AniruddhaFoundation-Old-Is-Gold

संकल्पना

शहरापेक्षा खेड्यात आपल्याला गरीबी, निरक्षरता जास्त दिसून येते. याचे मूळ कारण म्हणजे घरातील प्रत्येकजण जेव्हा काम करतो तेव्हा कुठे त्यांना २ वेळचे बेताचे जेवण मिळते. कधी कधी इतके काम करूनही एक वेळच्या जेवणासाठी मारामार असते. अशा परिस्थितीमध्ये मुबलक कपडे असणे, थंडीच्या दिवसात गरम कपडे असणे हे तर अगदीच अशक्य आहे. यामुळे आरोग्य नीट राहत नाही. या सगळ्याचा देशाच्या विकासावर नक्कीच परिणाम होत असतो. हे झाले खेड्यातील चित्र. पण भारतातील शहरांची परिस्थिती ह्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. शहरातील कुटुंबांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असते. नोकरी व व्यवसायासाठी चांगल्या संधी मिळतात. त्यामुळे लोकांची मिळकत चांगली असते. त्यामुळे महत्वाच्या गरजा तर पूर्ण होतातच पण त्याचबरोबर त्याच्या पलिकडे जाऊनही त्यांना पाहिजे ते करता येते. श्रीमंत माणसांकडे कपड्याची कमी नसते. जुने कपडे किंवा कधी कधी तर न वापरलेले कपडे देखील त्यांच्याकडे बरेच असतात. अश्या वेळी हेच कपडे जर गरजूंना मिळाले तर त्यांची एक महत्वाची गरज पूर्ण होऊ शकते.

म्हणूनच ही दरी कमी करण्यासाठी व परिश्रमी गरिबांच्या देखील मूळ गरजा पूर्ण करण्यासाठी जुनं ते सोनं या प्रकल्पाची सुरुवात सद्गुरू श्रीअनिरुद्ध उपासना फौंडेशनने सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाने केली. यामध्ये फाऊंडेशनने मान्यता दिलेल्या उपासना केंद्रांवर तसेच श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे) येथे दर गुरुवारी श्रद्धावान कपडे जमा करू शकतात. हे कपडे जमा करताना ते स्वच्छ असल्याची व फाटलेले नसल्याची खात्री संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. चांगले कपडे मागासलेल्या भागातील कुटुंबांना मिळावेत हे संस्कार बापूंनी श्रध्दावानांच्या मनावर रुजवले आहेत.

सेवेचे व्यवस्थापन व अंमलबजावणीची पद्धत

सद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांवर कपडे जमा झाल्यावर श्रद्धावान त्या कपड्यांचे वयोगटावरून वर्गीकरण करतात. लहान मुलांचे, मध्यम वयीन स्त्री-पुरुषांचे तसेच वृद्ध स्त्री-पुरुषांचे कपडे याप्रमाणे वर्गीकरण होते. तसेच वयोगटावरूनही वर्गीकरण होते. प्रत्येक केंद्राजवळचे श्रद्धावान त्यांच्या विभागाजवळच्या गावांचे सर्वेक्षण करतात. प्रत्येक गरजू कुटुंबात किती माणसे आहेत, याची मोजणी केली जाते. त्यात स्त्रिया, पुरुष व लहान मुले किती आहेत, त्यांचे वय काय या सगळ्याचा सखोल अभ्यास होतो. हे श्रद्धावान गावागावांमधून हे सर्वेक्षण करतात. सर्वेक्षण करून झाल्यावर जमा झालेले कपडे पुरेसे आहेत का याचा आढावा घेतला जातो. जर कपडे पुरेसे नसतील तर केंद्रांमध्ये कपडे जमा करण्यासाठी निवेदन केले जाते. एकदा का पुरेसे कपडे जमा झाले की कपड्यांच्या वर्गीकरणाची सुरवात होते. कुटुंबांप्रमाणे गाठोडी तयार होतात. प्रत्येक कुटुंबाच्या गाठोड्यात त्या घरातील प्रत्येकासाठी कपडे असतात. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला कुटुंबाचा एक नंबर देतात त्या नंबरने ते कुटुंब ओळखले जाते किंवा त्या गाठोड्यावर कुटुंबाचे नाव लिहतात. जेणेकरून ते गाठोडे कुणाला द्यायचे आहे हे कळते. सगळी गाठोडी एकत्र बांधून टेम्पो किंवा अन्य गाडीत भरून सर्वेक्षण केलेल्या गावांमधे नेली जातात.

गावात गेल्यावर श्रद्धावान कार्यकर्ते प्रत्येक कुटुंबाचे नाव पुकारतात. त्या कुटुंबातील एक जण पुढे येऊन ते गाठोडे श्रद्धावानांकडून स्वीकारतो. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य व समाधान बघण्यासारखे असते. थोडे कपडे मिळून देखील त्यांच्या चेहर्‍यावरील तृप्ती बघून खूप काही शिकायला मिळते. श्रद्धावान देखील प्रेमाने ह्या कपड्यांचे वाटप करतात. तसेच केवळ कपडेच नाहीत तर श्रद्धावान जुनी भांडी व खेळणी देखील देऊ शकतात. गरीब कुटुंबाना या भांड्यांची व ह्याच कुटुंबातील मुलांना ह्या खेळण्यांची खूप आवश्यकता असते.

कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरातील सेवा

सर्वात मोठ्या प्रमाणात ही सेवा कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरांतर्गत पेंडाखळे परिसरातील इतर गावात केली जाते. शिबिराच्या खूप आधी काही श्रद्धावान मंडळी केवळ सर्वेक्षणासाठी तिथे जातात आणि प्रत्येक कुटुंबात कपड्यांची, भांड्यांची, खेळण्यांची किती गरज आहे त्याचे सर्वेक्षण करतात. परत या कपड्यांचे कुटुंबाप्रमाणे व त्यांच्या गरजांप्रमाणे गाठोडे बांधले जाते. स्वतः परमपूज्य नंदाईच्या हस्ते ह्या गरजुंना कपड्यांचे, खेळण्यांचे, भांड्यांचे व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जाते. ह्या गावातील माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वर्णनाच्या पलीकडचा आहे.

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या ‘जुनं ते सोनं’ या सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या प्रेरणेने सुरु केलेल्या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांना कपडे व गरजेच्या वस्तू यांचा लाभ मिळाला. तसेच ती कुटुंबे बापूंच्या कृपा छत्राखाली सुखाने राहू लागली.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com