AniruddhaFoundation-Gurupournima Utsav

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुरेव परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ॥

भारतीय संस्कृतीत आषाढ पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. भगवान व्यास मुनींचा जन्म दिवस म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.

भक्ती व सेवेची सांगड घालून संसार व परमार्थ एकाच वेळेस आनंदाने करण्यासाठी स्वत:चा समग्र विकास साधण्यासाठी मानवाला ओजाची गुरुतेजाची गरज असते आणि सदगुरुतत्वाकडूनच हे गुरुतेज प्रत्येकाला प्राप्त होत असते.

गुरुपौर्णिमेस सदगुरुंच्या ॠणाचे स्मरण करुन दर्शन घेतल्यामुळे भक्त अधिकाधिक गुरुतेज सहाजतेने प्राप्त करु शकतो.

गुरुतेज स्वीकारण्यात येणारे अवरोध गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वणीस आपोआप गळून पडतात व गुरुतेजाचा अनिरुध्द प्रवाह प्रवाहित होतो, अशी गुरुपौर्णिमेची महती आहे. म्हणूनच श्रीगुरुकृपेचा आणि गुरूभक्तीचा आनंद लुटण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सद्गुरुंच्या ऋणांचे स्मरण करून गुरुप्रेम स्वीकार करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.

संस्थेतर्फे सर्वसमर्थ व सर्वज्ञ असलेल्या सद्गुरू श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत पहिला गुरुपौर्णिमा उत्सव १९९६ साली दादर येथे मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा झाला.

सद्गुरू श्रीअनिरुद्धांचा प्रमुख गुणधर्म श्रद्धावानांना प्रेम देणे व श्रद्धावानांना क्षमा करणे हाच आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदक्षिणा म्हणून श्रद्धावानानांकडून “पाप” मागणाऱ्या श्रीअनिरुद्धांचे श्रद्धावानांवर असलेले प्रेम कशानेही मोजले जाऊ शकत नाही.

गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी गुरूऋणांचे स्मरण करून सर्वप्रथम स्वत: परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू, नंदाई व सुचितदादा हे श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पूजन करतात. त्यानंतर ह्या पादूकांच्या दर्शनाचा लाभ सर्व श्रद्धावान घेऊ शकतात.

दरवर्षी होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात विश्वाच्या गुरुतत्वाचे प्रतीक असलेल्या श्री त्रिविक्रमाच्या तीन पावलांचे पूजन व महापूजन केले जाते .

श्रीत्रिविक्रम पूजन : 

परमेश्वराची शुभंकर यंत्रणा आणि अशुभनाशिनी यंत्रणा, या दोन यंत्रणा बाह्य विश्वाप्रमाणे अंतर्विश्वातही, म्हणजे मानवी देहातही कार्यरत असतात.

सद्‌गुरुतत्व मानवाच्या जीवनात या दोन यंत्रणांना सक्रिय करण्याचे कार्य करते. या सद्‌गुरुतत्वाचा प्रतिनिधी आहे – श्रीत्रिविक्रम. सद्‌गुरुतत्वरूपी त्रिविक्रम स्वत:च्या तीन पदन्यासांमध्ये अनन्यशरण असणार्‍या श्रद्धावानाचे दुष्प्रारब्ध नष्ट करून त्याच्या जीवनात आनंदवन फुलवतो.

ज्या क्षणी आम्ही त्रिविक्रमाला शरण जातो, त्याक्षणी त्रिविक्रमाचा ‘पदन्यास’ आमच्या मनात सक्रिय होतो. अगदी आमचे पाप कितीही मोठे असले, तरी ते त्रिविक्रमाला आमच्या जीवनात प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाही अशी श्रध्दावानांची भावना आहे.

म्हणूनच श्रद्धावान गुरुपौर्णिमेला सद्‌गुरुतत्वाचा प्रतिनिधी असणार्‍या त्रिविक्रमाचे दर्शन घेतात, त्याचे पूजन करतात आणि त्याची प्रार्थना करून त्याला जीवनात येण्यासाठी आमंत्रण देतात. आमच्या जीवनात नित्य गुरुपौर्णिमा रहावी, अशुभाचा नाश होऊन सदैव शुभच व्हावे या भावाने गुरुपौर्णिमेस श्रद्धावान त्रिविक्रमाचे पूजन करतात.

तसेच ह्या पवित्र दिवशी परमपूज्य बापूंच्या ‘मुळ सद्गुरुंच्या पादुका’, श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवातील ‘पुर्वावधूत कुंभ’ व ‘अपुर्वावधूत कुंभ’ म्हणजेच पहिला व २४ वा अवधूत कुंभ या स्तंभावर ठेवलेले असतात.

प्रथम परमपूज्य सद्‌गुरु बापू, नंदाई व सुचितदादा या स्तंभाच्या भोवती रामनाम वहिच्या लगद्यापासून बनवलेल्या इष्टिका डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा घालतात.

जी इष्टिका विठ्ठलाने स्वतःच्या पायाखाली ठेवली तीच इष्टिका माझ्या डोक्यावर आहे, हाच भाव ठेवून प्रत्येक श्रद्धावान “साईराम जय जय साईराम, दत्तगुरु सुखधामा| अनिरुद्ध बापू सद्‌गुरुराया, कृपा करजो देना छाया||”

हा गजर म्हणत प्रदक्षिणा घालतो आणि ह्या सद्‌गुरुचे चरण माझ्या हृदयात कायमचे स्थापन व्हावेत ही प्रार्थना करतो.

ह्या दिवशी भक्तीगंगेतील दिंडीमधून फिरणार्‍या पालखीमधील ‘परमपूज्य सदगुरु बापूंच्या पदचिन्हांवर’ मस्तक ठेवण्याची संधी प्रत्येक श्रद्धावानास मिळते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी अखंड सुरु असलेल्या अग्निहोत्रात सर्व श्रद्धावानांना उद अर्पण करता येतो व स्वतः:च्या व इतर आप्तस्वकीयांच्या योगक्षेमासाठी प्रार्थना करता येते.

ह्या दिवशी दर एक तासानंतर श्रीअनिरुद्ध चालिसा पठणाचा लाभ सर्व श्रद्धावानांना घेता येतो व ह्यावेळेस उदीला परमपूज्य बापू हस्तस्पर्श करतात व तो उदीप्रसाद श्रध्दावानांना दिला जातो.

गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी परमपूज्य बापूंचे दर्शन श्रध्दावानांना रात्री ९:०० वाजेपर्यंत घेता येते व त्यानंतर महाआरती होते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर कधीही परमपूज्य बापू श्रध्दावानांकडून कधीच कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा, भेटवस्तू, ग्रीटींग कार्ड, फळे, हार, मिठाई, पैसे इत्यादि स्वीकारत नाहीत.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com