मुद्रा प्रशिक्षण

सारे विश्व पंचमहाभूतांनी बनलेले आहे. विश्वाच्या या पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व आपल्या हाताची पाच बोटे करतात. अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व अंगठा, वायुतत्त्वाचे प्रतिनिधित्व तर्जनी, आकाशतत्त्वाचे मध्यमा, पृथ्वीतत्त्वाचे अनामिका आणि जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करंगळी करते. जशी विश्वात ही पंचतत्वे आहेत, तशी मानवाच्या शरीरात ही पंचतत्त्वे आहे आणि त्यांचे सुयोग्य नियमन योगमुद्रांच्या आधारे राखता येते.

रोजच्या व्यवहारांमध्ये आपण मुद्रांचा वापर करत असतो. आपण ‘किती सुंदर! किती छान!’ म्हणताना सहजपणे मुद्रा करतो. मनातील भावना विशिष्ट आकृतिबंधातून हाताद्वारे व्यक्त करतो. आपण भारतीय जेवताना हाताची पाचही बोटं जुळवतो. हीसुद्धा एक मुद्राच आहे. हाताने जेवल्यामुळे भारतीय लोकांची बोटं सहज वळतात, यामुळे पंचमहाभूतांचा प्रवाह एकत्र येतो. नैवेद्य अर्पण करताना, संध्या करताना, प्राणायाम करताना, तीर्थ घेताना, आचमन घेताना बोटांच्या ज्या विशिष्ट हालचाली होतात, त्यापण मुद्राच आहेत. आपण हाताने नमस्कार करतो, तीही एक श्रेष्ठ मुद्रा आहे. आपल्या शरीरात हजारो नाड्या असतात, त्या बोटांच्या अग्रापर्यंत येतात. त्यांचा संबंध सप्तचक्रांशी असतो. हस्तमुद्रा केल्याने ती ऊर्जा आपण शरीरात खेळवू शकतो. ह्या हस्तमुद्रा विशिष्ट क्रमाने करायच्या असतात. याद्वारे मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंतचा ऊर्जाप्रवाह सन्तुलितपणे प्रवाहित होण्याच्या प्रक्रियेत मदत होते.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी मुद्रेसंबंधित दिलेल्या माहितीचा सारांश असा आहे – ‘शरीरात आजारांची उत्पत्ती पंचमहभूतांमध्ये असमतोल आल्याने होत असते. आपल्या हाताची बोटे या पंचमहाभूतांची प्रतिनिधित्व करीत असल्याने या पाच बोटांच्या सहाय्याने निरनिराळ्या मुद्रा तयार होतात त्यामुळे शरीरात समतोल तयार होत असतो. त्यामुळे या मुद्रा आपल्या शरीर व मनाच्या निरोगीकरण प्रक्रियेत सहाय्यक भूमिका निभावतात.’

श्रीश्वासम् या उत्सवाच्या आधी बापूंनी सात मुद्रांची ओळख करून दिली.

सप्त मुद्रा – मुद्रा अनेकविध आहेत, परंतु बापूंनी सप्तचक्रांशी निगडित असणार्‍या सात मुद्राच या मुद्रा प्रशिक्षणासाठी दिल्या.

त्या पुढील प्रमाणे –

१. मूलाधार चक्राशी निगडित स्वस्तिमुद्रा

२. स्वाधिष्ठान चक्राशी निगडित रसमुद्रा

३. मणिपुर चक्राशी निगडित त्रिविक्रम मुद्रा

४. अनाहत चक्राशी निगडित शिवलिंग मुद्रा

५. विशुद्ध चक्राशी निगडित आंजनेय मुद्रा

६. आज्ञा चक्र निगडित अंबामुद्रा

७. सहस्रार चक्राशी निगडित अवधूत मुद्रा आहे.

मुद्रा प्रशिक्षण – बापूंच्या आज्ञेनुसार महाधर्मवर्मन् डॉ. योगीन्द्रसिंह जोशी आणि महाधर्मवर्मन् डॉ. विशाखावीरा जोशी यांनी या प्रशिक्षणाची धुरा सांभाळली व दोन दिवसांची नि:शुल्क प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या प्रशिक्षणाच्या पुढील टप्प्यांचा विचार करून त्यासाठी आधी प्रशिक्षक तयार केले गेले आणि त्यानंतर सद्‍गुरु श्री अनिरुध्द उपासना फाऊंडेशनच्या विविध उपासना केंद्रांवर हे प्रशिक्षण नि:शुल्क देण्यात आले.  श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे) येथेही दोन गुरुवार मुद्रा प्रशिक्षण देण्यात आले, तेव्हा हजारो श्रद्धावानांनी याचा लाभ घेतला होता.

WP2FB Auto Publish Powered By : XYZScripts.com