श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे काय?

’श्रीवर्धमान व्रताधिराज’ म्हणजे यच्चयावत – सर्व व्रतांचा मुकुटमणी.

श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही.

श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे सर्वसामान्यांपासून, संतांपर्यंत, अशिक्षितांपासून, उच्चशिक्षितांपर्यंत, महापाप्यापासून पुण्यवंतापर्यंत प्रत्येकाला समानपणे भगवत्‌ कृपेचा आधार व दु:खमय प्रारब्धाचा नाश प्राप्त करून देणारे सर्वोच्च व्रत होय.

श्रीवर्धमान व्रताधिराज उत्पती कथा –

दत्तगुरुंच्या चिंतनात व श्रीविठ्ठलाच्या भक्तीत सदैव रममाण होणारे सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे मानवी सद्गुरु श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्री पाध्ये यांनी एक दिवस,
“बुडती हे जन पाहवे ना डोळा।
म्हणून कळवळा येतो त्यांचा॥
हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अत्यंत श्रेष्ठ अभंग निरुपणासाठी घेतला. तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता. बरोबरच्या निवडक मंडळींसह गोपीनाथशास्त्री निंबगावास गेले होते. निरुपण व कीर्तन संपले, परंतु श्रीगोपीनाथशास्त्रींच्या मनात मात्र ह्या शब्दांनी करुणेचे भावतरंग प्रवाहित होऊ लागले. त्यांनी श्रीविठ्ठलाला गार्‍हाणे घालण्यास सुरुवात केली.” हे विठ्ठला, हे भगवंता ह्या दीनबंधू संतांचा कळवळा लक्षात घे आणि आम्हा कलियुगातल्या मानवांवर कृपा करून ह्यापुढे येणार्‍या काळात कलीच्या दु:खदायक प्रभावापासून स्वत:ची सुटका करून सोपा मार्ग दाखव. आम्ही सामान्य मानव भक्ती करण्याचे वेडेवाकडे प्रयास करतो. परंतु ह्या प्रपंचाच्या भाराखाली दबलेला सामान्य मनुष्य भक्तीसुद्धा नीट करू शकत नाही.”

श्रीगोपीनाथशास्त्रींनी ती संपूर्ण रात्र ह्या गार्‍हाण्यातच घालविली. स्वत:जवळील विठ्ठलमूर्तीला उराशी कवटाळून पांजरा नदीच्या तीरी आपल्या नेहमीच्या आवडत्या स्थानी ते तसेच ९ दिवस काही न खाता न पिता धरणे धरून बसले. तेथूनच “श्रीवर्धमान व्रताधिराज” हा सर्व मानववंशाच्या परमसुखाचा व कल्याणाचा मार्ग त्यांना मिळाला व श्रीवर्धमान व्रताधिराज सर्व मानवंशासाठी सुलभ होण्यासाठी श्रीगोपीनाथशास्त्रींनी सहस्त्र पौर्णिमापर्यंत अखंडपणे वर्धमान जप त्यांच्या वंशात चालू ठेवला. हा वर्धमानजप करताना पाळला गेलेला नियम म्हणजे पौर्णिमेस व्रतपुष्प एकदा म्हणायचे व दररोज एकने वाढवत न्यायचे व पुढील पौर्णिमेस परत एकने सुरुवात करायची.

 

श्रीवर्धमान व्रताधिराजाचे आपल्या आयुष्यात कमीतकमी २४ वेळा किंवा अठराव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतच्या वर्षाच्या संख्येच्या निम्या संख्येइतकेवेळा पालन करणारी व्यक्ती जन्मभर अधिकाधिक पुण्यवान सुखी बनतेच. परंतु त्यास शांती व तृप्ती सदैव प्राप्त होतात.

संपूर्ण आयुष्यात कमीतकमी ९ वेळा किंवा आयुष्य वर्ष संख्येच्या एक चतुर्थांश संख्येइतके व्रतपालन करणार्‍या व्यक्तीच्या पंचमहापापांचे निरसन होते. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात कमीतकमी एकदा तरी मन:पूर्वक व्रताधिराजाचे पालन केले आहे, त्याच्या मार्गातील दु:खद घटनांचे दु:खदत्व कमी होते. एकापेक्षा जेवढ्या म्हणून अधिकवेळा ह्या सांवत्सरिक व्रताधिराजाचे पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात मनुष्य ह्या भूलोकात अधिकाधिक सुखप्राप्ती व दु:खनिवृत्ती मिळवतो.

श्रीवर्धमानव्रताधिराज पुस्तिका –

या पुस्तिकेमध्ये व्रत कसे करावे यासंबंधी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या व्रताची एकूण ९ अंगे आहेत. ती पुढीलप्रमाणे:
१. व्रतकाल व पठण
२. वर्ज्यप्रकरण
३. तिलस्नानम्‌
४. त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम्‌
५. त्रिदोष धूपशिखा
६. त्रिपुरारी त्रिविक्रम भोग
७. इच्छा दान
८. पुरुषार्थ दर्शन
९. उद्यापनम्‌
यातील प्रत्येक अंग कसे पाळायचे, याविषयीची माहिती ’वर्धमान व्रताधीराज’ या पुस्तिकेत मिळते.

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com