श्री व्यंकटेश सप्तकोटी जप
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शेषाद्री पर्वत. पृथ्वीवरील या स्थानाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. शेषाद्री पर्वत, व्यकंटगिरी पर्वत, शेषाचलम पर्वत, तिरुमाला पर्वत अशा विविध नावाने ओळखल्या जाणार्या या पर्वतावर असलेले व्यंकटेश मंदीर जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या महाविष्णु तिरुपती बालाजीची एक अनोखी उपसना अत्यंत वेगळ्या आणि सुंदर रितीने ३०० वर्षांपूर्वी रामानुजाचार्यांनी केली होती. ‘ॐ व्यंकटेशाय नम:’ या अष्टाक्षरी मंत्राने ‘सप्तकोटी अर्चनम्’ करीत रामानुजाचार्यांनी आपल्या या आराध्य दैवताची उपासना पुर्णत्त्वास नेली. रामानुजाचार्यांनी व्यकंटेशाचा हा सप्तकोटी जप केला तो वैशाख विनायकी चतुर्थी ते वैशाख मोहिनी एकादशी दरम्यानचा कालावधी होता.
२००० साली ७ ते १४ मे दरम्यान वैशाख विनायकी चतुर्थी ते वैशाख मोहिनी एकादशी या काळातच सद्गुरू अनिरुद्धांनी (बापू) असाच ‘श्री व्यंकटेश सप्तकोटी जप’ श्रद्धवानांकडून करून घेतला होता. मुंबईतील वांद्रे येथील श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
‘‘रामानुजाचार्यांनी ज्या विधिवत, ज्या पध्दतीने, ज्या भावनेने, ज्या भावाने, ज्या प्रेमाने, ज्या भक्तीने हे सर्व केलं त्याच्या एक लक्षांश का होईन एक लहानसा अंश जरी आपण करू शकलो तरी ते खूप सुंदर असेल. रामानुजाचार्य महान होते, मी खूप लहान असेन, आपण सर्व खूप लहान असू परंतु तरीदेखील त्यांचे अनुकरण करण्याची लाज बाळगायचं आपल्याला काहीच कारण नाही. आपण लहान आहोत ते महान आहेत. असा विचार करायचा नाही. मी कोणत्या रस्त्याने जाऊ? असा प्रश्न शौनकमुनींनी आपल्या गुरुंना एकदा विचारला होता. त्यांच्या गुरुने त्यांना उत्तर दिलं ‘येन मार्गेन महाजना गत:’, ज्या मार्गाने श्रेष्ठ पुरुष जातात त्या मार्गाने जरुर जावं. तिथं कुठला धोका नसतो. असा हा रामानुजाचार्यांचा मार्ग आज आपल्याला चोखाळायचा आहे.’’, असे बापूंनी श्री व्यंकटेश सप्तकोटी जपाच्या आयोजनापूर्वी श्रद्धवानांना सांगितले होते.
‘श्री व्यंकटेश सप्तकोटी जप’ उत्सवात श्री व्यंकटेशाची हुबेहुब तिरुपतीसारखी ७ फूट उंच मूर्ती बनविण्यात आली. या भगवान व्यकंटेशाच्या बाजूला पद्मावतीचे स्थान होते, तर दुसर्या बाजूला शेषगिरी व्यंकटगिरीचे स्थान होते. व्यंकटेशाची मूर्ती घडत असतानाच ‘सप्तचक्रांची स्थापना’ मूर्तीमध्ये करण्यात आली. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत सात चक्र भगवान व्यकंटेशाच्या मूर्तीत स्थापित करण्यापूर्वी ४९ भक्तांकडून सातही चक्रांच्या विविध मंत्रांचे पठण, तसेच अन्य ७ भक्तांकडून विशिष्ट मंत्रांचे १ कोटी वेळा पठण करून घेऊन ही सप्तचक्रे सिद्ध करण्यात आली. मगच त्या चक्रांची स्थापना मूर्तीमध्ये केली गेली.
श्री व्यंकटेश सप्तकोटी जप काळात सकाळी ८.०० वाजल्यापासून मंत्र पठण कक्षात नियोजनानुसार नेमून दिलेल्या जागांवर बसून श्रद्धवान जप करीत. यामध्ये दर्शनाला येणार्या भक्तांचाही जप मिसळून हा जप वृद्धींगत होत होता. सप्तकोटी जपासाठी ७००-७०० च्या दोन बॅचेसमध्ये, दररोज १२ तास (६ तास – १ बॅच प्रमाणे) असे आठ दिवस (७ मे ते १४ मे २०००) श्रध्दावान ‘ॐ व्यंकटेशाय नमः’ हा जप अत्यंत प्रेम व भक्तीभावाने करत होते.
सातव्या दिवशी सकाळीच ७ कोटी जप पूर्ण झाला. पण तरीही सद्गुरु श्रीअनिरुध्दांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीपर्यंत जप चालूच होता. जप समाप्तीनंतर १४ मे २००० रोजी त्रिसागर संगम जलाने अभिषेक करण्यात आला. या जपकाळात पुरुष भक्तांनी तिरुपतीच्या परंपरेनुसार केलेले केशवपन आणि तशीच विशिष्ट वेशभूषा, अष्टगंधाने रेखांकित केलेले नाम ह्यामुळे वातावरण संपूर्णपणे भक्तिभावाने भारलेले होते.
‘ॐ व्यंकटेशाय नमः’ या मंत्राचा सप्तकोटी जप प्रथम रामानुजाचार्यांनी केला असला, तरी हा जप सिद्ध केलाय साक्षात श्रीलक्ष्मीने, साक्षात विष्णुपत्नीने; आणि पहिल्यांदा उच्चारलाय शेष भगवंताने’, असे बापूंनी या जपाचे महत्त्व सांगितले होते. त्यामुळे येणारा प्रत्येक श्रद्धावान हा जप करीत आणि जप मनात ठेवूनच येथून बाहेर पडत होता.
या ठिकाणी ‘पापमोचन कुंड’ही उभारण्यात आला होता. ‘पापमोचन कुंडा’भोवती पवित्र इष्टिका डोक्यावर घेऊन पापविमोचनी प्रदक्षिणा श्रद्धवान घालत होते. प्रदक्षिणेच्या वेळेस ‘गोविंदा गोविंदा, जय व्यंकटेश गोपाला’ हा जप अखंड सुरू होता. ह्या इष्टिका अत्यंत पवित्र अशा तिरुमलाई सरोवर व पद्मसरोवर ह्या स्थानांवरील पवित्र मृत्तिका व पवित्र जल आणून त्यापासून बनविण्यात आल्या होत्या. ‘हे देवा, आजपर्यंत मी खूप चुकलो असेन, पण यापुढे माझ्या हातून कमीतकमी चुका घडोत’, अशी प्रार्थना प्रदक्षिणा करताना जपाच्या बरोबरीनेच श्रद्धवान करीत होते. ही प्रार्थना व जप करत श्रद्धावान कितीही वेळा प्रदक्षिणेचा लाभ घेऊ शकत होता.
व्यंकटेशाच्या मूर्तीस प्रत्येक दिवशी अलंकारित ‘महापुष्पम् हार’ घालण्यात येत होते. अर्पण करण्यात आलेला महाभोगही खूप आगळा-वेगळा, भव्य होता. पहिल्या व पाचव्या दिवशी १००८ फळांचा, दुसर्या व सहाव्या दिवशी १००८ लाडवांचा, तिसर्या व सातव्या दिवशी १००८ चुरमुर्याच्या लाडवांचा, चौथ्या व आठव्या दिवशी ९ क्विंटल दही-भात असा महाभोग एकेका दिवशी अर्पण करण्यात आला. हा प्रसाद व भक्तांनी आणलेला प्रसाद अनाथ संस्थांमधील विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती व गरीबांना वाटण्यात आला.
महाभोग अर्पण करताना
‘रमया रमणाय व्यंकटेशाय मंगलम्| सर्व लोकनिवासाय श्रीनिवासाय मंगलम्|’
हा जप पाच वेळा म्हणण्यात येत असे.
या उत्सव काळात होणारी आरती खूपच सुंदर होती. संतश्रेष्ठ पुरंदरदास यांची कन्नड-आरती रचना व तामिळनाडूच्या संत कवयित्री ‘देवी अंडाळ’ यांची रचना सर्व भक्त त्या भाषा येत नसतानासुद्धा म्हणायला शिकले. दर एक तासाने आरती होत होती. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सद्गुरू श्रीअनिरुद्धांनी ह्या आरत्यांचा अर्थ श्रद्धावानांना समजावून सांगितला होता.
‘‘चांगल्या रितीने जर गती करायची असेल तर मला आधी स्थिर व्हायला शिकलं पाहिजे. आणि हे स्थिर करणारं बीज आहे ठं बीजम्. ‘ठं’ हे व्यंकटेशाचे बीज आहे. हेच बीज विठ्ठलाचंही आहे. दोघेही बालाजीच आहेत. कर्नाटकु असणारा हा पांडुरंगसुध्दा बालमुर्तीच आहे. हा बालगोप आहे. तसाच ह्या व्यंकटेशसुध्दा बालगोपच आहे. हे दोघही मुळात आपण बालाजी ह्या रुपामध्येच पूजातो. ह्या ‘ठं’ बीजाची उपासना आपल्याला करायची आहे.’’, असे बापू म्हणाले होते. या व्यंकटेशाच्या कथा सद्गुरू अनिरुद्धांनी पितृवचनातून सांगितल्या. त्यामुळे या लाडक्या विठूच्या, व्यंकटेशाच्या ओढीने, त्याच्या भक्तीत येथील वातावरण भारलेले होते.