांच्या सहाय्याने (म्हणजेच चांगल्या प्रवृत्तींनी जेव्हा वाईट प्रवृत्तींच्या सहाय्याने) अमृतमंथन केले तेव्हा प्रथम विष (हलाहल) बाहेर आले. ह्यानंतर अमृताची प्राप्ती होणार असल्यामुळे ते विष प्राशन करून ते पचविणे आवश्यक होते. ही ताकद फक्त एकट्या परमशिवाकडे होती. सर्व देवदेवतांनी परमशिवाची प्रार्थना केल्यावर परमशिवाने ते हलाहल विष प्राशन केले व देवांना अमृताचा लाभ करून दिला.

आपल्या जीवनातील संकटरूपी, अडचणीरूपी, दुष्प्रारब्धरूपी हलाहल त्या परमशिवाने नष्ट करून आम्हाला आनंदरूपी अमृत प्रदान करावे यासाठी अत्यंत पवित्र अशा श्री शिवगायत्री मंत्राची उपासना ह्या शिर्डी रसयात्रेत पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता आयोजित केली होती. ह्यावेळी श्री. अप्पासाहेब दाभोलकर आणि मीनावैनी दाभोलकर ह्या श्रद्धावान दांपत्याने सद्गुरु श्री अनिरुध्दांच्या मार्गदर्शनाखाली शिवलिंग तयार केले. त्या वेळेच्या पूजनात ’ॐ भूर्भुव: स्व: | ॐ तत्पुरुषाय विद्महे | महादेवाय धीमहि | तन्नो रुद्र: प्रचोदयात् ||’ ह्या शिवगायत्री मंत्राचा १०८ वेळा जप सद्गुरु श्री अनिरुद्धांनी उपस्थित श्रद्धावानांकडून करून घेतला. ह्या वेळेस सर्व श्रध्दावानांनी आर्ततेने साईनाथांना साद घातली.

आरती –

शिवगायत्री मंत्रपठणानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे, साईबाबांच्या भक्तीत रममाण झालेल्या श्रेष्ठ भक्तांचे स्मरण करून देणारा गजर सद्गुरु अनिरुद्धांसमवेत सर्व श्रद्धावानांनी एकसाथ ताला-सुरात म्हटला. तो गजर म्हणजे……

‘दीक्षित, शामा, हेमाड, बायजाबाई, नाना, गणु, मेघा श्याम | यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हां साईराम ॥

रात्री ११ वाजता आरती झाल्यानंतर सर्व श्रद्धावानांनी देवदर्शनाचा लाभ घेतला आणि मग ‘ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम:|’ ह्या मंत्राचा जप केला. भोजनोत्तर सर्वांना सद्गुरु श्री अनिरुद्धांसह अभूतपूर्व सत्संगात सामिल होण्याची सुवर्णसंधी मिळाली.

 

शिर्डी रसयात्रा दुसरा दिवस-

या दिवशी श्रीक्षेत्र शिर्डीमधील अत्यंत महत्त्वाच्या अशा पावन स्थळांचे दर्शन सद्गुरु श्री अनिरुद्धांसमवेत श्रद्धावानांना घेता आले व सद्गुरुंच्या मुखातून त्या स्थळांचे महत्त्व श्रद्धावानांना जाणून घेता आले. भक्त  शिर्डीत येतात आणि केवळ मंदिरात बाबांचे दर्शन घेऊन परतात. पण या शिर्डीत आणखी काही महत्त्वाची ठिकाणे आहे, असे बापू म्हणाले होते.

ही स्थळे पुढीलप्रमाणे-

१) द्वारकामाई – माई म्हणजे कनवाळू आई! द्वारकामाईमधील धुनी, नंदादीप, साईबाबांचा मोठा फोटो, बाबांची बसायची शिळा, ज्याच्यावर बाबा अन्न शिजवत असत ती चूल, तुलसीवृंदावन, पालखी अशा अनेक गोष्टींचे महत्त्व श्रद्धावानांना सद्गुरु श्री अनिरुद्धांनी समजावून सांगितले.

२) हनुमान मंदिर – ह्या मंदिरात हनुमंताच्या दोन मूर्ती जवळजवळ असून त्यांचे पुच्छ एकत्र आलेले आहे. मानवाच्या जीवनातील द्वंद्व, विरोधाभास दूर करणार्‍या आणि श्रीरामचरणी एकनिष्ठ भाव दृढ करणार्‍या रामदूत हनुमंताच्या सामर्थ्याचे प्रतिक या मूर्तींद्वारे दर्शवले आहे, ही माहिती श्रद्धावानांना सद्गुरुंकडून मिळाली.

३) लेंडी बाग – ह्या बागेतील विहिरीच्या गोड पाण्याने साईबाबा मुखमार्जन करीत असत.

४) दत्तमंदिर – ह्या स्थानावर श्रीसाईबाबांनी श्री उपासनी महाराजांना ‘ॐ’ मंत्राची उपासना करायला सांगितली होती.

५) श्रीखंडोबा मंदिर – ह्याच मंदिरात भक्त म्हाळसापतींनी श्रीसाईनाथांचे ‘आओ साई’ म्हणून स्वागत केले. तेव्हापासून सर्वजण बाबांना ‘साई’ म्हणू लागले.

६) कानिफनाथ मंदिर – नवनाथांपैकी एक नाथ असणारे कनिफनाथ यांचे मंदीर शिर्डीत आहे. श्रीसाई देहधारी असताना या मंदिरात येत असत, असे सांगितले जाते.

७) भक्त म्हाळसापतींची समाधि – श्रेष्ठ साईभक्त म्हाळसापतींची समाधि ही म्हाळसापतींच्या निवासस्थानीच आहे. सदैव साईबाबांबरोबर सावली म्हणून राहणारे आणि साईबाबांना प्रथम ’साई’ म्हणून हाक मारणार्‍या म्हाळसापतींच्या समाधिच्या दर्शनाशिवाय शिर्डी यात्रा पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे.

८) नानावल्लींची समाधि – बाबांचे निष्ठावान भक्त असणारे नानावल्ली हे संन्यासी वृत्तीने शिर्डीत रहात होते. श्रीसाईनाथांच्या देहत्यागानंतर केवळ सात दिवसांनंतर त्यांनीही देहत्याग केला.

९) पूज्य भाऊमहाराज कुंभार यांची समाधि – हे श्रीसाईंचे एक श्रेष्ठ भक्त होते. साईबाबांनी त्यांना बालरूपात दर्शन दिले होते, असे सांगितले जाते.  

१०) तात्या कोते पाटील समाधि – साईभक्त म्हाळासापती भगत व तात्या कोते पाटील हे दोघे द्वारकामाईत साईबाबांच्या पायांकडे पाय करून झोपत असत, असा उल्लेख श्रीसाईसच्चरितात येतो. बायजाबाईंचे सुपुत्र असणारे तात्या कोते पाटील हे आपल्या मातेप्रमाणे साईंची निष्ठेने भक्ती करत. ते साईनाथांना प्रेमाने मामा म्हणून साद घालत असत. साईनाथांच्या सेवेत दक्ष असणारे ते एक निष्ठावान साईभक्त होते.

११) अब्दुलबाबा समाधि – श्रीसाईंचे एक जवळचे भक्त अब्दुलबाबा यांना चाळीस वर्षांचा साईनाथांचा सहवास लाभला. त्यांची समाधिही शिर्डीतच आहे. 

१२) शामसुंदर समाधि – साईनाथांचा श्यामकर्ण (श्यामसुन्दर) नामक अश्व साईनाथांच्या चावडीच्या मिरवणुकीत सर्वांत पुढे असे.   

अघाडी घोडा तो ताम्रवर्ण । नाम जयाचें श्यामकर्ण । घुंगुरें झणत्कारिती चरण । सर्वाभरणमंडित जो ॥

– श्रीसाईसच्चरित ३७ / १४६ ह्या शब्दांत त्याचे वर्णन हेमाडपंतांनी केले आहे. साईनाथांवर अत्यंत प्रेम करणार्‍या या शामसुन्दरचीही समाधि शिर्डीत आहे.

 *   अशा प्रकारे सर्व स्थाने, मंदिरे आणि समाधिस्थाने यांचे दर्शन सद्गुरुंसमवेत घेतले. त्याचबरोबर श्री साईनाथांना प्रिय असलेला पेरूचा प्रसादही प्रत्येकाला सद्गुरुंच्या हातून मिळाला.

अशा ह्या शिर्डी रसयात्रेची वैशिष्ट्ये-

१. श्रीक्षेत्र शिर्डीतील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती आणि महती समजल्यामुळे श्रद्धावानांच्या मनात साईभक्ती दृढ झाली. द्वारकामाईत घडलेल्या अनेक कथा, म्हाळसापतींची दास्यभक्ती, माधवराव देशपांडे यांची सेवातत्परता, तात्या कोते पाटील यांची निष्ठा, काकासाहेब दीक्षितांचे आज्ञापालन, हेमाडपंतांचे शारण्य, दासगणुंचे सद्गुरुवचनप्रामाण्य, नानासाहेब चांदोरकरांचे संपूर्ण समर्पण, सद्गुरुभक्ती, बायजाबाईंचे सद्गुरुप्रेम, लक्ष्मीबाईंची सेवाशीलता, प्राणियोनित जन्माला येऊनही साईंवर प्रेम करणारा श्यामकर्ण अश्व अशा अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण सद्गुरुंनी करून दिले आणि त्यातील भावार्थ विशद करून सांगितला. यामुळे स्वत:च्या जीवनात भक्तिरस कसा प्रवाहित करायचा हे श्रद्धावानांना समजले.

२. सद्गुरुंबरोबर श्रद्धावानांना विविध उपासना तसेच सत्संग व गजर करण्याची सुवर्णसंधी लाभली.

३. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मुखातून श्रीसाईनाथांची महत्त्वाची माहिती शिर्डीमध्ये श्रद्धावानांना मिळाली.

४. प्रत्येक श्रद्धावानाचा भाव हाच होता की या शिर्डी रसयात्रेमुळे सद्गुरुंसह भक्तिमय प्रेम-प्रवास घडला, सद्गुरु श्री अनिरुद्धांनी आमच्या जीवनप्रवासात श्रद्धेचा ‘खुंटा’ ठोकून बळकट केला.