वात्सल्याची ऊब
अंगावर घालण्यासाठीही पुरेसे कपडे नसलेल्या भारतातील कष्टकरी समाजाला थंडीचे दिवस म्हणजे मोठे संकट असते. या दिवसात थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना साधे स्वेटर्ससुद्धा उपलब्ध होत नाहीत, ती खरेदी करण्याचे सामर्थ्यही त्यांच्यामध्ये नसते. थंडीच्या लाटेत मृत्यु झाल्याच्या घटना, बातम्या आपल्या वाचनात येत असतात. यामध्ये लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. अशा मंडळींना ‘वात्सल्याची ऊब’ या सेवेअंतर्गत विणलेले स्वेटर्स दिले जातात.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ‘अहिल्या संघा’तर्फे ‘वात्सल्याची ऊब’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात लोकरीच्या विणकामाची सेवा श्रद्धावान करतात. या सेवेत सहभागी असलेले श्रद्धावान लोकर व दोन सुयांच्या सहाय्याने स्वेटर्स विणतात. नवजात बालके, दहा वर्षांखालील मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर्स विणले जातात. स्वेटर्स व्यतिरिक्त कानटोप्या, टोपरी, मोजे आणि मफलर ही विणले जातात. आतापर्यंत (२०१८ पर्यंत) श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट व संलग्न संस्थांद्वारे सुमारे २२,००० स्वेटर्सचे वाटप करण्यात आले आहे.
ज्या स्त्री श्रद्धावानांना स्वेटर्सचे विणकाम करण्याची इच्छा आहे, अशा स्त्रियांना अहिल्या संघातर्फे विनामूल्य विणकामाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण आठवड्यातून दोन वेळा दिले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी साधारण सहा महिन्यांचा असतो.
साधारपणे वयाच्या पन्नाशीनंतर बर्याच गृहिणी कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या असतात. अशा गृहिणींकडे मोकळा वेळ असतो. हा वेळ त्या स्वेटर्स विणकामासाठी वापरू शकतात. बर्याच स्त्री श्रद्धावान याचा लाभ घेतात. प्रेमाने व निरपेक्ष भावनेने विणलेल्या स्वेटरला नुसती लोकरीची ऊब नाही, तर त्याला वात्सल्याचीदेखील ऊब असते. अनेक स्त्री श्रद्धावान भगवंताचे व सद्गुरुंचे नामस्मरण करीत ही सेवा करतात, त्यामुळे या सेवेला भक्तीची जोडही मिळते. अशा सेवेतून निर्माण होणारी ही ऊब माणसाला आयुष्यात तग धरून राहण्यास मदत करते.