श्री माघी गणेश जन्मोत्सव
२००९ सालापासून श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, भारतीय भाषा संगम आणि श्री अनिरुद्धाज हाऊस ऑफस फ्रेंडस’ या संस्थेच्या वतीने माघ महिन्याच्या शुद्ध (शुक्ल) चतुर्थीस श्री माघी गणेशोत्सव साजरा करीत आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्ण वैदिक पद्धतीने एक-दिन-साध्य श्रीगणेश-प्रतिष्ठा यागाचे आयोजन केले जाते.
मानवाच्या शरीरातील सप्तचक्रांमध्ये ‘मूलाधारचक्र’ ज्याचा स्वामी ‘श्रीगणपति’ आहे. ह्या गणपतिचे मूळ रुप म्हणजेच ’ब्रह्मणस्पति’! ज्याच्या पुढच्या उजव्या हातात मोदक, डाव्या हातात तुटलेला दात व मागील दोन हातांमध्ये प्रत्येक परशू व पाश ही चार आयुधे आहेत. अशा गणपतीचा ऋग्वेदामध्ये ‘ब्रह्मणस्पति’ नावाने उल्लेख आहे.
ब्रह्मणस्पति हा श्रीशिवगंगागौरी व श्रीकिरातरुद्र ह्या शिव-पार्वतीच्याच रुपांचा पुत्र तर, गणपति हा शिव-पार्वतीचा पुत्र. हा घनप्राण म्हणजे द्रव्यशक्तीच्या वापरातून मानावाच्या त्रिविध देहात (अर्थात मन, प्राण, प्रज्ञा) तसेच निसर्गात उत्पन्न होणारी स्थूल स्तरावरील ‘कार्यशक्ती’! ह्या कार्यशक्ती किंवा घनप्राणालाच गणपती असे म्हणतात.
ब्रह्मणस्पतिच्या हातातील चार साधनांचा संबंध मानवाच्या मूलाधारच्रकातील ‘आहार, विहार, आचार व विचार’ ह्या ४ पाकळ्यांशी जोडण्यात आला आहे.
या चार साधनांचे महत्व पुढीलप्रमाणे –
मोदक – मूलाधार चक्राच्या चार पाकळ्या म्हणजे आहार, विहार, आचार व विचार. त्यापैकी आहार या पाकळीवरील गणपतीच्या प्रभावाचे प्रतीक म्हणजेच मोदक. जे जे अन्नाद्वारे वा मनाद्वारे ग्रहण करतो ते सर्व फक्त मंगलच असावे यासाठी वापरले जाणारे शस्त्र म्हणजे मोदक.
दन्त – मूलाधार चक्राच्या ‘विहार’ ह्या पाकळीवरील गणपतीच्या प्रभावाचे प्रतीक म्हणजे दन्त. मानवाचे मन भटकते, बुद्धी प्रवास करते, शरीर-प्राण कालगति अनुसरतात त्यातूनच सुखदुःखांचा अनुभव येतो. ‘दन्त’ हे अस्त्र ‘विहार’ कसा असावा हे शिकवते व मानवाची मन-बुद्धी भरकटण्यापासून थांबविते.
पाश – ‘पाश’ म्हणजे फास. मानवाच्या ‘आचार’ म्हणजे वर्तनाला नियंत्रित करण्यासाठी हे अस्त्र! म्हणून ह्या मूलाधारचक्राच्या पाकळीवरील गणपतीच्या प्रभावाचे ‘पाश’ हे प्रतीक आहे.
परशु – हे अस्त्र मानवाच्या विचारांना उचित आकार देते. मूलाधार चक्राच्या ‘विचार’ ह्या पाकळीवरील गणपतीच्या प्रभावाचे हे प्रतीक आहे.
गणपतीकडे हे सर्व प्रभाव आदिमाता अनसूयास्वरूप चण्डिकेकडून आलेले आहेत. ह्या लीलेमुळेच विश्वाचा घनप्राण असणारा हा मंगलमूर्ती गणेश विघ्नहर्ता ठरतो.
मानवास त्याचा अभ्युदय प्राप्त करुन देण्यासाठी आदिमाता अनसूयामातेच्या आज्ञेने पार्वतीमातेने कैलासावर विश्वाच्या घनप्राणास पुत्र रुपात साकार केले. याची कथा सद्गुरू श्री अनिरुद्ध लिखित ‘मातृवात्सल्यविंदानम्’ ह्या ग्रंथात सविस्तरपणे दिलेली आहे. ज्या दिवशी घनप्राणास साकार रुप दिले गेले तो दिवस म्हणजे ‘माघ शुद्ध चतुर्थी’. म्हणूनच ह्या दिवशी श्री माघी गणेशोत्सव साजरा केला.
यासाठी सद्गुरू श्रीअनिरुध्दांच्या देवघरातील ‘ब्रह्मणस्पति’ची मूर्ती पूजनस्थळी आणून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. त्या मूर्तीवर ‘ब्रह्मणस्पतिसूक्ताच्या’ पठणासह आठ नद्यांच्या जलाने अभिषेक करतात. ‘गृत्समद शौनक’ या ऋषीने लिहिलेले ब्रह्मणस्पतिसूक्त ऋग्वेदातील अत्यंत पवित्र सूक्त मानले जाते. केवळ व्यक्ति किंवा समाजच नव्हे तर अवघ्या राष्ट्राचे भले करणारे व प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला समर्थ व निर्भय बनविणारे हे सूक्त आहे.
सद्गुरू श्री अनिरुध्दांनी श्रद्धावानांसाठी ब्रह्मणस्पति मंत्र पुढीलप्रमाणे सांगितला आहे.
ॐ श्री ब्रह्मणस्पतये पार्वतीपुत्राय । मंगलमूर्तये गणपतये विश्वघनप्राणाय । सर्वविघ्ननिवारकाय नमो नमः॥
श्रद्धावान ह्या मंत्राचा गणेश उत्सवात किंवा दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ७२ वेळ जप करतात किंवा दररोज १०८ वेळा जप करतात.
श्रीअष्टविनायकाचे पूजन व दर्शन
सद्गुरू श्री अनिरुद्धांनी सांगितले आहे की, ‘प्रत्येक मानवाला परमेश्वरीकृपा प्राप्त व्हावी यासाठी मानवाच्या त्रिविध देहात कार्यान्वित असणारी यंत्रणा गणपतिच्या अधिपत्याखाली असते. या यंत्रणेची महत्त्वाची आठ स्थाने अष्टविनायकांच्या अधिकारात येतात. परमेश्वरीकृपा स्वीकारण्यात मानवाच्या प्रज्ञापराधांमुळे येणार्या अडथळ्यांचा, विघ्नांचा नाश व्हावा यासाठी अष्टविनायकांच्या चरणी प्रार्थना केली जाते.
अष्टविनायकांच्या मूळ स्थानात जशी गणपतीच्या जशा मूर्ती आहेत, तशाच सर्व मूर्ती या उत्सवात प्रतिष्ठित असतात. प्रत्येक श्रद्धावान ब्रह्मणस्पति व अष्टविनायक यांस फुले व दुर्वा अर्पण करू शकतो. सायं ४:०० ते रात्रौ ९:४५ वाजेपर्यंत गणपती अथर्वशीर्षाचे १०८ वेळा पुनश्चरण केले जाते. ब्रम्हणस्पतिच्या मंत्रजप पठणात व त्याचप्रमाणे अथर्वशीर्ष पठणात श्रद्धावान सहभागी होऊ शकतात.
माता शिवगंगागौरीपूजन –
ब्रह्मणस्पति हा श्रीशिवगंगागौरी-पुत्र असल्यामुळे एक-दिन-साध्य श्री गणेशप्रतिष्ठा यागाबरोबरच श्रीशिवगंगागौरीमातेचे ही वैदिक मंत्रासह षोडशोपचारे पूजन व अर्चन केले जाते. त्याचबरोबर श्रीशिवगंगागौरी अष्टोत्तर-शतनामावलीचे अखंड पठण केले जाते व माता शिवगंगागौरीस हरिद्रा (हळद) अर्पण केली जाते.
श्रीब्रह्मणस्पति व अष्टविनायक यांचे दर्शन घेऊन परमेश्वरी कृपा स्वीकारण्यातील विघ्ने दूर करण्याची व आपले जीवन परमेश्वरी कृपेने अधिकाधिक बहरण्याची सुवर्णसंधीच सद्गुरुकृपेने या माघी गणेशजन्मोत्सवात श्रद्धावानांना मिळते म्हणून श्रद्धावान दरवर्षी श्री माघी गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा करतात.