बारामास शेती चारा योजना आवश्यकता –

शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा अत्यंत उदासिन करणारा, अतीशय संवदेनशील विषय आहे. कृषीप्रधान भारतात शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे. कर्जाचा डोंगर, पाण्याची टंचाई, निर्सगाचा कोप, चुकीच्या शेतीपध्दती आणि इतर अनेक कारणांमुळे आजचा शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे. जमिनी, गुरे ढोरे विकून ह्या कर्जातून मार्ग काढण्याचा शेतकरी प्रयत्न करतात पण त्यांची अखेर मात्र आत्महत्येसारख्या चूकीच्या पर्यायातून होते. एकवेळ मेहनत करुन शेतकरी उभा तरी राहील, पण दुष्काळापूढे त्याचे काहीही चालत नाही. दुष्काळ पडला की चारा सोन्याच्या भावाने विकत मिळतो, तर गुरे ढोरे चार्‍याच्या दामाने विकली जातात. ही आपल्या ग्रामीण भारताची वस्तुस्थिती आहे. संपूर्णपणे पावसावर अवलंबून असणारी आपली शेती पावसाअभावी अगदी पोरकी होते. त्यामुळे जगण्यासाठी या शेतकर्‍यांवर गुरे विकण्याची नामुष्की ओढवते. दुष्काळात गुरेही तग धरु शकत नाहीत, त्यामुळे त्यांना विकून पैसा मिळविण्याचा मार्ग शेतकरी स्विकारतात. पण पुढे काय? ही गुरेढोरेच त्यांची संपत्ती नाही का? गुरेही विकल्यावर काय उरले त्यांच्याकडे? त्यामुळे निदान दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या पशूधनाचा सांभाळ करता यावा यासाठी बारामास शेती चारा योजना डॉ. अनिरुद्ध जोशी (सदगुरु श्री अनिरुद्ध बापू) यांनी सुरु केली.

बारामास शेती चारा योजना संकल्पना –

भारतीय अर्थव्यवस्थेचा एक स्तंभ असणार्‍या बळीराजाच्या ह्या असहाय्यतेची जबाबदारी कुणाची आहे? फक्त सरकारची की कृषीसंघटनांची? ही जबाबदारी प्रत्येक भारतीयची आहे. त्या प्रत्येक नागरीकाची, ज्याला मुबलक पाण्याचा फायदा मिळतो. या समाजात किमान तो दोन वेळेचे पोटभर जेवण घेऊ शकतो. एक सर्वसामान्य आयुष्य जगु शकतो. त्या सर्वांची ही जबाबदारी आहे. शहरात राहूनही या शेतकर्‍यांची आपण मदत करु शकतो. त्यांचे पशुधन वाचवू शकतो.

प्रत्येकला घरात छोटीसी का होईना पण बाग करण्याची हौस असते. अगदी काही नाही तरी घराच्या गॅलेरीमध्ये किमान एक तुळशीचे रोप अथवा शोभेचे रोपटे असतेच. याच बरोबर एका छोट्याश्या कुंडीत मका किंवा ऊस पेरला तर त्या पिकाचा शेतकर्‍यांच्या गुरांसाठी चारा म्हणून उपयोग होऊ शकतो. यासाठी आवश्यकता आहे ती केवळ आपल्याला जबाबदारीची जाणिव होण्याची. अगोदरच भरपूर पोट भरलेल्या गाईसाठी १० रुपये देऊन चारा खाऊ घालण्यापेक्षा मरणासन्न झालेल्या या शेतकर्‍यांच्या गुरांना आपण १० रुपयात भरपूर चारा मिळवून देणे अधिक श्रेयस्कर आहे.

बारामास शेती चारा योजना कार्यवाही –

  •  ज्यांना शक्य आहे ते आपल्या दारात, गॅलरीमध्ये अथवा गच्चीत, छोट्या कुंड्यांमध्ये मका, ऊस यांची लागवड करु शकतात. मका व ऊस ४५ दिवसात चांगला वाढतो. मग हा दोन ते अडीच फुट वाढलेला चारा कापून गुरांसाठी वापरला जातो.
  • या कार्यात अनेक श्रद्धावान सहभाग घेतात आणि नित्यनियमाने चारा श्री हरिगुरुग्राम येथे अथवा आपल्या उपासना केंद्रात जमा करतात.
  • काही उपासना केंद्र उपलब्ध जागेवर मोठ्या प्रमाणात चारा लागवडीचा प्रकल्प राबवितात, आणि भरघोस उत्पादन घेऊन श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनमध्ये जमा करतात.
  • श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनमध्ये जमा झालेला चारा गरजू शेतकर्‍यापर्यंत मोफत पोहचविला जातो.
  • शेतकर्‍यांच्या गुरांना चारा मिळाला तर ते त्यांच्या शेणातूनही जोडधंदा सुरु करु शकतात. त्यात जर शेळी, गाय किंवा म्हैस असेल तर त्यांच्या दुधावरही त्यांचे पोषण होऊ शकते. त्यामुळेच त्यांच्याकडील हे पशुधन सांभाळण्यासाठी सर्व पातळीवरुन प्रयास होण्याची आवश्यकता आहे.

एआयजीव्हीचे संशोधन – अनिरुद्धाज इन्स्टीट्युट ऑफ ग्रामीण विकास (एआयजीव्ही) ह्या चारा लागवडीवर मोठ्या प्रमाणावर संशोधन करीत आहे. शहरातील लोकांना या योजनेत अधिक प्रमाणात सहभागी होता यावे, याकरिता हायड्रोपोनिक्स शेतीचे (मातीवीना शेतीचे) विविध प्रयोग गोविद्यापिठम, कर्जत येथे सुरु आहेत.

तात्पर्य –

शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारावी यासाठी असणार्‍या अनेकविध मार्गांमधील हा एक मार्ग आहे, जो त्यांच्या पशूधनाचा विचार करुन मांडण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होणे म्हणजे शेतकरी आणि त्यांचे पशुधन यांच्या कष्टांचा आदर करण्यासारखे आहे. त्यांच्याप्रति व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे. तसेच शेतकर्‍यांच्या समस्येवर सर्वांगिण तोडगा सापडावा यासाठी डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ’अनिरुद्धाज इन्स्टीट्युट ऑफ ग्रामीण विकास’ संशोधन व कार्य करीत आहे. कारण रामराज्याचा प्रवास ग्रामराज्यच्या स्थानकापासूनच सुरु होतो, आणि ग्रामराज्य म्हणजेच ग्रामविकास.

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com