इको फ्रेंडली गणेशमूर्ती
विद्यांचा अधिपती व बुद्धिदाता म्हणून ओळखण्यात येणार्या ‘श्रीगणेशा’चा जन्मोत्सव अर्थात गणेशोत्सव हा संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव! भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीस आपण मनोभावे गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतो. त्याची श्रद्धेने पूजा करतो. आरती, भजन, पूजन, प्रसाद, नैवेद्य अशा अनेक तर्हेने बाप्पाला साद घालतो आणि पूनर्मिलापाची वेळ येते तेव्हा मनात बाप्पाचं मनोहारी रूप साठवून जड अंत:करणाने निरोप देऊन पूनर्मिलाप करतो. पण पूनर्मिलाप केल्यानंतरची परिस्थिती काय असते? ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळते का?
याचं उत्तर नाही, असंच येईल!
मग, अशा स्थितीत शाश्वत व पर्यावरणास सहाय्य ठरेल, असा पर्याय काय? हा प्रश्नही तात्काळ समोर येतो. तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘इको-फ्रेंडली गणेश’!
‘इको-फ्रेंडली गणेश’मूर्तीची आवश्यकता आताच्या काळातच का निर्माण झाली?
पूर्वीच्या काळी लाकडाच्या व मातीच्या मूर्ती बनविल्या जायच्या ज्या विघटनशील असत. पण आताच्या काळात बनविल्या जाणार्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती आणि त्याचे रंगही अतिशय दुष्परिणाम घडवून आणणारे, आरोग्याला घातक असणारे, पाण्यात न विरघळणारे असतात. म्हणूनच विसर्जनानंतर ह्या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. घातक रसायनांमुळे पाण्याचा आम्ल गुणधर्म वाढतो आणि त्याच बरोबरीने त्यात वापरलेल्या धातुच्या कणांमुळे जलजीवनही धोक्यात येते. तसेच हे पाणी दैनंदिन वापरात आले तर मानव व इतर सजीवही अनेक रोगांचे बळी ठरतात.
हे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना फाऊंडेशन’ने आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. अशा मूर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात व पुढे होणारी हानी आटोक्यात येण्यास मदत होते.
२००५ सालापासून ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ आणि ‘श्री अनिरुद्ध आदेश पथक’ यांच्यामार्फत सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे काम चालू आहे. श्रद्धावानांनी लिहून जमा केलेल्या रामनाम वहीच्या जप लिहिलेल्या कागदाचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात.
यासाठी कागद भिजवून ठेवून त्याच्या लगद्यामध्ये पांढरी शाई, झाडाचा डिंक मिसळला जातो. संपूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे मळून साच्यामध्ये भरले जाते व मूर्ती बनविली जाते. मूर्ती पूर्णपणे वाळल्यानंतर नैसर्गिक रंगांचा (फूड कलर) वापर करुन त्यांना सुंदररित्या रंगविण्यात येते. विसर्जनानंतर अर्थातच हे सर्व पाण्यात पूर्णपणे विरघळून जाते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास त्यामुळे मदत होते.
अशा प्रकारे नाविन्य वापरून प्रथम पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्याबद्दल संस्थेला पेटंट मिळत असूनही स्वतःच्या नावावर हक्क न ठेवता सर्वसामान्यांसाठी ही पद्धत सर्वांना खुली ठेवली व सर्वसामान्य जनतेला पर्यावरणाबाबत सजग करण्याचे कार्य केले. संस्थेच्या या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे.
संस्थेतर्फे पहिल्या वर्षी २००५ साली ३३५ मूर्ती, नंतर काही वर्षे ३००० मूर्ती तर आता दरवर्षी ६००० ते ७००० मूर्ती तयार केल्या जातात. मागील वर्षी (२०१७ मध्ये) ६५०० भाविकांनी संस्थेची पर्यावरणपूरक मूर्ती पूजनास वापरली. भारतातील अनेक प्रांतात ह्या मूर्ती वापरतातच. परंतु अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच साऊथ आफ्रिका, श्रीलंका व आखाती देशांमधील भाविकांनीही या मूर्ती त्यांच्या-त्यांच्या परदेशातील घरी नेल्या व पूजन केले.
आज अनेक स्तरांवरून इको-फ्रेंडली गणेश मूर्तीसाठी संस्थेला पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘Go Green Campaign’ अंतर्गत तसेच ‘पर्यावरणपूरक गणपती’ बद्दल २०१० ते २०१२ अशी सलग तीन वर्षे संस्थेला प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात आले.
२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच ‘मुंबई मिरर असोसिएशन, टाईम्स रेड सेल’ यांच्यामार्फत ‘टाईम्स स्पेशल हरित गणपती अॅवॉर्ड २००९’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
३) २००८ साली पवई येथे ‘निती’ (NITIE) मार्फत भरविलेल्या प्रदर्शनात मुंबईच्या महापौर श्रीमती डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या संस्थेला गौरविले.
अशा प्रकारे निष्काम, नि:स्वार्थी प्रेरणेतून चाललेल्या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील पुरुष व स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. गणेशोत्सव पर्यावरण पूरकच असला पाहिजे असे आपल्या कृतीतून प्रत्यक्षरित्या दाखवून देणार्या श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या कार्यात भाविकांनी पुढाकार घेतल्यास होणारा पर्यावरणाचा र्हास नक्कीच टाळता येईल.