AniruddhaFoundation-Shree Jagannath Utsav

चारधाम यात्रेतील एक धाम म्हणजे जगन्नाथपुरी. जे भक्त दर्शनला येतात त्यांच्यावर श्रीजगन्नाथ प्रेमाचा वर्षाव करतात आणि उत्साह, आनंद व शांती प्रदान करतात असं मानल जातं.

 जगन्नाथपुरी –

ओरिसात जगन्नाथ पुरीमध्ये जशा देवतांच्या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या, तसेच विशिष्ट प्रकारचे लाकूड म्हणजे दारुब्रह्माचे (ब्रम्हवृक्ष) लाकूड वापरून त्यापासून श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र व त्यांची बहिण सुभद्रा ह्या तिघांच्या मूर्ती घडविण्यात आल्या. मूर्तींसाठी २७ प्रकारचे पारंपारिक पोषाख महोत्सवात सजावटींसाठी खास तयार करण्यात आले होते.

श्रीजगन्नाथाचे परमभक्त श्रीगौरांगचैतन्य महाप्रभू यांनी ‘ॐ रामाय जगन्नाथाय नम:।’ हा सिद्ध मंत्र दिला. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ह्या मंत्राचे १२ कोटी वेळा पठण करून घेतले. हे मंत्रपठण दररोज सकाळी ९ ते रात्रौ ९ पर्यंत चालू असायचे. ठरविलेल्या कालावधीच्या आधीच मंत्रपठणाची संख्या ओलांडली होती कारण या पठणासाठी अभूतपूर्व संख्येत श्रद्धावान सहभागी झाले होते.

ह्या महोत्सवात श्रीजगन्नाथाचे क्षेत्र शंखाच्या आकारात बनविले होते व तेथील सर्व विधी व विशिष्ट पूजापद्धती जगन्नाथाच्या मंदिराच्या प्रथेप्रमाणेच पावित्र्याचे जतन करून पार पाडण्यात आल्या. प्रत्येक तासाला ‘पाद अंगुली नहीं है हाथ, दारुब्रम्ह जगन्नाथ’ ही आरती होत होती. मूर्तीचे पारंपारीक पोषाख दिवसातून ३ वेळा बदलले जात होते. रोज रात्रौ ९ वाजता सत्संग सुरु व्हायचा. लाखो भक्तांनी ह्या सत्संगाचा आनंद लुटला.

मोक्षपुरी –

श्रीवृषभनाथ हा महाविष्णूचा पहिला मानवी अवतार मानला जातो. वृषभनाथांची ३.५ फूट उंचीची संगमरवरी मूर्ती मोक्षपुरीमध्ये बसविली होती.सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी नवाकार मंत्राचे १ कोटी वेळा पठण करून घेतले. हा ‘नवाकार मंत्र’ ‘गायत्री मंत्राइतकाच पवित्र मानला जातो.

जो कोणी ह्या मोक्षपुरीमध्ये प्रवेश करेल त्याचे षडरिपूंचे हरण श्रीवृषभनाथजी नक्की करणारच! अशाप्रकारे श्रीवृषभनाथजींचे भक्तांच्या आयुष्यातील अस्तित्व म्हणजे भक्ताला मोक्षप्राप्तीचा चिरंतन आनंदाचा ठेवाच मिळणं होय!

श्रीपतितपावन धाम –

ह्या धामामध्ये एका भव्य जलकुंडात सात पवित्र नद्यांमधील पाणी साठविले होते. आतील बाजूला वड, पिंपळ व औंदुंबर ह्या तीन वृक्षांचे रोपण केले होते. गंगोत्री व जम्नोत्रीच्या पवित्र मृत्तिका व पाण्याचा वापर करून श्रीदत्त दिगंबराची बनवलेली मूर्ती ह्या जलकुंडामध्ये प्रतिष्ठित होती.

या जलकुंडाभोवती सर्व श्रद्धावान प्रदक्षिणा करत होते. ह्या धामाचे स्थान व तेथील वातावरण अत्यंत सुंदर व पवित्र होते. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या सुचनेनुसार ह्या धामाची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. जेणेकरून तेथील प्रदक्षिणेमुळे तसेच मनापासून गजर म्हणण्यामुळे जास्तीत जास्त पापातून मुक्ति मिळावी!

श्रीहयग्रीव धाम –

हयग्रीव म्हणजे घोड्याचे मुख असलेला महाविष्णूचा अवतार. शक्तीचे प्रतीक असलेल्या हयग्रीवाबरोबर नेहमीच बला व महाबला ह्या देवता असतात. जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा प्राप्तीसाठी हया धामामध्ये फक्त पुरुषभक्तांचाच प्रवेश होता. चाव्यमुनी, पराशर ऋषी, अगस्ती ऋषी व अर्जुन हे ह्यग्रीव ह्या महाविष्णुच्या अवताराचे कडवे भक्त होते.

श्रीसावित्रीधाम –

सावित्री ही सत्यवान राजाची पत्नी. आदिमाता सवित्री ही स्त्रियांच्या शक्तीचे प्रतीक. सुलक्षणा सावित्री हे तिचे रुपही भक्ती व निष्ठेचे प्रतिक. ‘आदिमाता सावित्री’ व ‘सुलक्षणा सावित्री’ ह्या दोन्हीही मूर्ती सावित्रीधामामध्ये प्रतिष्ठित होत्या.

ज्या ‘आदिमाता सावित्रीने’ मृत्युच्या जबड्यातून पतिचे प्राण पुन्हा खेचून आणले तिचे रोज पूजन ह्या धामामध्ये होत होते. इथे फक्त स्त्रियांनाच प्रवेश होता. अगदी कुमारिका, अविवाहित, पती नसलेल्या, वृद्ध अशा सर्व स्त्रियांना ह्या धामात प्रवेश होता.

श्रीसंतपुरी –

“श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव राधे… राधे…राधे”
ह्या गजरात पूर्णपणे रंगून जाण्याची संधी फक्त संतपुरीमध्येच मिळत होती. श्री गौरांगचैतन्य महाप्रभूंचे अस्तित्व ह्या संतपुरीत आलेल्या प्रत्येकाला जाणवत होते. येथे सतत श्रीकृष्णाचा जप चालू असल्यामुळे ही संतपुरी जणू सर्व संतांचे निवासस्थान बनली होती.

पितृधाम –

प्रत्येकाचीच आपल्या पूर्वजांसाठी काही क्रियाकर्मे करण्याची, कर्तव्यपालनाची इच्छा असते. श्रीशंकराचे ‘परमहंस बाणलिंग’ रुप जे मृत्यूनंतर आत्म्याला शांति देते, त्याला बिल्वपत्र अर्पण करण्याची संधी प्रत्येक भक्ताला ह्या धामामध्ये मिळत होती. तेथे दर्शनाला जाणार्‍या प्रत्येक भक्ताच्या पूर्वजांना शांती व समाधान मिळण्यासाठी या मंत्राचे पठण सतत येथे चालू होते.

यज्ञपुरी –

अग्नी, दीप, आरती, धुनी आणि पवित्र ज्योती हे यज्ञपुरुषाचे पाच मूलभूत घटक! यज्ञ आचारसंहितेनुसार यज्ञपुरीमध्ये ५ प्रकारचे यज्ञ होत होते. श्रीदत्तगुरु, श्रीजगन्नाथ, श्रीराम, श्रीपरब्रम्ह आणि श्रीचतुर्व्युह यांच्या मंत्रांचे पठण तेथे सतत चालू होते. अन्नधान्याची नासाडी होणारे कोणतेही अर्पण द्रव्य यज्ञ करताना वापरले नाही.

अनिरुद्ध धाम –

९ वे धाम हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या श्रद्धावानांनी त्यांच्या सद्गुरु प्रति असलेल्या प्रेमापोटी उभारले होते. इथे सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या पवित्र मार्गदर्शनानुसार श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन मार्फत ज्या भक्तीसेवा दिल्या जातात त्याबद्दल आणि बापूंच्या शिकवणुकीबाबतची सर्व माहिती आलेल्या श्रद्धावानांना दिली जात होती.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे दर्शन विनामूल्य होते. देणगीसाठी दानपेट्या नव्हत्या. पूजन व अभिषेक मूल्यांच्या पावत्या देण्यात येत होत्या. फुले, मिठाई वगैरे काहीही स्विकारले जात नव्हते. फक्त श्रीजगन्नाथाला नारळ व तुलसीपत्र अर्पण करण्यास परवानगी होती.

रोज श्रीजगन्नाथाला महाभोग चढविण्यात येत होता व तो प्रसाद वृद्धाश्रम व अनाथाश्रम येथे वाटण्यात येत होता. या महोत्सवात धार्मिक एकता दिसून आली. अनेक श्रध्दावानांनी श्रीजगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव अत्यंत यशस्वी होण्यासाठी योगदान केले.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com