AniruddhaFoundation-Shree Dattajayanti

मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस म्हणजेच दत्तजयंती

समस्त श्रद्धावानांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी आई चण्डिकेचा प्रथम तरल पुत्र अर्थात दिगंबर-दत्तात्रेयांचा स्थूल मानवी रुपात जन्म झाला. हा दिव्य, शुभ व शुभ्र प्रकाश अर्थात दिगंबर – दत्तात्रेय माता अनसूयेच्या गर्भात प्रकट झाला, आणि नऊ महिने नऊ दिवसानंतर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या अरुणोदयाच्या वेळीस दत्तात्रेयांनी जन्म घेतला. हा दत्तजयंतीचा उत्सव श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशतर्फे सद्गुरु   श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मार्गशीर्षाचे महत्व –

३ जानेवारी २००८ च्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी मार्गशिर्ष महिन्याचे महत्त्व सांगितलेले आहे. बापू म्हणाले, “शिर्ष म्हणजे मस्तकाला – मेंदूला त्या जीवाच्या मार्गावरून पाहिजे त्या गतीने, पाहिजे त्या दिशेने, पाहिजे तेवढेच नेऊन जराही न थकविता, जराही त्रास न होऊ देता त्या जीवाचा प्रवास सफल संपूर्ण करवून आणणारा मार्ग, म्हणजे मार्गशीर्ष’’.

ते पुढे म्हणतात, “मार्गशीर्ष हा मस्तकाचा मार्ग आहे. या महिन्यामध्ये प्रत्येक मनुष्याचा मेंदू हा खरोखरच सहस्त्रमार्गानी, सहस्त्रगोष्टी स्विकारण्यासाठी सक्षम झालेला असतो. परमात्मा म्हणतो ‘‘मासानां मार्गशिर्षोहम्‌’’ अर्थात तो परमात्मा स्वत:च मार्गशीर्ष महिना आहे. ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेलाच श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये असणार्‍या सहस्त्रार चक्राच्या सहस्त्र वाटा त्या भगवंताने त्याच्या अकारण कारुण्यामुळे खुल्या केलेल्या असतात. आमच्या आयुष्यातील निरर्थकपणा निघून जावा. जीवनाला चांगला अर्थ प्राप्त व्हावा; यासाठीच हा मार्गशीर्ष महिना आहे.

दत्तजयंतीचे महत्त्व –

ज्याची गुरुतत्वावर श्रद्धा आहे तो प्रत्येकजण या दिवसाला अत्यंत पवित्र मानतो. या दिवशी श्री दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला याची सविस्तर कथा बापूंनी लिहिलेल्या ‘मातृवात्सल्यविंदानम्‌’’ या ग्रंथाच्या ४१ व्या अध्यायात आहे. तसेच याच ग्रंथातील ३१ व्या अध्यायात कलियुगाबद्दल माहिती सांगताना ’श्रीगुरुभक्ती’बद्दल सुध्दा सांगितले आहे. दत्तजयंती हा श्रीगुरुभक्तीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि प्रत्येक हृदयात श्रीगुरुभक्तीचा जन्म होणे आवश्यक आहे.

दत्तजयंती उत्सव –

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनतर्फे या पवित्र दिवशी, अत्यंत पवित्र वातावरणात ’दत्तजयंती’ उत्सव साजरा केला जातो. दत्तजयंतीच्या संध्याकाळी श्रीहरीगुरुग्राम येथे उपासना होते. या उपासनेत सर्वप्रथम दत्तगुरुंना आवाहन करणारा ‘‘भो: दत्तगुरु | कृपया समागच्छ | सर्व रुपाणि दर्शय | मम हृदये प्रविश्य | मम सहस्रारे प्रतिष्ठ | ॐ नमो नमः ||I’’ हा जप ५४ वेळा घेतला जातो. ह्या जपाचे पठण करता असताना प्रत्येक उपस्थित श्रद्धावान दत्तात्रेयांची जणू मानसपूजा करतो. दत्तजन्म हृ्दयात व्हावा आणि सहस्त्रार चक्रात त्यांची प्रतिष्ठापना व्हावी हा शुद्ध हेतु मनात ठेवून हे पठण प्रत्येकजण करतो. त्यानंतर श्री वासुदेवानंदसरस्वतीकृत ‘‘घोरकष्टोद्धरणस्तोत्र’’ व रंगावधूत महाराजांनी रचलेले ‘‘दत्तबावनी’’ चे पठण केले जाते.

या पठणानंतर संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरते. श्रीगुरु भक्तीचा सुगंध अणू-रेणूत दरवळतो आणि मग ‘‘ॐ साई श्री साई जय जय साई राम’’ या गजराने वातावरण मंत्रमुग्ध होते.

दत्तजयंती आणि सुमुहूर्त –

याच पवित्र दिनी, पवित्र अशा वर्धमान व्रताधिराजाची सुरुवात होते. आपल्यातील सत्व गुण, गुरु गुण यांचे वर्धन करणारे हे व्रत सर्व श्रद्धावान प्रेमाने करतात. श्रीमद्पुरुषार्थ तृतीय खंड – आनंदसाधना या ग्रंथात बापूंनी या व्रताबद्दल लिहिले आहे, “श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही. श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे परमात्म्याच्या नऊ-अंकुर-ऐश्‍वर्याची प्राप्ति करून घेण्याचा महामार्ग.” हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास स्वत:च्या उदरात सामावून घेते व आपोआपच नविन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो.

२००५ च्या दत्तजयंतीचा मुहुर्त साधून डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांनी ’प्रत्यक्ष’ हे बिगर राजकीय दैनिक सुरु केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध यातून अचूकपणे घेतला जात आहे. दरवर्षी दत्तजयंतीस दैनिक ’प्रत्यक्ष’चा वर्धापन दिन असतो.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com