रक्तदान शिबीर
२०१६-१७ साली आपल्या देशाला १९ लाख युनिट्स रक्ताचा तुटवडा भासला होता. २०१५-१६ साली ही संख्या ११ लाखांवर होती. यावरून किती मोठ्या प्रमाणावर रुग्णालयांमधून रक्ताची गरज आहे, हे लक्षात येते. प्रत्येकवर्षी देशाला पाच कोटी युनिट्स रक्ताची आवश्यकता आहे. प्रत्येक दोन सेकंदाला कोणालातरी रक्ताची गरज भासते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास दररोज ३८ हजारहून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करायला हवीत. ही सर्व माहिती बातम्या आणि काही संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे. यावरून आपल्याला रक्त आणि रक्तदान शिबिराचे महत्त्व लक्षात येते. वेळीच याचे गांभीर्य ओळखून सदगुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या कार्यामध्ये रक्तदानाचा समावेश केला.
‘परमात्म्यास नऊ प्रकारचे थेंब अत्यंत आवडतात, ज्यात एका श्रद्वावानाने दुसर्या श्रद्वावानांसाठी निरपेक्ष भावनेने केलेल्या रक्तदानाचे थेंबही महत्त्वाचे आहेत’, असे सदगुरु श्री अनिरुद्धांनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाच्या ‘आनन्दसाधना’ या तृतीय खंडात सांगितले आहे.
१९९९ सालापासून सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, अनिरुद्ध समर्पण पथक, अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅन्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, अनिरुद्धाज् हाऊस ऑफ फ्रेंड्स या संलग्न संस्था दरवर्षी एप्रिल महिन्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करतात. हे शिबिर वांद्रे, न्यू इंग्लिश स्कूल (श्रीहरिगुरुग्राम) येथे आयोजित केले जाते.
एप्रिल महिनाच का? कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक मंडळी गावाला जातात. त्यावेळी रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासतो. म्हणून एप्रिल महिन्यातच रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.
२१ फेब्रुवारी १९९९ साली संस्थेने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. एका दिवसाच्या या रक्तदान शिबिरात १५४ पिशव्या रक्त जमा झाले होते. जमा करण्यात आलेले हे रक्त टाटा रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले.
या शिबिराला १९ वर्ष पूर्ण झाली. या १९ वर्षात शिबिराचे स्वरूप पूर्णतः बदलले. रक्तदान शिबिराबद्दल उपासना केंद्रांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. त्यानंतर हळूहळू या शिबिराला प्रतिसाद मिळत गेला. आजच्या घडीला या शिबिरात हजारोंच्या संख्येने रक्तदाते सहभागी होतात. केवळ मुंबईतच नाही तर एकाच वेळी महाराष्ट्रात इतर ठिकाणीही रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
१९९९ साली १५४ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. त्यानंतरच्या दुसर्या वर्षी म्हणजेच २००० साली ४१२ रक्ताच्या पिशव्या आणि २००१ साली ६१३ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. २००२ साली हजारांच्या पुढे म्हणजेच १५४८वर रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. त्यानंतर मात्र ही संख्या उत्तरोत्तर वाढतच गेली.
२००३ साल – २४१३
२००४ साल – २४०४
२००५ साल – २३८०
२००६ साल – ३६७६
२००७ साल – २३५२
२००८ साल – २८६६
२००९ साल – ३१७९
२०१० साल – ३०८३
२०११ साल – २४९६
२०१२ साल – ४६९१
२०१३ साल – ५१७८
२०१४ साल – ५७४६
२०१५ साल – ५२२९
२०१६ साल – ४५०४
२०१७ साल – ५२८८
२०१८ साल – ५८३८
त्याचवेळी २०१८ साली राज्यभरात अन्यत्र आयोजित शिबिरात २९३२ रक्तपिशव्या जमा झाल्या.
१९९९ सालापासून २०१८ सालापर्यंत आयोजित रक्तदान शिबिरात एक लाखांहून अधिक रक्तपिशव्या जमा झाल्या आहेत. हा सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टचा विक्रमच म्हणावा लागेल. हे रक्तदान शिबिर ‘रक्तदान शिबिराचे आयोजन कसे करावे’ याचे जणू मॉडेलच बनले आहे, असे सांगून ‘महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदे’ने संस्थेचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर संस्थेला इतर संस्थाकडूनही त्यांच्याकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी निमंत्रणे येतात. हे रक्तदान शिबिराला मिळालेले सर्वात मोठे यश आहे.
२०१० साली एका राजकीय पक्षाने रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी संस्थेला निमंत्रित आमंत्रित केले होते. या रक्तदान शिबिरात २५,००० बाटल्या रक्त जमा झाले होते. याची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली होती.
शंभरीने झालेली ही सुरुवात आज हजारोंवर पोहोचली याचे कारण याबद्दल केली गेलेली जागरूकता. अनेकांना रक्तदान म्हटले की भिती वाटते. पण रक्तदान शिबिरात केवळ ३०० मि.ली रक्त काढले जाते. रक्तदानानंतर ३६ तासात शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच दोन-तीन आठवड्यांमध्ये रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. आपल्या काही मि.ली. रक्तामुळे कोणा एकाचा जीव वाचण्यास मदत होते. हे सर्व श्रद्वावानांना पटवून देण्यात संस्था आणि उपासना केंद्राना कमालीचे यश आले.
रक्तदान शिबिराच्या महिनाभर आधी सर्व उपासना केंद्रामधल्या श्रद्वावानांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जाते. इतकेच नाही तर श्रद्वावान आपले नातेवाईक आणि मित्र-परिवारांमध्येही रक्तदान शिबिराची माहिती देऊन त्यांना यात सहभागी करून घेतात. रक्तदान शिबिराच्या आधी रक्तदानासाठी काय आहार करावा? रक्तदान कोणी करावे? रक्तदानाआधी काय काळजी घ्यावी? याची सविस्तर माहिती दिली जाते. आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.
रक्तदान शिबिरामध्ये रुग्णालये व रक्तपेढ्या सहभागी होतात. त्यांच्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफबरोबर संस्थेच्या वैद्यकीय शाखेचे डॉक्टर व पॅरामेडिकल सदस्यही तेवढ्याच तत्परतेने संपूर्ण दिवस रक्तदात्यांच्या मदतीसाठी उपस्थित असतात.
रक्तदान शिबिराच्या दिवशी सकाळपासूनच रक्तदात्यांची रांग लागलेली असते. उपासना केंद्रातले श्रद्वावान बसेस करून या ठिकाणी येतात. अगदी पद्धतशीरपणे या शिबिराचे आयोजन केलेले असते. सुरुवातीला काऊंटर्सवर चहा-नाश्ता केला आहे की नाही, याची विचारणा केली जाते. नसेल तर त्यांच्यासाठी तो उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जातो. हिमोग्लोबीन इत्यादी सर्व तपासले जाते. त्यानंतरच त्या व्यक्तीला रक्तदानाला पाठविले जाते.
शिवाय क्राऊड मॅनेजमेंटचीही व्यवस्था चोख केलेली असते. त्यामुळे गर्दी देखील होत नाही. तसेच आजूबाजूला भक्तिमय वातावरण असते. गजराच्या तालात रक्तदाते रक्तदान करत असतात. त्यामुळे त्यांची भीती कमी होते आणि त्यांचा उत्साह अधिकच वाढतो. रक्तदानासाठी रिजेक्ट झालेले श्रद्वावान ‘चरखा’ चालविण्याची सेवा करतात. तसेच पुढच्या वर्षी नक्की रक्तदान करू अशी शपथ यावेळी घेतात.
२०१८ सालचे रक्तदान शिबिर –
२२ एप्रिल २०१८ साली ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ व संलग्न संस्थांनी राज्यभरात एकाच वेळी ३९ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. संस्थेच्या या महारक्तदान शिबिरात तब्बल ८७७० पिशव्या रक्त जमा झाले. यात मुंबईत वांद्रे पूर्व येथे आयोजित महारक्तदान शिबिरात ५८३८पिशव्या तर राज्यभरात अन्यत्र आयोजित शिबिरात २९३२ रक्तपिशव्या जमा झाल्या.
मुंबईव्यतिरिक्त राज्यात पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, अकोला, जळगाव, सिंधुदूर्ग, पालघर जिल्ह्यातही रक्तदान शिबिर पार पडले. पुणे जिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी आयोजित शिबिरात १६४० पिशव्या, कोल्हापूर ४२४ पिशव्या रक्त जमा झाले. तर, पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये १२७, पालघरमध्ये १३१, डोंगस्तमध्ये ८३ पिशव्या रक्त जमा झाले. या व्यतिरिक्त उरणमध्ये १२१, अकोला, १६, मिरज ६२, वाघोटन २८, संगमनेर ७२, चोपडा ११ आणि डहाणू रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८९ पिशव्या रक्त जमा करण्यात आले.
वांद्रे येथील रक्तदान शिबिरात ४० रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये के.ई.एम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल ब्लड बँक, सैफी हॉस्पिटल, कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटल, जे.जे.महानगर ब्लड बँक, बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपल हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, ‘आयुष ब्लड बँक’ (नागपूर), ब्लड लाईन (ठाणे), वाडिया हॉस्पिटल, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, मसिना हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटलसह इतर रक्तपेढ्यांचा समावेश होता.
रक्तदान शिबिर फक्त एका दिवसापुरतेच मर्यादित न राहता उपासना केंद्र दर सहा महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करते. या रक्तदान शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद मिळतो.
आपल्या देशाला रक्ताचा तुटवडा भासत असताना दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या रक्तदान शिबिराचे महत्त्व अधिक आहे. म्हणूनच रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करायला हवे.