AniruddhaFoundation-Sundarkand

श्रीरामकथा आणि सुंदरकांड

श्रीरामकथेचाच एक भाग असलेले सुंदरकांड म्हणजे रामायणातील अतिशय शुभ, सुंदर, तेजोमय आणि दैदिप्यमान असे उत्तुंग शिखर. श्रीरामकथा सर्व विघ्नांचा, सर्व पापांचा, दु:खांचा आणि विकल्पांचा अंत करणारी तर आहेच, पण बरोबरीने विशुद्ध भक्तीचा उदय करणारीही आहे. श्रीरामकथा श्रद्धावानांच्या जीवनातून सर्व वाईट गोष्टींचे उच्चाटन करणारी असल्यामुळे संत तुलसीदास तिला ‘मंगलभवन अमंगलहारी’ असे संबोधितात.

सुंदरकांडातील यशोगाथा –

सुंदरकांड म्हणजे हनुमंताचा यशस्वी प्रवास – आकाशमार्गे उड्डाण करून समुद्र उल्लंघन करित हनुमंताने लंकेत केलेला प्रवेश, त्यानंतर घेतलेला सीतामाईचा शोध, बिभीषण भेट, सीतामाई भेट, अशोकवनाचा नाश, लंकादहन, त्यानंतर श्रीराम – हनुमंताची हृदयस्पर्शी भेट, श्रीराम-बिभीषण भेट, प्रभू श्रीरामांनी रावणदूतांना केलेली क्षमा, रावणदूतांनी रावणासमोर केलेले श्रीरामांचे गुणसंकीर्तन व रावणाला सांगितलेला सत्यवृत्तांत, लक्ष्मणाने रावणदूतांद्वारे रावणाला पाठवलेले पत्र, समुद्राने श्रीरामांसमोर स्विकारलेली शरणागती, अशी ही सुंदरकांडातील यशोगाथा आहे.

सुंदरकांड पठणाची फलश्रुती –

सुंदरकांड म्हणजे भक्ती व भगवंत यांचे मधुर, एकजीव मिश्रण! जो कुणी सुंदरकांडाचे वाचन व श्रवण प्रेमाने व आत्यंतिक विश्वासाने करतो, त्याचे रक्षण व संकटहरण प्रभु श्रीराम व हनुमंत करतातच असा श्रद्धावानांचा ठाम विश्वास आहे. हनुमंत म्हणजे भक्ती, शारण्य व पराक्रमाचे अत्युच्च शिखर. सेवा, त्याग, सामर्थ्य, पावित्र्य व पुरुषार्थाचे प्रतिरुप म्हणजे हनुमंत! हनुमंत हा बुद्धिमानांमधील सर्वात वरिष्ठ (सर्वोत्तम) असा आहे. सुंदरकांड श्रद्धावानांना असा महान संदेश देते की, ’हनुमंत हा परमेश्वरस्वरूप असूनही स्वत:चे जीवन तो प्रभु श्रीरामभक्त व त्यांचाच दास ह्या अढळ विश्वासानेच जगतो.’

सुंदरकांडवरील अग्रलेख मालिका –

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांनी दैनिक प्रत्यक्षमध्ये नारदजयंती, ३ मे २००७ पासून सुंदरकांडवर आधारीत अग्रलेखांची मालिका सुरु केली. हे अग्रलेख म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाला आपले जीवन सुंदर व पुरुषार्थी करून घेण्याचा सोनेरी राजमार्गच होय!

बापू सुंदरकांडाविषयी बोलताना असे सांगतात की, ‘‘सुंदरकांड हे रामायणातील सुंदर, दैदिप्यमान, तेजस्वी व शुभप्रद असे शिखर आहे आणि त्यावर दत्तकृपेने माझे अपरंपार प्रेम आहे. सुंदरकांडातील प्रत्येक ओवीवर (चौपाई/दोहा) मी लिहिलेले लेख म्हणजे सुंदरकांडाच्या पावित्र्याला माझ्या मनाने घातलेले लोटांगण आहे.’’ तसेच अनेक वेळा परमपूज्य बापूंनी आपल्या पितृवचनाद्वारे सुंदरकांडाबद्द्ल सांगितले आहे.

सुंदरकांडपठण उत्सव –

नोव्हेंबर २००४ मध्ये एक आठवडा हॅपी होम येथे सुंदरकांड उपासना झाली. ह्यात होमासहित दिवसातून ३ आवर्तने संपूर्ण सुंदरकांडची होत होती.

१० जानेवारी ते १८ जानेवारी २०१६ दरम्यान सुंदरकांड पठण श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे झाले.

१७ मे ते २१ मे २०१६ दरम्यान श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन तर्फे सुंदरकांडपठण, पूजन आणि अभिषेक उत्सव करण्यात आला. सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेर्यंत संपूर्ण वैदिक पद्धतीने हे पूजन व अखंड पठण करण्यात आले. हजारो श्रद्धावानांनी या उत्सवात सहभागी होऊन सुंदरकांड पठणाचा आनंद लुटला.

सुंदरकांड पुस्तिका कुठे मिळेल?

साध्या सोप्या भाषेत संपूर्ण अर्थासह उपलब्ध असलेली सुंदरकांड पुस्तिका आपल्याला ईबुक स्वरुपात आंजनेय ई शॉपवर मिळू शकेल. (https://www.e-aanjaneya.com/publications.faces?categoryCode=ALL&publicationGrpCode=ALL&authName=ALL&publishName=ALL&SearchCriteria=sundarkand)

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com