प्रस्तावना

“अवघाचि संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी”. हे ब्रीद्वाक्य घेऊन तळागळातील गरजूंना आधार व दिलासा देण्याच्या कार्यास श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने वाहून घेतलेले आहे. फाऊंडेशनच्या अनेक कार्यांमधील एक अफाट आणि अद्वितीय प्रोजेक्ट म्हणजे ‘कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य शिबीर’.

२००४ पासून सुरु झालेल्या या शिबिराचा लाभ घेण्यार्‍या गावांचा, शाळांचा आता कायापालट झालेला आहे. पूर्वी फाटके कपडे, त्वचारोगांनी त्रस्त, कुपोषित बाळे आणि अत्यंत अस्वच्छ वाटणार्‍या गरजूंमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याचबरोबर झालेल्या चांगल्या सवयी, शारीरिक, शैक्षणिक व अध्यात्मिक उन्नती हेच या शिबिराचे यश व्यक्त करते.

कोल्हापूर वैद्यकीय आरोग्य शिबीर आयोजन

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, श्रीगुरु उपासना फौंडेशन, अनिरुध्द आदेश पथक,   अनिरुध्दाज्‌ हाऊस ऑफ फ्रेन्ड्‍स एकत्र येऊन या शिबिराचे आयोजन करतात. साधारणतः दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यात ह्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले जाते. सुरुवातीला या शिबिराचे आयोजन करंजफेण या गावात केले गेले. त्यानंतर मात्र वर्ष २००५ पासून शिबिराचे आयोजन हे शाहुवाडी तहसीलामधील पेंडाखळे गावात करण्यात येते.

कोल्हापूरपासून अगदी काहीशा किलोमीटरवर असणार्‍या गावांमध्ये बिकट परिस्थिती होती. सखोल सर्वेक्षण, संशोधन आणि अभ्यासाअंती ही गोष्ट संस्थेच्या ध्यानात आली आणि कोल्हापूर आसपासच्या गावांमध्ये हे शिबीर घेण्याचे निश्चित झाले.

कोल्हापूर वैद्यकीय आरोग्य शिबीर पूर्वतयारी

सुमारे १० एकरच्या शेतजमिनीवर हा कॅम्प बसवला जातो. ज्यातील मंडपाचा विभाग हा सुमारे ८० हजार स्क्वेअरफीटचा असतो. पेंडाखळे गावाचे गावकरी एकत्र येऊन ही शेतजमीन दरवर्षी उपलब्ध करुन देतात. यासाठी जमिनीची डागडुजी, ती सपाट करणे इत्यादी कामे स्वतः गावकरी करतात. या जमिनीच्या सपाटीकरणासाठी साधारणतः ८०० गावकरी सेवेला हजर असतात. कॅम्पसाईटची पूर्वतयारी तशी कॅम्पच्या काही दिवस आधी सुरु होते. मात्र खरंतर ही पूर्वतयारी वर्षभर सुरु असते. एक कॅम्प संपला की पुढच्या कॅम्पची तयारी पुन्हा सुरु होते. त्यामध्ये आधीच्या कॅम्पसचा आढावा, नवीन सुधारणा, फॉलोअप्स्‌ पासून सर्व्हेक्षण ह्या गोष्टींचा समावेश होतो.

शिबिराची यशोगाथा

हे शिबीर आयोजित करताना लाभार्थी गावकर्‍यांच्या चांगल्या आरोग्याबरोबरच वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी कशा बदलतील याकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यासाठी अगदी अंगाच्या साबणापासून ते डोक्यातील उवांच्या औषधांपर्यंत प्रत्येक आवश्यक गोष्टीचे वाटप त्यांना करण्यात आले. जसजशा गावकर्‍यांच्या स्वच्छ व राहण्याच्या सवयी नीटनेटक्या होत गेल्या तसतसा गावांचा कायापालट होत गेला.

या शिबिराच्या सकारात्मक परिणाम पुढीलप्रमाणे

१. गावकर्‍यांमधील आरोग्यविषयक तक्रारी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यात.

२. गावकर्‍यांना शरीराची व परिसराची स्वच्छता याचे महत्त्व पटले व स्वच्छतेची सवयही अंगिकारली.

३. लेप्रसीच्या रुग्णांची संख्या प्रकर्षाने कमी झाली.

४. संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी झाले.

५. दूषित पाण्याने होणारे आजार पूर्णतः नष्ट झाले.

६. दरवर्षी या शिबिराचा लाभ घेणार्‍या गावांची आणि शाळांची संख्या वाढली.

७. शिबिराचा लाभ घेतलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली. इतकेच नव्हे तर शाळांचा निकालही चांगला लागत आहे.

८. कुटुंबानियोजन याबाबत गावकर्‍यांना चांगली माहिती आहे. या त्यांच्यामधील जागरुकतेबाबत गायनॉकॉलॉजिस्ट समाधानही व्यक्त करतात.

Kolhapur Medical and Healthcare Camp_Infographic

कोल्हापूर वैद्यकीय आरोग्य शिबिराची रुपरेषा

हे शिबीर दोन दिवसांचे असते. या शिबिरासाठी सुमारे ४००० सेवेकरी सज्ज असतात. त्यातील सुमारे १००० सेवेकरी मुंबई व पुणे येथून  जातात. त्यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफदेखील असतो.

शिबिराच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर वाटपाला सुरुवात होते. म्हणजे सर्वेक्षण केलेल्या गावात टेंम्पोभरुन वाटपाचे सामान सेवेकरी  घेऊन जातात. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या नावाने एक गाठोडे बनवलेले असते. २०१७ मध्ये ९२ गावातील ८७६६ कुटुंबांना वाटप केले गेले. दिवसभराच्या मेहनतीनंतर जेव्हा सेवेकरी पुन्हा शिबिराच्या स्थळी येतात तेव्हा सत्संगाचे आयोजन केले जाते.

दुसर्‍या दिवशी वैद्यकीय शिबिरास सुरुवात होते. पहाटेपासून गावकरी व शाळा पेंडाखळेला येऊ लागतात. भोजनाच्या वेळेस अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ सुरु होते. थेट सायंकाळी ७ पर्यंत वैद्यकीय शिबीर अव्याहतपणे सुरु असते. त्यानंतर सर्व कार्यकर्ते आपापल्या गावांना निघतात. या कार्यकर्त्यांकडेही निघताना एक गाठोडे असते विलक्षण अशा अनुभवांचे आणि समाधानाचे.

कोल्हापूर वैद्यकीय आरोग्य शिबिराचे पैलू

 

वैद्यकिय माहिती

या शिबिरात आसपासच्या गावांतील हजारो गावकरी येतात. वैद्यकिय विभागात रुग्णांची मोफत चिकित्सा केली जाते. यामध्ये सामान्य तपासणी, एक्सरे यांचा समावेश असतो. गरजूंचे डोळे तपासून त्यांना चष्म्याचे मोफत वाटप केले जाते. ईसीजीचा देखील समावेश या वैद्यकीय विभागात केलेला असतो. त्याचबरोबर दंतचिकित्सा सेवाही पुरवली जाते. वर्ष २०१७ मध्ये सुमारे १५ हजारहून अधिक रुग्णांची तपासणी निःशुल्क करण्यात आली. तर १३३ शाळांमधील एकूण ९३४८ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हे शिबीर सुरु झाल्यापासून वैद्यकीय पैलूचा संपूर्ण आढावा पुढील इन्फोग्राफीकमध्ये पाहता येईल.

(इन्फोग्राफ)

आरोग्य पैलू

ह्या शिबिराच्या सुरुवातीला केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की अस्वच्छ पाणी, उघड्यावर शौच, परिसराचीच नव्हे तर शरीराची अस्वच्छता यामुळे आजारपणांना आयते आमंत्रण मिळते. म्हणून गावागावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला जीवनाश्यक अशा गोष्टींचे वाटप करण्यात येते. यामध्ये दंतमंजन, साबण, पाणी शुद्ध करण्याचे औषध, ऊवांचे औषध, गोधड्या, कपडे, भांडी अशा गोष्टी दिल्या जातात. प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार हे वाटप केले जाते. मुलींच्या केसांत जटा होऊ नयेत यासाठी कंगव्याचा देखील आवर्जून समावेश केला जातो. तसेच त्यांना स्वच्छतेबद्दलचे मार्गदर्शनदेखील केले जाते. या सार्‍या प्रयासांमुळे आज गावागावांची सुधारलेली परिस्थिती दिसून येते. आजारांचे प्रमाण कमी झालेले आहे.

शैक्षणिक पैलू

या शिबिरामध्ये कोल्हापूरमधील शंभराहून अधिक शाळा दरवर्षी हजेरी लावतात. शाळा म्हणजे विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर येतात. विद्यार्थ्यांना चपला व टोप्यांचे मोफत वाटप केले जाते. या शाळांची व शाळांमधून येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी केली जाते आणि त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते. या मुलांना आवश्यकतेनुसार व्हिटॅमिनची औषधेही मोफत दिली जातात.

नवीन गणवेष घेण्याची त्यांच्या आईवडिलांची परिस्थितीही नसते. अनेकदा या मुलांना अनवाणी शाळेत जावे लागते. गावात वीज नसल्याने अंधार झाला की ही मुले अभ्यासही करु शकत नाहीत अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुलांना आवश्यक गोष्टींचे वाटप केले जाते. मुलांना सुका मेव्याचे पाकिट दिले जाते. जेणेकरुन त्यांना योग्य ती पोषणतत्त्वे मिळू शकतील. त्यानंतर मुलांना मेणबत्ती व काडेपेटीचे वाटप केले जाते, ज्यामुळे अंधारल्यावरही मुले अभ्यास करु शकतात. ह्या काडेपेट्या व मेणबत्त्या “विद्याप्रकाश योजना” अंतर्गत वाटण्यात येतात.

विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. हे गणवेश तयार करण्यासाठी श्रीअनिरुद्धांचे श्रद्धावान मित्र व अनुयायी “चरखा योजने”च्या अंतर्गत चरखा चालवून लड्या बनवून देतात. या लड्यांमधून कपडा तयार होतो आणि त्याचाच गणवेष तयार करुन या विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येतो.

इतकेच नव्हे तर त्यांच्या शाळांनासुद्धा खेळण्यांचे सेट दिले जातात. जसे की दोरीवरच्या उड्या, रिंग्ज्‌, फुटबॉल, फ्रीसबीज्‌, क्रिकेटचा सेट इत्यादी. मुलांनी शाळेत येऊन आपले शिक्षण घ्यावे व ही पुढची भारतीय पिढी अधिक सक्षम व सुदृढ व्हावी यासाठी शिबिराचा हा शैक्षणिक पैलू अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या शिबिराचे लाभार्थी असणारी दोन मुले तर आज वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. हीच गोष्ट या शिबिराचे यश सांगण्यास पुरेशी आहे.

शैक्षणिक पैलूचा आढावा देणारे इन्फोग्राफीक पुढे आहे.

(इन्फोग्राफ)

अन्नपूर्णा महाप्रसादम्

शिबिरात येणार्‍या प्रत्येक लाभार्थीला अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ अंतर्गत निःशुल्क भोजन दिले जाते. उन्हातून, लांबून या शिबिराला येणार्‍या समस्त लाभार्थ्यांना अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ जणू पर्वणीच. मनसोक्त अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत जेवणारे गावकरी आणि विद्यार्थी पाहिले की तृप्तीचा ढेकर आपल्याला येतो. शिबिरातील या पंक्तीत सुमारे ५० हजाराहून लोक जेवतात. यांना प्रेमाने आणि आग्रहाने जेवण वाढले जाते.

अध्यात्मिक पैलू

अध्यात्म म्हणजे साधीसुधी निर्व्याज भक्ती. भगवंतावर प्रेम. हे भगवंतावरचे प्रेम इथे पाहण्यास मिळते. त्याचबरोबर या गावकर्‍यांच्या आयुष्याचे नंदनवन करणारे डॉ. अनिरुद्ध मात्र गावकर्‍यांसाठी एक अजब रसायन बनले आहे. बापूंना प्रत्यक्ष न पाहताही त्यांच्यावर ओसांडून वाहणारे प्रेम या शिबिरात पाहण्यास मिळते.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com