श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’, अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ असा उत्सव. जी दुर्गमा आहे, ती दुर्गा. या चंडिकेला प्राप्त करून घेणं आणि न प्राप्त करून घेणंही दुर्गम असल्याने तीला दुर्गा हे नामाभिदान मिळाले. एकाबाजूला ॠषीमुनी दुर्गेला प्राप्त करून घेण्यास महतप्रयास करतात, कठीण मार्गाने दुर्गेला प्राप्त करून घेतात, तर दुसर्या बाजूला राक्षस तितकेच अवघड प्रयत्न करून या दुर्गेला न प्राप्त करून घेण्याचा निश्चय पुर्ण करतात. ॠषी आणि राक्षस अशा दक्षिण ध्रूव आणि उत्तर ध्रूवच्या मध्ये आहे, तो मानव. अशा दुर्गेची आपण आराधना करायची आहे, ती सुद्धा अशा दुर्मिळ उत्सवाने की ज्यासाठी अनेक योग एकत्र यावे लागतात, अनेक संकल्प आधी पुर्ण व्हावे लागतात.’ , असे श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’ची पहिल्यांदा विस्तृत माहिती स्वत: सद्गुरू श्रीअनिरुद्धांनी (बापू) दिली, त्यावेळी श्रद्धावानांना सांगितले होते.
‘१९९६ पासून चार रसयात्रा, भावयात्रा, व्यंकटेश जप, जगन्नाथ उत्सव, गायत्री उत्सव, अवधुत चिंतन उत्सव, धर्मचक्राची स्थापना, गुरुक्षेत्रम्ची स्थापना, गुरुक्षेत्रम्मध्ये महिषासूरमर्दिनीची स्थापना, तेव्हा केलेले वज्रमंडल पीठपूजन आणि त्यानंतर त्रिविक्रमाची स्थापना या सार्या पायर्या ओलांडत आपण येथे येऊन पोहोचलो आहोत. या अतिशय सुंदर, आल्हादायी, संपूर्ण जीवनाचे सोने करणारी, अखिल जीवन मधुर करण्यासाठी जे बळ लागतं, ते बळ मिळविण्यासाठी मनुष्याला मिळणारी सर्वोच्च संधी म्हणजे हा प्रसन्नोत्सव’, असे बापू म्हणाले होते.
असा हा श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’ ८ मे ते १७ मे २०११ या कालाधीत सपन्न झाला.
ह्या उत्सवाचे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितलेले महत्त्व
१) शुभंकारा केंद्रांची संख्या व क्षमता वाढवणे.
२) निष्क्रिय केंद्रांना शुभ मार्गावर सक्रीय करणे
३) कलिच्या प्रभावाखालील केंद्रांना कलिच्या प्रभावापासून मुक्त करणे, अर्थात आमच्या प्रगतीच्या आड येणार्या सर्व आंतरिक व बाह्य अडचणी, विरोध व शत्रु ह्यांचा बिमोड घडवून आणणे.
मानवाच्या प्राणमय देहात एकूण १०८ शक्तीकेंद्र असतात. यातील ४५ शुभंकरा केंद्रे, ५२ निष्क्रियकेंद्रे आणि ११ कलिच्या प्रभावाखालील केंद्र असतात. निष्क्रिय शक्तिकेंद्रांना शुभ मार्गावर सक्रिय करणे, कलिच्या प्रभावाखाली असलेल्या शक्तीकेंद्रांना कलिच्या प्रभावापासून मुक्त करणे हे कार्य ‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’द्वारे श्रद्धावानांच्या आयुष्यात घडून आले.
’मातृवात्सल्यविंदानम्’ ग्रंथात विशद करण्यात आलेले आदिमातेचे आख्यान व त्याद्वारे मिळणारे ज्ञान, भक्ती, आत्मविश्वास, कवच, संरक्षण हे सर्व म्हणजेच महिषासुरमर्दिनीचा नववा अवतार ‘मंत्रमालिनी’. हा अवताराची फलश्रुति म्हणचेच हा ‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव.’
या ‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’पूर्वी काही महिने अगोदर प्रत्येक इच्छुक श्रद्धावानाला श्रीकंठकूप पाषाण आपल्या घरी नेऊन श्रीदेवीपूजनम् करण्याची संधी प्राप्त झाली होती. या कंठकूप पाषाणाचे पूजन सर्वप्रथम श्रीहरिगुरुग्राम येथे सदगुरु श्रीअनिरुद्धांनी केले होते. त्यानंतर हजारो श्रद्धावानांनी आपल्या घरी हे श्रीकंठकूपपाषाण पुजन अत्यंत उत्साहात व प्रेमाने केले. श्रीकंठकूप पाषाणाचे घरी आगमन झाले म्हणजे साक्षात आदिमाता आपल्या घरी आली या भावाने व विश्वासाने समस्त श्रद्धवानांनी हे पुजन केले. ही या उत्सवाची नांदी होती.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’ खूप अनोखा होता. या उत्सवात प्रमुख तीन देवता होत्या. यामध्ये महिषासूरमर्दिनी अर्थात अशुंभकरनाशिनीचे ‘अखिल कामेश्वरी’ हे स्वरुप, महाकालीचे ‘कालनियंत्रक’ आणि महासरस्वतीचे ‘आरोग्यभवानी’ हे स्वरुप होते. चण्डिकेची ही तीनही रुपे यावेळी प्रमुख देवतेच्या रुपात उत्सवाचे ठिकाण श्रीहरिगुरुग्राम येथे मुख्य स्टेजवर मुर्तीरुपात विराजमान होती. यामध्ये ‘अखिल कामेश्वरी’ स्टेजवर मधोमध, ‘कालनियंत्रक’ हे स्वरुप तिच्या उजव्या बाजूस, तर महासरस्वतीची ‘आरोग्यभवानी’ रुप डाव्या बाजूस स्थापित करण्यात आले होते.
‘काल-काम आणि आरोग्य’ या अतिशय आवश्यक गोष्टींमधील बाधा आणि अडचणी दूर करणार्या महिषासूरमर्दिनीच्या या तीनही रुपांचे पुजन उत्सवाच्या दहा दिवसात झाले. दररोज महापूजन, सकाळी सातपासून ते रात्री दहापर्यंत नित्यजप या उत्सवकाळात होत होता. तीन वेळा नैवेद्य आणि सायंकाळ महाभोग अर्पण केला जात होता. रोज वेगवेगळे असे नऊ महाभोग होते. या महाभोगाबरोबर दररोज वेगळ्या नदीचे जल दाखविले जात होते. महाआरती रोज दुपारी एक वाजता आणि रात्री नऊ वाजता होती. स्वत: बापू ही महाआरती करीत. तसेच श्रद्धवानांनाही महापूजनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
तीन प्रमुख देवतांसमोर ‘सहस्त्रचण्डि यागा’चे आयोजन करण्यात आले होते.
१) ‘ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’
२) ‘नतभ्यं-सर्वदा-भक्त्या चण्डिके दुरितापहे । रुपं देही, जयं देहि, यशो देहि, द्विषौजहि।’
३) ‘ॐ नमश्चण्डिकायै’
या तीन मंत्राचा मिळून एक सेट अशा पद्धतीने येथे सतत पठण होत होते. तसेच दुपारी दोन आणि रात्री साडेआठ वाजता सप्तशतीपाठाचे पठण येथे केले जायचे. या यागासाठी १०८ विशेष प्रशिक्षीत पुरोहित नियुक्त करण्यात आले होते.
भक्तांसाठी हा सहस्त्रचण्डि याग पर्वणी होती. काही न घेता अथवा न देता या यागात श्रद्धवानांना सन्मलित होता येत होते. भक्तांना ‘सहस्त्रण्डिका यागा’चे दर्शन घेता येत होते. माता चण्डिकेची कृपा मिळविण्यासाठी प्रयास करण्याची ताकद आणि सामर्थ्य प्रदान करणारा हा याग होता.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’त मानवाच्या प्राणमय देहात असणार्या कलिकेंद्रांना क्षीण करण्यासाठी श्री ‘महाकालीकुंड’ तयार करण्यात आला होता.
मधु, कैटभ, महिषासुर, शुंभ, निशुंभ, रक्तबीज, धूम्रलोचन, असिलोमा, चण्ड, मुंड आणि रावण असे महाकालीने मारलेल्या अकरा असूरांची मारलेल्या स्थितीतील येथे प्रतीके होती. हेच अकरा असुर आपल्या शरीरातील कलिच्या प्रभावाखालील अकरा केंद्र तयार करतात. ‘कलिचा नाश करते ती काली!’. श्रद्धवान या ‘महाकालीकुंडा’त ‘असूर दहन द्रव्य’ अर्पण करीत होते. हे कोणालाही बंधनकारक नव्हते, तर स्वेच्छेने होते.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’त ‘महालक्ष्मी दीप’ ही बापूंनी श्रद्धवानांना उपलब्ध करून दिलेली आणखी एक पर्वणी. आजच्या काळात ५२ शक्तीपिठाची यात्रा करणे सामन्य श्रद्धवानांसाठी खूप कठिण गोष्ट आहे. सद्गुरू अनिरुद्धांनी ह्या दीपात ५२ शक्तीपीठांची स्थापना केली होती. त्यामध्ये ५२ मोठ्या ज्योती होत्या. श्रद्धावान त्यामध्ये ‘सूरस्नेहद्रव्य’ अर्पण करत होते. श्रद्धावानांना ५२ शक्तीपिठाची यात्रेचे पुण्यफळ प्राप्त होण्याच्या दृष्टीने ह्या यात्रेचे प्रतीक असणार्या ‘महालक्ष्मी दीपाची’ योजना करण्यात आली होती. कलियुगात मानवाच्या शक्तिकेंद्रांपैकी जी केंद्रे निष्क्रिय झाली आहेत त्या शक्तिकेंद्रांना पुन्हा सक्रिय व सशक्त करणे ही अतिशय सुंदर व पवित्र संकल्पना ह्या महालक्ष्मीदीपाद्वारे साकार झाली.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’मध्ये परमपूज्य बापूंनी मानवाच्या प्राणमय देहातील ४५ शुभंकरा केंद्रांना सक्षम करण्यासाठी श्रद्धवानांना उपलब्ध करून दिलेली संधी म्हणजे ‘महासरस्वती वापी’.
वापी म्हणजे विहीर. ७२० कंठकूप पाषाणांचा उपयोग करून ही वापी बांधण्यात आली होती. त्याच्यावर समंत्रक, त्यांची नीट सिद्धता करण्यात आली. सनातन देवीसूक्त, पुरुषार्थ ग्रंथराजातील काही निवडक प्रार्थना व श्रीरामरसायनाचे एक महत्वाचे पान या तीन गोष्टींनी मिळून, ह्यांचे पठण करुन, पूजन केले गेले.
ह्या वापीमध्ये भक्त स्वेच्छेने ‘मांगल्यद्रव्य’ अर्पण करत होते. मांगल्य द्रव्य म्हणजे काय? तर हळद, कुंकू आणि अबीर. दहा दिवसांनी उत्सव संपल्यावर ह्या सर्व पाषाणांनी ‘प्रथम पुरुषार्थधाम’ मधील चण्डिका गर्भगृहाची मूळ बैठक बांधली जाणार आहे. अशारितीने हे पाषाण प्रथम पुरुषार्थधामामध्ये ‘चण्डिकागर्भगृहाच्या’ रूपाने कायमचे स्थिर होणार आहेत.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’मधील ‘शत्रुघ्नेश्वरीपूजन’ म्हणजे रक्तदंतिका ह्या महिषासुरमर्दिनीच्या चौथ्या अवताराच्या म्हणजेच ‘शत्रुघ्नेश्वरी’ ह्या उग्र रूपाचे पूजन.
मानवी जीवनात वारंवार शत्रुत्वाचा अनुभव प्रत्येकाला येतच असतो. अशा शत्रुंचा व त्यांच्या कारवायांचा बिमोड व्हावा म्हणून ह्या उत्सवात रक्तदंतिका ह्या महिषासुरमर्दिनीच्या चौथ्या अवताराच्या म्हणजेच ‘शत्रुघ्नेश्वरी’ ह्या उग्र रूपाचे पूजन केले गेले.
(रक्तदंतिकेच्या अवताराची कथा मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथात वाचायला मिळते). अतिशय उग्र रुप असलेली रक्तदंतिकेची मुर्ती यावेळी हॉलमध्ये बसविण्यात आली होती. तिच्यासमोर बसून पुजन श्रद्धवानांना करता येत होती. प्रत्येक बॅचचे पुजन झाल्यावर रणवाद्याच्या गजरात समोरचा पडदा उघडला जात असे आणि श्रद्धवानांना या रक्तदंतिकेचे दर्शन घेता येत असे.
रणवाद्यांच्या गजरातील आरती देखील देवीच्या रूपाप्रमाणेच अतिशय वेगळी होती. अत्यंत उग्र रूप असूनही श्रद्धावानांसाठी ते प्रेमळच आहे हा भाव ठेवूनच श्रद्धावान पूजा व दर्शनात सहभागी होत होते.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’त एक यज्ञ होता, त्याचे नाव ‘श्रीदुर्गावरद होम’. हा ‘श्रीदुर्गावरद होम’ म्हणजे माता चण्डिकेची कृपा मिळवण्याचा, जे प्रयास करावे लागतात, ते प्रयास सहजतेने करण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद देणारा होम. हा यज्ञ अत्रिसंहितेच्या आधारे व संस्कृत मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथाच्या आवृत्तीनुसार केला गेला. नऊ दिवस हा यज्ञ चालू होता व नवव्या दिवशी दिवसभर यज्ञाची पूर्णाहूती होऊन सांगता झाली. त्याचे दर्शन श्रद्धवावानांना घेता येत होते.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’तील जान्हवीस्थानम् व गंगामातेची स्थापना म्हणजे उत्सवकाळातील अतिशय महत्त्वाचा भाग होता.
वैशाख महिन्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ‘गंगा सप्तमी’ म्हणजेच ‘गंगोत्पत्तीचा’ दिवस! ह्याच दिवशी गंगा ‘भागीरथी’ बनून पृथ्वीवर अवतरली होती. त्या उत्सवाच्या कालावधीतच (८ मे ते १४ मे २०११) १० मे रोजी ‘गंगा सप्तमी’ असल्याने ह्या दिवशी प्रतिकात्मक गंगेची स्थापना परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्धांनी केली. जिथे ही स्थापना करण्यात आली ते स्थान म्हणजे ‘जान्हवीस्थानम्’! ह्या स्थानावर मकरावर (म्हणजे मगरीवर) बसलेल्या गंगेच्या पंचधातूच्या मूर्तीची पूजनासाठी विधिवत् प्रतिष्ठापना केली होती.
तिच्या समोरच्या जागेवर काही मोजके प्रपाठक बसून अतिशय सुंदर मंत्राचा जप करत होते आणि गंगेजवळ अभिषेक सतत चालू होता. त्या अभिषेकाचे जल कालव्यामध्ये खेळवले होते. रांगेतून जाणार्या प्रत्येक श्रद्धावानाला या खर्याखुर्या गंगेच्या जलामध्ये आपले हात बुडवता येत होते. हातात त्याचे दोन थेंब घेऊन आपल्या डोक्यावर टाकता येत होते.
त्यासाठीच्या अभिषेकाला जगभरातील शतनद्यांचे जल आणण्याचे पवित्र आणि अवघड कार्यही सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावान कार्यकर्त्यांकडून संपन्न करून घेतले. उत्सवानंतर गंगामातेची (शिवगंगागौरीची) स्थापना ’श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ येथे करण्यात आली.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’तील आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे ‘अवधूतकुंभाची सिद्धता’.
पंचधातूंच्या २४ कुंभांमध्ये ‘अविरत उदी’ भरलेली होती आणि कालातीत संहितेनुसार हे कुंभ दहा दिवसांमध्ये सिद्ध केले गेले. त्यांचे विशिष्ट पद्धतीने पूजनही केले गेले. २४ अवधूत कुंभ हे मुख्य तीन देवतांच्या मुर्तीच्या बाजूला एका विशिष्ट यंत्राच्या रचनेमध्ये ठेवलेले होते.
‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’ खरोखरच प्रत्येक श्रद्धवानासाठी अद्भूत अनुभव होता. ज्या श्रद्धवानांना या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याच्यासाठी हा अविस्मरणीय बनला आहे. कधी न विसरता येणार आणि जीवनाचे सोने करणारा अनोखा उत्सव.