AniruddhaFoundation-Shree Ashwattha Maruti Poojan

१९९६ साली सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी “रामनवमी” उत्सव सुरु केला आणि पाठोपाठ १९९७ पासून अश्वत्थ मारुती पूजन उत्सव दरवर्षी श्रीक्षेत्र सद्‌गुरु निवास – गुरुकुल जुईनगर याठिकाणी साजरा करण्यास सुरुवात केली.

परमपूज्य बापू सांगतात की, “प्रत्येक माणसाचे भक्तीमार्गावरील प्रत्येक पाऊल हे हनुमंताच्याच मार्गदर्शनाने पुढे टाकले जाते. श्रीहनुमंतच बोट धरून श्रद्धावानाला भक्तीमार्गाने पुढे नेतो. म्हणूनच हनुमंताची भक्ती, त्याचं पूजन आवश्यक ठरतं.”

संत तुलसीदासजी सुध्दा हनुमानचलिसा मध्ये लिहितात की,

“नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा।”

म्हणजे जो हनुमंताचे सदैव नामस्मरण करतो तो त्याच्या विविध पीडा, दु:ख व संकटांमधून मुक्त होतो. असा हा हनुमंत आम्हा श्रद्धावानांसाठी रक्षक देवताही आहे आणि प्रभुरामचंद्रांचा भक्त ही आहे. म्हणूनच ह्या महाप्राण हनुमंताला आपण जीवनात आणण्याची नितांत आवश्यकता असते आणि यासाठीची सुवर्णसंधी म्हणजे “अश्वत्थ मारुती पूजन”.

श्रीअश्वत्थमारुती पूजनविधी व दर्शन सोहळा

* श्रावण महिन्याच्या प्रत्येक शनिवारी श्रीअश्वत्थ मारुतीचे षोडशोपचारे पूजन व स्तोत्र, जप यांची आवर्तने होतात.
* परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी स्वहस्ते पाषाणात कोरलेल्या हनुमंताच्या शिल्पाकृतीच्या पाठीमागच्या बाजूला अश्वत्थ वृक्षाची (पिंपळाची) एक फांदी अश्वत्थवृक्षाचे प्रतीक म्हणून ठेवलेली असते.
* ह्या शिल्पाकृतीच्या समोर तांब्याच्या परातीमध्ये हनुमंताची धातूची रेखीव मूर्ती ठेवलेली असते.
* श्रीहनुमंताची माता म्हणजे अंजनामाता. तिचे प्रतीक म्हणून हनुमंताच्या मूर्तीसमोर धुनी माता उभारलेली असते. तिचीही पूजा केली जाते.
* प्रपाठकांचा एक गट श्रीहनुमानचलिसाचे अखंड पठण करत असतो.

पूजन  

सर्वप्रथम अश्वत्थाच्या फांदीचे पूजन होते. शाखा खाली व मूळे वरच्या दिशेने असलेला अश्वत्थ वृक्षच परमात्मा व संपूर्ण विश्वाचे नाते दर्शवितो. ह्या अश्वत्थ पूजनाच्या वेळेस मंत्रांचे उच्चारण होऊन वृक्षाची विधिवत पूजा होते व नैवैद्य अर्पण केला जातो. पाठोपाठ श्रीहनुमंताचे षोडपशोचारे पूजन करतात. यावेळी श्रीपंचमुखहनुमत्कवच नंतर संकटमोचन श्रीहनुमानस्तोत्र व त्यानंतर “ॐ श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:।” हा जप म्हटला जातो.

नंतर शेंदूर अर्चन होते व लाह्या वाहिल्या जातात. परमपूज्य बापूंकडील पंचमुखी हनुमंताच्या मूर्तीवर व परातीमधील छोट्या हनुमंताच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक केला जातो. प्रत्येक श्रद्धावानाला कोरीव मूर्तीला शेंदुर लावायला मिळतो. ‘भीमरुपी महारुद्रा….’ ह्या स्तोत्राने व पूर्णाहुतीने पूजेची सांगता होते.

नंतर धुनी मातेची पूजा करतात. ह्या पूजनात प्रज्वलित धुनीमध्ये लाह्या, कापूर, समिधा, उदबत्या वाहिल्या जातात. धुनीमातेला हळद-कुंकु वाहून तिची पूर्ण ओटी भरली जाते. पूजनानंतर धुनीमातेची शांतता होते.

अभिषेकाची सांगता करताना हनुमंताला लाह्या अर्पण करून नमस्कार करतात. रामरक्षा, हनुमान चलिसा आणि अनिरुद्ध चलिसाच्या पठणाने उत्सवाची सांगता होते.

अश्वत्थमारुतीच्या पूजनाचे निश्चितच अनेक लाभ मिळतात अशीच श्रद्धावानांची भावना आहे –

१) भक्तांच्या जीवनातील चुका सुधारण्यासाठी शक्ती व युक्ती यांचा स्त्रोत श्रीहनुमंताकडून प्रवाहित होतो.
२) पापविमोचन व संकटविमोचनाचा मार्ग प्राप्त होतो.
३) मानसिक व शारीरीक सामर्थ्य प्राप्त होऊन पुढील जीवन अधिक आनंददायी होते.
४) शनिच्या साडेसातीचा ताप नाहीसा होतो कारण हनुमंतापुढे शनिचे शारण्य आहे.
५) कोणत्याही ग्रहांचा अनिष्ट परिणाम हनुमतशक्ती थोपविते.
६) क्रोध व भय यांचे प्राबल्य कमी होते.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com