Bank for the blind. Aniruddhas Bank for the blind-Aniruddha foundation

अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड – अंधमित्रांसाठी मदतीचा हात:

मानवाची नवनवीन गोष्टी शिकण्याची तहान कधीही न भागणारी आहे. डोळे, नाक, कान, स्पर्श या प्रत्येक माध्यमातून माणूस प्रत्येक क्षणी ज्ञान घेतच असतो. पण या महत्वाच्या इंद्रियांपैकी एक जरी साथ देत नसेल, तर बाकीची इंद्रिये ती कमतरता भरून काढतात. दृष्टीहीन व्यक्तींसाठी स्पर्श आणि त्याचरोबरीने ध्वनी म्हणजेच आवाज सगळ्यात महत्वाचे कार्य करतो.

जगभरात सुमारे पावणेचार कोटी दृष्टीहीन व्यक्ती आहेत, तर भारतात जवळपास दीड कोटी व्यक्ती दृष्टीहीन आहेत. यामध्ये ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीसुध्दा खडतर प्रयास करावे लागतात. जरी या दृष्टीहीन विद्यार्थ्यांची परिस्थिती खडतर असली, तरीसुध्दा ही सगळी मुले कोणत्याही कष्टांना न घाबरता आपले शिक्षण सुरु रहावे म्हणून हसतमुखाने प्रयास करीत असतात.

‘अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड’ :

या विद्यार्थ्यांच्या प्रयासांना प्रेमाचा भक्कम आधार देण्यासाठी सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंनी ‘अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड’ हा उपक्रम सुरु केला. याअंतर्गत अंध विद्यार्थ्यांना शाळेची पुस्तके ऑडियो रेकॉर्ड करून दिली जातात. ‘श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन’ व ‘अनिरुध्द समर्पण पथक’ यांच्या सहयोगाने हा प्रकल्प राबविण्यात येतो. समाजातील दुर्बल घटकांना सहाय्य करून त्यांना सक्षम करण्याचे कार्य ‘श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन’ ही संस्था नेहमीच करीत आलेली आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करिन l आनंदे भरिन तिन्ही लोक ll’ यालाच आपला संकल्प मानून सद्‍गुरु श्रीअनिरुध्द बापूंनी या दृष्टीहिनांच्या जीवनात प्रकाशाचा स्त्रोत आणला आहे. सद्‍गुरुतत्वाला कोणताही चमत्कार करावा लागत नाही, तर हे सद्‌गुरुतत्व, अंधाराचेच रुपांतर प्रकाशात करते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड’.

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी मदत पुरविण्यात येते. भारतात मुंबई येथे असलेल्या या संस्थांमार्फत ही सेवा करण्यात येते.

‘अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड’चा कार्यविस्तार :

गेल्या १० वर्षांत या बँकेचे जाळे भारतातील २६ राज्यांमध्ये पसरलेले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये देखील या सेवेचे लाभार्थी आहेत. या बॅंकेमध्ये १२ भाषांमध्ये रेकॉर्डिंग केले जाते, यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, कन्नड, बंगाली, मल्याळम्‌, तेलगु, संस्कृत इत्यादींचा समावेश आहे. ३० एप्रिल २०१७ पर्यंत, बॅंकेतर्फे १६,०१४ सीडीज्‌ वितरीत करण्यात आल्या आहेत. तसेच ४३९ संस्था व वैयक्तिक पातळीवर २६८ विद्यार्थ्यांनी या बॅंकेच्या सेवेचा लाभ घेतला आहे.

‘अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड’ची कार्यपध्दती :

संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे श्रध्दावान या बॅंकेसाठी आपला अमूल्य वेळ देतात. श्रीअनिरुध्द बापूंनी सुरु केलेल्या या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा श्रध्दावानांना असतेच. यामुळेच भारतातील विविध ठिकाणांहून श्रध्दावान या कार्यात सहभागी होतात. आपापल्या मातृभाषेमध्ये प्रविण असलेले श्रध्दावान या अंध विद्यार्थांसाठी पुस्तके रेकॉर्ड करतात. ही रेकॉर्ड केलेली पुस्तके काटेकोरपणे तपासली जातात. यामुळेच विद्यार्थांना अभ्यासासाठी मिळणार्‍या सीडी स्वरूपातील पुस्तकांचा उच्च दर्जा राखला जातो. त्याचबरोबर रेकॉर्ड केलेल्या आवाजाचा दर्जा देखील सांभाळला जातो. रेकॉर्डींग कसे करायचे, रेकॉर्डींग करताना कसे बोलायचे, याबाबतही येथे मार्गदर्शन केले जाते. सीडी‌ज्‌साठी लेखी मागणी आल्यानंतरच संबंधित अभ्यासक्रम रेकॉर्डिंगसाठी घेतला जातो. त्याचबरोबर पुस्तकाच्या प्रकाशकाकडूनही परवानगी मिळविली जाते. यानंतर सीडीज्‌ रेकॉर्ड करून लाभार्थींना पाठविल्या जातात.

सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापू नेहमी आपल्या श्रध्दावान मित्रांना सांगतात की, ‘आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपल्यावर नकळत ‌ॠण असतेच आणि आपण ते नाकारू शकत नाही. म्हणूनच समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन आपण समाजाचेही ॠण फेडू शकतो आणि या निष्काम सेवेमुळे भगवंताचीही सेवा घडते’.

‘अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड’चे लाभार्थी :

या बॅंकेतर्फे लाभ घेणार्‍यांमधे खाली दिलेल्या यादीतील व्यक्ती व संस्था सामाविष्ट आहेत –

* शालेय विद्यार्थी

* कॉलेजेस्‌

* युनिव्हर्सिटीज्‌ (ग्रॅज्युएशन पर्यंतचा अभ्यासक्रम)

* व्यावसायिक प्रशिक्षण – मोटर रिमाईंडिंग, मसाज, फिजीओथेरपी इत्यादी.

* बँकिंग

* सरकारी सेवा परिक्षा

* रेल्वे

* कायदा

संपर्क:

अनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड: ५०३, लिंक अपार्टमेंट, ३५ वी गल्ली, जुने खार, खार रोड (पश्चिम), मुंबई – ४०० ०५२.

दूरध्वनी क्रमांक: ०२२-२६०५ ४४७४ / २६०५ ७०५४ / २६०५ ७०५६

ईमेल: aniruddhazbfb1@gmail.com

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com