AniruddhaFoundationBanner-The-Warmth-of-Love-Project

हेतू आवश्यकता :

आम्हाला प्रत्येकाला वाटतं की देवाची कृपा आम्हाला मिळावी. देवाच्या मायेची, वात्सल्याची ऊब आम्हाला अनुभवता यावी. जनाबाईची गोधडी घेऊन विठ्ठल गेला आणि स्वत:चा शेला विसरला. यावरूनच लक्षात येतं की, गोधडीचं महात्म्य खूप मोठं असलं पाहिजे. पण अनेक कष्टकर्‍यांच्या नशिबी ही गोधडीसुद्धा नसते. म्हणूनच सद्‌गुरु अनिरुध्दबापूंनी मायेची ऊब हा प्रकल्प सुरु केला. यामध्ये गोधडया तयार केल्या जातात. गरजू कष्टकर्‍यांना फक्त थंडी, गारठ्यापासून संरक्षण एवढचं ह्या गोधडीचं कार्य नाही. तर प्रेमाची, मायेची ऊब देणारी ही गोधडी, मूलभूत गरजांपैकी वस्त्र आणि निवार्‍याची सोयही करते.

गोधडी शिवण्याची कृती :

 

पुरुष व स्त्रिया दोघांनाही याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये जुन्या साड्या व चादरींपासून गोधडी बनविण्याची पद्धती शिकविली जाते. गोधडी शिवतानाचे टाके मुद्दाम्हून अतिशय छोटे, नाजूक असे असतात. त्यामुळे लहान बाळांच्या कानातील रिंग्ज्‌ किंवा पायातील वाळे त्यात अडकू शकत नाहीत. ह्या गोधड्या हेतुपूर्वक वजनाने हलक्या बनविल्या जातात, म्हणजे मग गरोदर स्त्रियांना सुद्धा त्या धुताना नीट पिळून वाळत घालता येतात. गोधड्यांच्या चारही बाजू अशाप्रकारे बंद करतात की त्यामुळे कीटक, गांडूळ, सापाचं पिल्लू अगदी आदिवासी जंगली भागातसुद्धा गोधडीच्या आतील (पदराच्या) भागात शिरू शकत नाही.

गोधडीचे विलक्षण वैशिष्ट्य :

बाजारात विकत मिळणार्‍या आणि ह्या श्रद्धावानांनी स्वहस्ते तयार केलेल्या गोधड्यांमध्ये नक्कीच फरक आहे. कारण श्रद्धावान गोधडी तयार करताना भक्तीभावाने परमेश्वराचे नामस्मरण करत गोधड्या बनवितात. त्यामुळे त्यातील माया वेगळीच असते. त्याचे शब्दांत वर्णन होऊच शकत नाही. जो कुणी गोधड्या वापरतो त्या गरजूला ती कुणी तयार केली आहे, कुणी दान म्ह्णून दिली आहे हे कळतही नाही. पण ती अंगावर पांघरल्यानंतर मिळणारी प्रेमाची ऊब त्या कष्टकर्‍याला शांत करते. ज्या गरजूंना गोधडी मिळते त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचं तृप्तीचं हास्य असतं, तर ज्यांनी मायेने ही गोधडी तयार केलेली असते त्यांच्या चेहर्‍यावर समाधानचं हास्य असतं!

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धावान गोधडी तयार करताना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये अनसुयामातेला, महिषासुरमर्दिनीला (मोठी आई) अर्पण केलेल्या ब्लाऊजपीस व दत्तगुरुंना अर्पण केलेल्या उपरण्याचाही विनामुल्य वापर करू शकतात. महिषासुरमर्दिनी (मोठी आई), अनसूयामाता ह्यांच्या प्रेमाचाही ऊबदार स्पर्श त्या गरजू व्यक्तीला गोधडीमुळे मिळतो, असे म्हणता येईल.

गोधड्या वाटप :

प्रत्येकवर्षी कोल्हापूर व विरार (मुंबई) येथे भरविल्या जाणार्‍या मेडिकल कॅम्पमध्ये गरजू कुटूंबांना गोधड्यांचे वाटप होते. २६ जुलै २०११ च्या मुंबईतील पुराच्यावेळेस अनेक गोधड्या गरजू कुटुंबांना पुरविल्या होत्या. अशी ही प्रेमाची मायेची ऊब परमपूज्य बापूंच्या कृपेने सदैव गरजूंना मिळत राहो हीच सदगुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणी प्रार्थना!

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com