श्रीमद्पुरुषार्थग्रंथराज
‘अंधकार दूर करण्याचा माझा यज्ञ म्हणजेच ‘श्रीमद्पुरुषार्थ’ अर्थात्‘सत्यस्मृती’. हा यज्ञ मी आजपर्यंत करत आलो आहे व निरंतर करत राहणारच आहे. माझ्या नावाप्रमाणे हा यज्ञही अनिरुद्धच आहे व त्यातून निर्माण होत राहणारा प्रकाशही. हा मार्ग स्वीकारा असा माझा आग्रहही नाही आणि विनंतीही नाही. कारण प्रत्येक जीवाचे विचारस्वातंत्र्य व कर्मस्वातंत्र्य मला पूर्णपणे मान्य आहे. ‘श्रीमद्पुरुषार्थ’ अर्थात्‘सत्यस्मृती’ हा माझा धर्म आहे आणि तो मी पाळणारच. माझे प्रत्येक निर्णय, कृती व कार्य ह्याच नियमाने झाले व होत राहणार’, या शब्दांत सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाविषयीची भूमिका ग्रन्थराजाच्या प्रत्येक खंडाच्या सुरुवातीसच स्पष्ट केली आहे.
‘अनेक ॠषी, मुनी, आचार्य, संत, तत्त्वज्ञानी महापुरुष व सामान्य जनांच्या चिंतनपुष्पातून मी हा मध गोळा केला व ह्या ‘श्रीमद्पुरुषार्थ’अर्थात ‘सत्यस्मृती’ पोळ्यात एकजीव केला. हे पोळे मी खुले ठेवले आहे. ज्याला ह्याची चव व औषधी गुण आवडतील त्या प्रत्येकासाठी’, असे सदगुरु अनिरुद्ध या ग्रंथराजात सांगतात.
‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’ सद्गुरु अनिरुद्धांच्या १३ कलमांपैकी एक कलम आहे. ‘सत्यप्रवेशः’, ‘प्रेमप्रवास’ आणि ‘आनन्दसाधना’ असे या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचे तीन खंड आहेत.
तीनही खंडांची रचना –
१) सत्यप्रवेश – आत्यंतिक निवृत्तिवाद आणि ऐहिक स्वार्थाशी निगडीत प्रवृत्तिवाद या दोन्ही एकांतिक गोष्टींनी व्यक्तिजीवनात व समाजात असमतोल तयार होतो. भक्तीच्या सहाय्याने निष्काम कर्मयोग शिकविणारा मार्गच मानवधर्माला परमेश्वरी ऐश्वर्य प्राप्त करून देतो. सदगुरु श्रीअनिरुद्धांनी या मर्यादामार्गांचा परिचय या खंडात अत्यंत सोप्या शब्दात आणि सोपी उदाहरणे देऊन करून दिला आहे.
२) प्रेमप्रवास – मानवाचा जीवनप्रवास आनंदमय होण्यासाठी आवश्यकता असते, संपूर्ण प्रवासभर त्या एकमेव सत्याला, परमेश्वराला शोधत राहण्याची आणि ह्या सत्याचा शोध म्हणजेच परमेश्वराचा शोध अर्थात आनंदप्राप्ती, हा प्रवास प्रेममय असल्याशिवाय होत नाही. समर्थ व तृप्त जीवनप्रवासाचा एकमेव मार्ग म्हणजेच ‘प्रेमप्रवास’ आणि ‘प्रेमप्रवास’ म्हणजे ‘मर्यादापुरुषार्थ’.
श्रीमद्पुरुषार्थाचा हा द्वितीय खंड अर्थात ‘प्रेमप्रवास’ हा तीन प्रदेशांतून विकसित होत जातो.
१) पूर्वरंग
२) श्रीरंग-पुरुषार्थ पराक्रम
३) मधुफलवाटिका
‘पूर्वरंग’ म्हणजे अज्ञाताचा वेध घेत ज्ञानाची प्राप्ती.
‘श्रीरंग’ म्हणजे उत्कृष्ट पुरुषार्थ कसा करावा व संपूर्ण जीवन कर्तुत्ववान, भक्तिशील बनवून ‘त्या’ची प्राप्ती करून घ्यावी ह्याचे सुस्पष्ट आणि संपूर्ण मार्गदर्शन.
‘मधुफलवाटिका’ म्हणजे असं एक सुंदर उपवन की ज्यात कुठूनही प्रवेश केला व कुठल्याही झाडाला हात घातला तरी परिपक्क मधुर फळच प्राप्त होणार.
३) आनन्दसाधना – ‘आनन्दसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावरून परमेश्वरावर प्रेम करीत वाटचाल करताना जागोजागी भरभरून राहिलेला आनन्द प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय.
‘साधना’ म्हणजे काहीतरी उग्र, कठोर असे उपक्रम नव्हेत तर ‘साधना’ म्हणजे नवविधा निर्धार स्वतःच्या जीवनात यशस्वीरीत्या आणण्यासाठी परमेश्वराच्या अष्ट-बीज-ऐश्वर्याशी व परमात्म्याच्या नव-अकुंर ऐश्वर्याशी नाते व दुवा जोडण्याचे प्रयास.
‘प्रत्येक जीवात्म्यास आपले जीवन अधिकाधिक सुंदर व समर्थ करण्यासाठी ‘सत्यप्रवेश’ व ‘प्रेमप्रवास’ हाताला धरून मार्गदर्शन करतात. तर ‘आनन्दसाधना’ जीवात्म्याच्या ह्या परिश्रमांना परमेश्वरी सहाय्य मिळवून देत राहते.
‘सत्यप्रवेश’, ‘प्रेमप्रवास’ व ‘आनन्दसाधना’ हे तीनही मार्ग, त्यांचा ध्यास घेतला असता वेगवेगळे न उरता एकरुप होतात व मानवी जीवनास परिपूर्ण बनवितात. मग ती सामान्य प्रापंचिक जीवनातील गरज असो वा पूर्ण आध्यात्मिक पातळीवरील आवश्यकता.
श्रीमद्पुरुषार्थामधील ‘आनन्दसाधना’ या तिसर्या खंडातील ‘आचमन १७१’ आम्हाला श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराजाची माहिती आणि महती दोन्ही विशद करून सांगते –
‘प्रवासाला निघताना प्रत्येकजण आपल्या प्रवासाची तयारी करून त्यानुसार तिकीट, धन, तहानभुकेची सोय इत्यादि प्रवासी सामान आपल्याबरोबर घेत असतो व त्यामध्येही आपत्कालासाठी काही तरतूद करून ठेवलेली असते. अशा प्रवाशाचाच प्रवास सफल संपूर्ण होतो.
जीवनाच्या प्रवासातील यशस्वी प्रवाशाची अशी शिदोरी म्हणजे श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज. ह्या शिदोरीत त्या प्रवाशाला प्रत्येक प्रसंगी उपयोगी पडणारे सर्वकाही असतेच असते.’
श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचे हरिगुरुग्रामला आगमन –
दर गुरुवारी श्रीमद्पुरुषार्थग्रंथराजाच्या मूळ प्रतीचे आगमन श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे येथे होते. पालखीतून हे ग्रंथ मुख्य स्टेजवर आणले जातात. रामनामाच्या २५ वह्या लिहीणार्या श्रद्वावानांना श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाची पालखी वाहण्याची व ५० वह्या लिहीणार्या श्रद्वावानाला ग्रंथराजास चवर्या ढाळायची सेवा मिळते.
श्रीमद्पुरुषार्थग्रंथराज कुठे मिळेल?
हे तीनही ग्रंथ श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्, श्रीहरिगुरुग्राम आणि श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांवर तसेच ‘आंजनेय इ-शॉप’ या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत. (लिंक देणे)