AniruddhaFoundation-Maghi Ganapati Janmotsav

माघी गणेशाची माहिती –

पार्वती मातेने विश्वाच्या घनप्राणास साकार केले तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी. म्हणूनच माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा उत्सव साजरा केला जातो व त्यालाच ‘माघी गणेशोत्सव’ म्हणतात.

माघी गणेशाचे महत्त्व –

ऋग्वेदामध्ये ज्याचा उल्लेख ‘ब्रम्हणस्पती’ असा केला आहे, त्याच्या पुढच्या उजव्या हातामध्ये मोदक आहे. डाव्या हातात त्याचाच तुटलेला दात आहे तर मागील दोन हातांमध्ये प्रत्येकी परशु व पाश ही आयुधे आहेत व मूलाधार चक्राचा स्वामी ‘श्रीगणपती’ आहे.

माघी गणेश उत्सवाचे महत्त्व –

अशा या गणेशाची दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला, सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, भारतीय भाषा संगम व श्रीअनिरुद्ध हाऊस ऑफ फ्रेन्डस्‌ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माघी गणेश जयंती’ हा उत्सव साजरा केला जातो. ह्याचे महत्त्व फार वेगळे आहे. श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन हा उत्सव २००९ पासून साजरा करीत आहे. ‘गुरु’ नाम म्हणजे गणपती, वन्ही (अग्नी) व विष्णु यांचे एकत्र येणे. म्हणूनच अष्टविनायक व ब्रह्मणस्पती यांची एकत्रित उपासना फक्त ‘गुरुस्थानम्‌’ च्या स्थापनेनंतरच सामर्थ्य प्रदान करू शकते. म्हणूनच श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने माघी गणेशोत्सव श्रीगुरुक्षेत्रम्‌च्या संस्थापने नंतरच साजरा करायला सुरुवात केली. (श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ची स्थापना २००७ मध्ये झाली).

माघी गणेश उत्सव सोहळा –

माघ शुद्ध चतुर्थीला जो गणेशोत्सव साजरा करतो तोच माघी गणेशोत्सव होय. सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन या संस्थेतर्फे खालीलप्रमाणे पूजन करून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.

माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी ‘एक-दिन-साध्य श्रीगणेशप्रतिष्ठा याग’ केला जातो. यज्ञासमोर ब्रह्मणस्पती गणपतीची स्थापना केली जाते. हा याग संपन्न करण्यासाठी खास पुरोहित बोलाविले जातात.

या उत्सवात आपल्याला यज्ञासमोर प्रतिष्ठित केलेल्या ब्रम्हणस्पती मूर्तिचे दर्शन होते. तसेच उत्सवकाळात ब्रम्हणस्पतीच्या मूर्तिवर ब्रम्हणस्पती सूक्ताच्या पठणाद्वारे अभिषेक केला जातो. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे पुरश्चरण केले जाते. त्यावेळी सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या निवासस्थानी असलेल्या देवघरातील ब्रह्मणस्पतीची मूर्ति उत्सवस्थळी आणली जाते व त्या मूर्तिवर आठ नद्यांच्या जलाने अभिषेक केला जातो.

ब्रम्हणस्पती सूक्त हे ऋग्वेदातील इंद्र पुत्र – गृत्समद शौनक ऋषिने लिहिलेले अत्यंत पवित्र सूक्त आहे. केवळ व्यक्तीचेच नाही, समाजाचेच नाही तर आपल्या राष्ट्राचे भले करणारे, राष्ट्राला, प्रत्येक नागरिकाला समर्थ आणि निर्भय बनविणारे हे सूक्त आहे.

माघी गणेश उत्सवाचे आणखीन एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे श्री अष्टविनायकाचे पूजन व दर्शन.

अष्टविनायक म्हणजे गणपतीची आठ पवित्र स्थाने – तीर्थक्षेत्र. प्रत्येक जीवात्म्याठायी, परमेश्वराच्या अष्टबीज ऐश्वर्यांचे, नऊ अंकुर ऐश्वर्यांमध्ये रूपान्तर करणारा परमात्मा नांदत असतो. तो परमात्मा परमेश्वराची कृपा प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावी म्हणून जी रचना, जी व्यवस्था स्थूल, सूक्ष्म व तरल शरीरामध्ये म्हणजेच भौतिक प्राणमय आणि मनोमय देहात उत्पन्न करतो, ती व्यवस्था, ती यंत्रणा म्हणजे गणपती व त्या व्यवस्थेतील ती आठ महत्त्वाची केंद्र, स्थाने म्हणजेच अष्टविनायक.

सामान्य मनुष्य अंतर्मुख होऊ शकत नाही, आतमध्ये बघू शकत नाही म्हणून त्याला साकार अष्टविनायकाचे दर्शन घेता यावे, तसेच त्याच्या देहांतर्गत अष्टविनायकांची कृपा त्याला मिळावी म्हणून ऋषिंनी तपश्चर्या करून अष्टविनायकांची स्थाने प्रगट केली – ती आठ महत्त्वाची स्थाने म्हणजेच अष्टविनायक.

अष्टविनायकाच्या प्रत्येक स्थानी जशी गणपतीची मूर्ति आहे, तशी मूर्ती या उत्सवात तयार केली जाते. ह्या अष्टविनायकाचे दर्शन श्रद्धावानाला करता येते. प्रत्येक श्रद्धावान भक्ताला ब्रम्हणस्पतीचे लाल फुलांनी व दुर्वा अर्पण करून पूजन करता येते.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी ब्रम्हणस्पतीचा खालील मंत्र दिला आहे –

‘ॐ श्रीब्रम्हणस्पतये पार्वतीपुत्राय मंगलमूर्तये गणपतये विश्वघनप्राणाय सर्वविघ्ननिवारकाय नमो नम:।’

श्रद्धावान वरील मंत्राचा गणपती उत्सवात, दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ७२ वेळा व रोज ८ वेळा जप करू शकतात.

श्रद्धावानांवर लाभेवीण प्रेम करणार्‍या श्रीअनिरुद्धांनी आम्हा श्रद्धावानांना त्यांची नवअंकुर ऐश्वर्ये प्राप्त व्हावीत, तसेच प्रत्येकाच्या देहातील आठ क्षेत्र उचितपणे कार्यरत रहावीत म्हणून ह्या माघी गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com