AniruddhaFoundation-Sacchidanand Utsav

सच्चिदानंद उत्सव म्हणजे काय?

sacchidanandutsav

“मासानाम्‌ मार्गशीर्षोह‍म्‌” म्हणजेच मार्गशीर्ष महिना म्हणजे संपूर्ण महाविष्णू. सर्व महिन्यांमध्ये ‘मार्गशीर्ष महिना’ हा अतिशय शुभ, पवित्र व श्रेष्ठ महिना मानला जातो. अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात आपल्या घरी दीड दिवस किंवा पाच दिवस “सच्चिदानंद उत्सव’ साजरा करण्याची संधी सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी सर्व श्रद्धावानांना दिली आहे. या उत्सवात रामनाम वह्यांच्या अतिपवित्र कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या सदगुरुंच्या पादुकांचे पूजन सर्व श्रद्धावान अत्यंत आनंदाने व उत्साहात करतात.

पादुका पूजनाचे महत्त्व –

भरतास श्रीरामांच्या चरणांपासून दूर करणे शक्य नाही, हे परमद्याळू लक्ष्मण व वात्सल्यमूर्ती जानकी जाणून असतात. म्हणूनच भरतास श्रीरामांच्या पादुका बरोबर घेऊन जाण्यास सांगतात. हेच ते विश्वातील परमात्म्याच्या पादुकांचे पहिले पादुकापूजन. पादुकापूजन म्हणजे श्रद्धावानांना आपल्या सदगुरुप्रती असलेल्या कृतज्ञतेचा अंबज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा दुर्मिळ योग !

सच्चिदानंद उत्सव कसा करायचा?

मार्गशीर्ष महिन्यातील दुसर्‍या शनिवारी ह्या उत्सवास सुरुवात होते. सच्चिदानंद उत्सवात पहिल्या दिवशी पादुकांची प्रतिष्ठापना पूजा झाल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी व पादुका घरी असेपर्यंत (२ किंवा ५ दिवस) नित्य पूजा करण्यात येते. तसेच ज्या दिवशी पादुकांचे विसर्जन करावयाचे आहे, त्यादिवशी ‘पुनर्मिलाप आवाहन’ अर्थात श्रीअनिरुद्धांचे अस्तित्व पुढील वर्षभर घरात रहावे म्हणून विसर्जनास निघण्यापूर्वी पूजन केले जाते. याबद्दलची सर्व माहिती “सच्चिदानंदोत्सव’ या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

सच्चिदानंद उत्सवाचा फायदा –

जेव्हा मी पादुका घरी आणून त्याचे पूजन करतो, तेव्हा माझ्या मनात सदगुरुप्रती प्रेमभाव, कृतज्ञताभाव सक्रिय होतो.

आम्ही जे पादुका पूजन करतो, त्याने आमचा मार्ग, सदगुरु प्राप्तीचा मार्ग, सदगुरु प्रेमप्रवास मार्ग सुकर होतो.

जेव्हा आम्ही प्रेमाने पादुका पूजन करतो तेव्हा माझ्या देहातील मन, प्राण, प्रज्ञा ह्या तिन्ही स्तरावरील अनुचितता दूर होऊन आमचा समग्र विकास घडवून आणण्यास मदत होते. अर्थात जीवनात सच्चिदानंद उत्सव नित्यत्वाने साजरा होतो अशी श्रध्दावानांची भावना आहे.

सच्चिदानंद उत्सवातील अथर्व स्तोत्र आमच्यातील चंचलतेचा नाश करून आम्हाला गुरुतेज प्रदान करते व प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळी सुखाचा होतो, असे श्रध्दावान मानतात.

हा उत्सव आमच्या आयुष्यात कायापालट घडवतो व आम्हाला देवयानपंथी दृढ करतो.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com