अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड

Bank for the blind. Aniruddhas Bank for the blind-Aniruddha foundation

जगात सुमारे ३,७०,००,००० दृष्टीहीन आहेत. भारतात सुमारे याची संख्या १,५०,००,००० इतकी आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दिव्यांग असले तरी हे विद्यार्थी शिक्षणासाठी प्रयास करत असतात. त्यांच्या या प्रयासांना भक्कम आधार देण्यासाठी सद्‌गुरु श्री अनिरुद्धांनी ‘अनिरुद्धाज् बँक फॉर दी ब्लाईंड’ हा उपक्रम सुरू केला.

सद्गुरु श्रीअनिरुध्द नेहमी आपल्या श्रध्दावान मित्रांना सांगतात की ‘आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपल्यावर नकळत ऋण असते आणि आपण ते नाकारू शकत नाही. म्हणूनच समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देऊन आपण समाजाचेही ऋण फेडू शकतो आणि या निष्काम सेवेमुळे भगवंताच्या लेकरांची सेवाही घडते’.

‘श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन’ व ‘अनिरुध्द समर्पण पथक’ या संस्थांमार्फत हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत अंध विद्यार्थ्यांना शाळेची पुस्तके ऑडियो रेकॉर्ड करून दिली जातात. समाजातील गरजू घटकांना सहाय्य करून त्यांना सक्षम करण्याचे कार्य ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ ही संस्था नेहमीच करीत आली आहे.

‘अवघाचि संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक ॥’ हा आपला संकल्प मानून सदगुरु श्रीअनिरुद्धांनी दृष्टिहीनांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. सदगुरुतत्त्वाला कोणताही चमत्कार करावा लागत नाही, तर हे सदगुरुतत्व अंधाराचे रूपांतर प्रकाशात करते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ‘अनिरुद्धाज् बँक फॉर दी ब्लाईंड’.

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी मदत पुरविण्यात येते. भारतात, मुंबई येथे असलेल्या संस्थेमार्फत ही सेवा करण्यात येते.

‘अनिरुध्दाज् बँक फॉर दी ब्लाईंड’चा कार्यविस्तार :

गेल्या १० वर्षांत या बँकेचे जाळे भारतातील २६ राज्यांमध्ये पसरले आहे. शेजारच्या पाकिस्तानातही या सेवेचे लाभार्थी आहेत. या बँकेमध्ये १२ भाषांमध्ये रेकॉर्डिंग केले जाते, यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, कन्नड, बंगाली, मल्याळम्, तेलगु, संस्कृत इत्यादींचा समावेश आहे.

१ एप्रिल २०१८ पर्यंत बँकेतर्फे १७,४१९ सीडीज् वितरित करण्यात आल्या आहेत. तसेच ४६१ संस्था व वैयक्तिक पातळीवर ३४८ विद्यार्थ्यांनी या बँकेच्या सेवेचा लाभ घेतला आहे.

अनिरुध्दाज् बँक फॉर दी ब्लाईंड’ची कार्यपध्दती :

संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे श्रध्दावान या बँकेसाठी आपला अमूल्य वेळ देतात. सदगुरु श्रीअनिरुद्धांनी सुरु केलेल्या या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा श्रध्दावानांना असतेच. यामुळेच भारतातील विविध ठिकाणांहून श्रध्दावान या कार्यात सहभागी होतात. आपापल्या मातृभाषेमध्ये प्रवीण असलेले श्रध्दावान या अंध विद्यार्थ्यांसाठी पुस्तके रेकॉर्ड करतात. ही रेकॉर्ड केलेली पुस्तके काटेकोरपणे तपासली जातात. यामुळेच विद्यार्थांना अभ्यासासाठी मिळणार्‍या सीडी स्वरूपातील पुस्तकांचा उच्च दर्जा राखला जातो. त्याचबरोबर रेकॉर्ड केलेल्या आवाजाचा दर्जादेखील सांभाळला जातो.

रेकॉर्डिंग कसे करायचे, रेकॉर्डिंग करताना कसे बोलायचे, याबाबतही येथे मार्गदर्शन केले जाते. सीडीज्‌साठी लेखी मागणी आल्यानंतरच संबंधित अभ्यासक्रम रेकॉर्डिंगसाठी घेतला जातो. त्याचबरोबर पुस्तकाच्या प्रकाशकाकडूनही परवानगी मिळविली जाते. यानंतर सीडीज् रेकॉर्ड करून लाभार्थींना पाठविल्या जातात.

‘अनिरुध्दाज् बँक फॉर दी ब्लाईंड’चे लाभार्थी :

या बँकेतर्फे लाभ घेणार्‍यांमध्ये खाली दिलेल्या यादीतील व्यक्ती व संस्था सामाविष्ट आहेत –

* शालेय विद्यार्थी

* महाविद्यालये

* युनिव्हर्सिटीज् (ग्रॅज्युएशन पर्यंतचा अभ्यासक्रम)

* व्यावसायिक प्रशिक्षण – मोटर रिमाईंडिंग, मसाज, फिजीओथेरपी इत्यादी.

* बँकिंग

* सरकारी सेवा परीक्षा

* रेल्वे

* कायदा

संपर्क:

अनिरुध्दाज् बँक फॉर दी ब्लाईंड – ५०३, लिंक अपार्टमेंट, ३५ वी गल्ली,

जुने खार, खार रोड (पश्चिम), मुंबई – ४०० ०५२.

दूरध्वनी क्रमांक: ०२२-२६०५ ४४७४ / २६०५ ७०५४ / २६०५ ७०५६

-मेल : [email protected]