श्रीसाईसच्चरित

’श्री साईच्चरित’ एक अपौरुषेय ग्रंथ आहे. पण आम्ही ह्या ग्रंथाकडे पाहतो ते एक पोथी म्हणूनच. मग वर्षाकाठी किंवा मला एखादे संकट आले की आम्ही हा ग्रंथ वाचून संपवतो. आजदेखील आपल्याकडे वीस वर्ष, पंचवीस वर्ष या ग्रंथाचे पारायण करणारी भक्त मंडळी आहेत. पण ती मंडळीसुद्धा ह्या ग्रंथाकडे एक ’पोथी’ या दृष्टीनेच पाहतात. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की, “ग्रंथ वाचून आम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. त्यातूनच आमची प्रगती होत असते.”

सदगुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणतात

’श्री साईच्चरित’ वाचताना एखाद्या व्यक्तीला जरी यातील ओव्यांचा अर्थ समजला नाही, तरीही या ग्रंथामुळे त्याचं आयुष्य बदलणारच आहे. तो अधिकाधिक भक्तिमार्गाकडे खेचला जाईल. कारण ’श्री साईसच्चरित’ हा ग्रंथच मुळी भक्तीमार्गाचा आहे. या ग्रंथाचे नाव जरी ’श्री साईच्चरित’ असले तरी वाचल्यानंतर आपल्याला कळतं की, हे साईनाथांच्या भक्तांचेच आचरित आहे. त्या भक्तांनी साईनाथांची भक्ती कशी केली? त्यांनी काय सेवा केली? श्री साईनाथांचा पदन्यास त्यांच्या जीवनात आल्यावर त्यांचे जीवन कसे बदलले? याचा अभ्यास म्हणजेच सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांनी ’श्री साईच्चरित’ या ग्रंथावर आधारित सुरू केलेली ’पंचशील परीक्षा’.

श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा

ही पंचशील परिक्षा प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी व पंचमी अशा पाच भागात घेतली जाते. दर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये या परीक्षा घेतल्या जातात. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी पंचशील परीक्षांच्या सुरुवातीसच स्पष्ट केले की ’श्री साईच्चरित’ वरिल परीक्षा व हा अभ्यासक्रम ज्ञान मिळवण्यासाठी नसून भक्ती कशी करावी याकरिता आहे. ह्या भक्तीमार्गात अधिकाधिक प्रगती करून चुकीच्या गोष्टी व चुकीची श्रद्धा दूर करून आपले जीवन सर्वार्थाने परिपूर्ण करण्यासाठी ही पंचशील परीक्षा आहे. म्हणूनच पंचशील परीक्षा ही माझी स्वतःची परीक्षा आहे. परीक्षा म्हटल्यावर आपण पारायणाप्रमाणे अध्याय भरभर वाचत नाही तर ते अध्याय वाचताना आपण सावकाश व शांतपणे वाचतो. त्या ओव्या समजुन घेण्याचा प्रयत्न करतो.

या ग्रंथातील कथा म्हणजे साईनाथांनी घडवलेले चमत्कार म्हणून न पाहता साईनाथांनी आपल्या भक्तांसाठी केलेल्या त्या लीला आहेत असे पाहिले पाहिजे. त्या लीला वाचताना त्या कशा घडल्या यापेक्षा त्या कोणासाठी घडल्या? व का घडल्या? हे मी समजुन घेतले पाहिजे. यासाठी ही पंचशील परीक्षा आहे.

श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा रुपरेषा

प्रथमा मध्ये श्री साईसत्‌चरितातील १ ते १० अध्यायांचा अभ्यास करावयाचा असतो. त्याचप्रमाणे द्वितीयेत २० ते ३०, तृतीयेत ३० ते ४० व चतुर्थीमध्ये ३० ते ४० या अध्यायावर प्रश्न विचारले जातात. पंचमी परिक्षेत मात्र संपूर्ण ’श्री साईच्चरित’चा अभ्यास असतो. या कालावधीमधे प्रात्यक्षिक वर्ग (Practicals) घेतले जातात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र अशा विज्ञानातील विषयांच्या सहाय्यानेच ’श्री साईच्चरित’ मधिल आशय समजुन घेणे व विज्ञान हे एक शास्त्रच आहे व ते अध्यात्मापेक्षा वेगळे नाही, विज्ञानही तेच सांगते जे अध्यात्म सांगते व हे समजुन घेणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे.

प्रत्येक शास्त्रात दोन विभाग असतात.

१) सैद्धांतिक २) प्रात्यक्षिक

सैद्धांतिक म्हणजे (Theoretical) उच्चार तर प्रात्यक्षिक म्हणजे (Practical) कृती.

सिद्धांत म्हणजे माझ्या बुद्धीचा विचार. ’श्री साईच्चरित’ वाचणे हा माझा उच्चार आहे. माझा उच्चार हा अभ्यासाचा पाया आहे. त्यातील श्रेष्ठ भक्तांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न ही माझी कृती आहे व त्यातून येणार्‍या अनुभवातूनच (Practical) माझी आकृती बनणार आहे. सद्गुरु श्री बापूंना प्रत्येक श्रद्धावानाची सुंदर आकृती घडवायची आहे. याकरिता पंचमीच्या विद्यार्थ्यांसाठी Practical चे पुस्तकही प्रकाशीत केले गेले आहे. ह्या परिक्षेचा पेपर आता दर फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यात दैनिक प्रत्यक्ष मधून जाहीर होतो व तो लिहिण्यासाठी तीन आठवड्याचा अवधी दिला जातो. आपण घरी बसून आपल्या सवयीनुसार पेपर लिहू शकतो. अनेकजण आज वारंवार प्रथमा ते पंचमी अशा परिक्षा देत आहेत आणि त्यातून जीवन समृद्ध करुन घेत आहेत.

अधिक माहितीसाठी पंचशील परिक्षेच्या ब्लॉगला भेट द्या – http://www.saicharitra.com/

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com