aniruddhas_bank_for_the_blind_devotional_services

अहिल्या संघातर्फे राबविला जाणारा हा एक स्त्युत्य उपक्रम आहे. ’वात्सल्याची ऊब’ सेवा म्हणजे लोकरीच्या विणकामाची सेवा. ह्या सेवेत दोन सुयांवर स्वकष्टाने स्वेटर्स विणले जातात.

आपल्या देशात आत्यंतिक गरीबीमुळे थंडीपासून आपला बचाव न करु शकल्यामुळे अनेक जण मृत्युमुखी पडतात. ह्यामध्ये लहान बालके व वयोवृध्द माणसांचा समावेश जास्त प्रमाणात असतो. ह्या सेवेअंतर्गत नवजात बालकांपासून ते १० वर्षांच्या मुला-मुलींचे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर्स विणले जातात व जमा करुन घेतले जातात.

ह्या सेवेत श्रद्धावान स्वत: विणलेले स्वेटर्स, कानटोप्या, टोपरी, मोजे, मफलर अशा अनेक लोकरीच्या वस्तु स्वकष्टाने बनवून अथवा विकत घेवून दान करु शकतात.

ज्या स्त्री श्रद्धावानांना स्वेटर्सचे विणकाम शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी अहिल्या संघातर्फे विणकामाचे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. हे प्रशिक्षण आठवड्यातून दोन वेळा दिले जाते व प्रशिक्षणाचा कालावधी साधारणपणे ६ महिन्यांचा असतो. ह्या प्रशिक्षण वर्गात नवजात बालकांपासून १० वर्षांच्या मुला-मुलींचे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर्स विणण्यास शिकविण्यात येतात.

साधारणपणे वयाच्या पन्नाशी नंतर बर्‍याच गृहिणी कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या असतात. ह्या गृहिणींकडे बराचसा मोकळा वेळ हातात असतो. हाच मोकळा वेळ जर स्वेटर्सच्या विणकामात उपयोगात आणला तर, आपले जीवन सार्थकी लागले याचे समाधान आपल्याला मिळते.

श्रीअनिरुध्द उपासना ट्रस्ट व संलग्न संस्थांद्वारे आतापर्यंत २०,३५५ स्वेटर्सचे वाटप केले आहे.

प्रेमाने व निरपेक्ष भावनेने विणलेल्या स्वेटरला नुसती लोकरीची ऊब नसून त्यात वात्सल्याची देखील ऊब असते, जी माणसाला आयुष्यात तग धरुन उभे राहण्यास मदत करते. अशी ही ’वात्सल्याची ऊब’ सेवा स्वेटर दान करणार्‍याला व स्विकारणार्‍याला – दोघांनाही एक वरदानच आहे !

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com