AniruddhaFoundation-Dhanalaxmi Utsav And Shreeyantra Poojan

धनलक्ष्मी पूजनाची माहिती

आपल्या भारतीय परंपरेनुसार, अश्विन वद्य त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ असे म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची असते, ती ‘धनलक्ष्मीची’ म्हणजेच मानवी मनाच्या सर्व केंद्रांना ऊर्जा पुरविणाऱ्या मूळ शक्तिस्रोताची! म्हणूनच, ह्या दिवशी घरातील धनाचे पूजन केले जाते. नाणी, नोटा, सुवर्णादि अलंकार व दिपांचे पूजन होते. ह्यामागे मूळ प्रेरणा अशी असते की, ” हे लक्ष्मीमाते, तू दिलेल्या या संपत्तीचा मान आम्ही राखू व ह्याचा विनियोग, तुला आवडणाऱ्या कामांसाठी करू. ही संपत्ती अशीच वृद्धिंगत होत राहू दे, अर्थातच पवित्र मार्गाने!” दीप पूजनसुद्धा ह्याचसाठी केले जाते की, पवित्र लक्ष्मीमातेचे कृपाछत्र आपल्यावर रहावे.

सर्व श्रद्धावानांसाठी परमपूज्य सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘धनलक्ष्मीचे’ सामूहिक पूजन सुरू केले.

धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात श्रेष्ठ पूजन हे, दत्तात्रेयप्रणित “श्रीयंत्राचे” असते. त्यातही षोडश उपासनांनी व जपांनी सिद्ध केलेल्या “महाश्रीयंत्राचे” दर्शन सर्वात महत्वाचे व सर्वात श्रेष्ठ मानले जाते.

 “श्रीयंत्राची” माहिती 

“श्रीयंत्र” म्हणजे “श्री” चे यंत्र. “श्री” चे गृह. “श्री” म्हणजे “श्रीविद्या”, ललिता, महात्रिपुरसुंदरी, अर्थात माय चण्डिकेचे वसतीस्थान! ह्या विश्वाचे संपूर्ण शक्तिसामर्थ्य आणि ऐश्वर्य “श्री”च्या आधीन आहे. ह्या विश्वाचे सृष्टीचक्रच मुळी श्रीविद्येच्या नियमांनुसार चालते.  अशा “श्रीयंत्राची” उपासना व पूजन म्हणजेच ऐश्वर्य प्राप्तीचा फलदायी मार्ग.

सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी ३ डी “श्रीयंत्र” सिद्ध करून घेतले आहे. हे ३ डी “श्रीयंत्र” जे ब्रम्हवादिनी लोपामुद्रा मातेच्या मूळ संकल्पनेनुसार बनलेले आहे. हा किल्ला आहे, गड आहे श्रीविद्येचा, आदिमाता चण्डिकेचा, ज्यावर ती सदैव राहते.  हे तिचे राहण्याचे अत्यंत महत्वाचे व एकमेव स्थान आहे. ह्याच्या केवळ दर्शनानेसुद्धा मनुष्याच्या देहातील १०८ केंद्रस्थानातील चांगल्या केंद्रस्थानांना अधिक बळ मिळते.

“श्रीयंत्र” पूजन (घरगुती) महत्व

अशा दत्तप्रणित “महाश्रीयंत्राचे” दर्शन धनलक्ष्मीच्या दिवशी श्रद्धावानांना घेण्याची एक सुवर्णसंधी संस्थेने उपलब्ध केलेली असते. तसेच, ह्या दत्तप्रणित “महाश्रीयंत्राच्या” रचनेतून सिद्ध केलेल्या त्याच्या छोट्या प्रतिमा, ही उपासना आपल्याला घरी करण्यासाठी, संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ह्या छोट्या प्रतिमेवर, ह्या पुण्यप्रद दिवशी श्रद्धावान आपल्या कुटुंबाच्या क्षेमकल्याणासाठी व संपूर्ण वर्षभराच्या स्वास्थ्य आणि सुखसमृद्धीसाठी श्रध्दावान आपल्या घरातील “श्रीयंत्र” उत्सव स्थळी घेऊन येतात व त्यावर अभिषेक करतात.  

श्रीयंत्रासमोर बसून नियमितपणे किंवा आपल्या इच्छेनुसार खालील जप करू शकतो.

१. ॐ श्री र्‍हीं क्लीं र्‍हीं महालक्ष्मै नमः।

२. ॐ र्‍हीं सकलसर्वभूषितां ललितादेवीं नमामि।

३. ॐ र्‍हीं महात्रिपुरसुंदरी देव्यै नमो नमः।

४. ॐ श्रीकमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं ॐ महालक्ष्म्यै नमो नमः।

५. ॐ श्री आल्हादिन्यै नंदायै संधिन्यै नमो नमः।

हे “श्रीयंत्र” घेणार्‍या श्रद्धावानांना ह्या श्रीयंत्रापासून आशीर्वाद व लाभ मिळत राहतात.

संस्थेतर्फे साजरा केला जाणारा धनलक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम

ह्या उत्सवात, अशा “महाश्रीयंत्राचे”, लक्ष्मीमातेच्या महन्मंगल मूर्तीचे व ३ डी “श्रीयंत्राचे” विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात होते.  “श्रीयंत्रावर” पवित्र मंत्र घोषात अभिषेक केला जातो व त्याचवेळी दिवसभरात १०८ वेळा ‘दत्तमालामंत्राचे’ पठण केले जाते.

परमपूज्य सद्‌गुरुंचे आगमन झाल्यावर, दर्शन सोहळा सुरु होण्याआधी “महाश्रीयंत्राचे” पूजन व संस्कृत आरती करण्यात येते. व ‘दर्शन सोहळ्यास’ सुरुवात होते. “महाश्रीयंत्राचे” पूजन झाल्यानंतर प्रत्येक तासाला श्रीलक्ष्मीची आरती केली जाते.

रात्री महाआरतीच्या वेळेस दत्तात्रेयांची व “महाश्रीयंत्राची” आरती होते व उत्सवाची सांगता होते.

दिवाळी फराळ स्वीकृती आणि वाटप

ह्या उत्सवात श्रध्दावान दिवाळीचा फराळ घेऊन येतात. रात्री हा फराळ उपासना केंद्रांना देण्यात येतो. उपासना केंद्रांद्वारे मोखाडा, जव्हार, शहापूर येथील शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येतो, ज्यांच्या घरी कधीच फराळ बनत नाही.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com