बारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)
भारतासारखा शेतीप्रधान देश मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. पण दरवर्षी पाऊस पुरेसा होतोच असे नाही. काही भाग कोरडेच राहतात. पावसाअभावी दरवर्षी देशात काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडतो. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे झाले तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ही परिस्थिती नेहमी पाहायला मिळते. पावसाने आणखी अवकृपा केली, तर दुष्काळी परिस्थिती आणखीनच भयंकर होते.
दुष्काळापेक्षाही सर्वात मोठी आपत्ती म्हणजे शेतकर्यांचा कर्जबाजारीपणा. या एका कारणामुळे शेतकरी कधी कधी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. दरवर्षी देशात १२ हजार शेतकरी आत्महत्या करतात, यासारखी दुसरी दुर्दैवी बाब नाही. दुष्काळी परिस्थिती भीषण असते, तेव्हा माणसं स्थलांतरण करतात किंवा आपली अन्नपाण्याची सोय करण्यासाठी मोठे कष्ट उपसतात. मात्र दुष्काळामुळे माणसांबरोबर गुरेही प्रभावित होत असतात, त्यांना चारा मिळत नाही. आपल्या देशात गोधन हे महत्त्वाचे मानले जाते. गुरे ही शेतकर्यांची अनमोल संपत्ती मानली जाते. मात्र अनेक वेळा दुष्काळी परिस्थितीत जेथे एकवेळचे अन्न मिळणे मुश्कील असते, तेथे गुरांचे पोषण कसे होणार. त्यामुळे त्यांना मोकळे सोडले जाते. सरकार गुरांसाठी चारा छावण्या उभारून या काळात आसरा उपलब्ध करून देते. अनेक शेतकरी आपली गुरे या छावण्यांमध्ये सोडतात. पण ते पुरेसे ठरतेच असे नाही.
भारतातील खडकाळ जमिनीचा नापीकपणा, पावसाची टंचाई, तळी, कालवे, धरणे यांचा अभाव आणि याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवतचार्यांची कमतरता व गुरांची गैरसोय. ह्यावर उपाय म्हणूनच सदगुरु श्रीअनिरुद्धांनी ‘बारामास शेती चारा योजना’ हा प्रकल्प सुरू केला. तेरा कलमी योजनेमधील हे एक महत्त्वाचे कलम. याला ‘गोग्रास’ असेही नाव दिले गेले आहे. ‘गोग्रास’ म्हणजे गायीला घास. गायीला अन्नधान्य किंवा इतर काही गोष्टी भरविण्यापेक्षा कष्टाने घरात उगवलेला चारा द्या, असे सदगुरु श्रीअनिरुद्ध कळकळीने सांगतात. शहरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते. याचा वापर पशुंना चारा पुरविण्यासाठी करायला हवा, असे त्यांचे ठाम मत आहे.
बारामास शेती चारा योजनेची कार्यवाही
प्रत्येकाला घरात छोटीशी का होईना बाग तयार करण्याची हौस असते. घराच्या गॅलरीत किमान एक तुळशीचे रोप किंवा शोभेचे रोपटे असते. यासोबत लहान कुंडीत मका किंवा ऊस पेरला तर त्या पिकाचा शेतकर्यांच्या गुरांसाठी चारा म्हणून वापर होऊ शकतो.
१) लहान कुंडीमध्ये मका किंवा ऊसाची लागवड करायची. मका किंवा ऊस ४५ दिवसात चांगला वाढतो. त्यानंतर दोन ते अडीच फूट चारा कापून तो गुरांसाठी वापरला जातो.
२) या कार्यामध्ये मोठ्या संख्येने श्रध्दावान सहभागी होतात. नित्यनेमाने ते त्यांच्या घरात उगवलेला हा चारा श्रीहरिगुरुग्राम किंवा जवळच्या श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रात जमा करतात.
३) काही उपासना केंद्रं उपलब्ध जागेवर मोठ्या प्रमाणात चारा लागवडीचा प्रकल्प राबवतात व तो चारा श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनमध्ये जमा करतात.
४) श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनमध्ये जमा झालेला चारा गरजू शेतकर्यांपर्यंत पोहोचविला जातो.
५) शेतकर्यांच्या गुरांना चारा मिळाला तर ते त्यांच्या शेणातूनही जोडधंदा करू शकतात. त्यात जर शेळी, गाय किंवा म्हैस असेल तर त्यांचे दूध हेदेखील शेतकर्यांच्या उपजीविकेचे साधन होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडील हे पशुधन सांभाळण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयास होण्याची आवश्यकता आहे.
‘शेतकरी भारताचा आधारभूत कणा आहे. ज्याचे जीवन या पशुपालनावर अवलंबून आहे’, असे सदगुरु अनिरुद्धांनी सांगितले आहे. ‘ग्रोगास देऊन पुण्य मिळवायचे असेल तर स्वतः चारा उगवायला हवा, हे लक्षात ठेवा’, असेही सद्गुरु श्रीअनिरुद्ध आवर्जून सांगतात. त्यांच्या या आवाहनाला असंख्य श्रद्धावानांनी प्रतिसाद दिला. आणि म्हणूनच दिवसेंदिवस या योजनेचा विस्तार होत चालला आहे आणि त्याला छान प्रतिसादही मिळत आहे.