अहिल्या संघ
अहिल्येसारखी परिस्थिती कुठल्याही स्त्रीच्या नशिबी कधीच येऊ नये म्हणून सदगुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या तेरा कलमी कार्यक्रमातील प्रवचनात ‘अहिल्या संघ’ या कलमाची ओळख करून दिली. हा अहिल्या संघ म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळ नाही, तर स्त्रियांनी आपली अमाप शक्ती व सामर्थ्याचा वापर स्वत:च्या, कुटुंबाच्या, समाजाच्या व पर्यायाने देशाच्या विकासासाठी करण्याचा प्रयास आहे.
भरदिवसा अनेक स्त्रियांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात वाचनास येतात. राजधानी नवी दिल्लीतल्या ‘निर्भया’ वरील अत्याचाराची घटना आजही मानवाच्या मन-बुद्धीला सुन्न करून टाकते. अशा घटना सावध करतात की आपले आप्त, नातेवाईक किंवा समाज आपल्याला संकटसमयी वाचवतील, या आशेवर आता स्त्रियांनी रहायला नको. त्यांना स्वतःलाच अत्याचाराविरोधात लढावे लागणार आहे. यासाठी त्यांना सक्षम ’वीरा’ बनवण्याकरीता ‘अहिल्या संघा’च्या माध्यमातून स्वसंरक्षणासाठी बलविद्या शिकविली जाते.
अहिल्या संघातर्फे ‘प्राच्यविद्या’ अथवा ‘बलविद्या’ प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून स्त्रिया स्वतःचे संरक्षण करायला समर्थ होतात, तसेच संकटात सापडलेल्या इतर स्त्रियांची ही त्या मदत करतात. हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यामागे हाच हेतु आहे.
‘Attack is Defence, Defence is Defeat’ म्हणजेच आक्रमण हेच बचावाचे सूत्र आहे, या तत्त्वावर ‘बलविद्या’ प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात पूर्व प्राथमिक सूर्यनमस्कार, विविध व्यायामप्रकार, हस्तलाघव, मुष्टी लाघव, मुद्गल विद्या अशा अनेक प्राच्यविद्यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येते. आतापर्यंत ‘बलविद्या’ प्रशिक्षणाच्या एकूण २१ बॅचेस झाल्या असून सुमारे १५०० स्त्रियांनी याचा लाभ घेतला आहे.
अहिल्या संघातर्फे ‘सूर्यनमस्कार शिबिराचे’देखील आयोजन करण्यात येते. आतापर्यंत अहिल्या संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ३८ शिबिरे आयोजित करण्यात आली. त्याचा सुमारे २००० स्त्रियांनी लाभ घेतला. ज्या स्त्रियांवर अत्याचार झाला आहे, ज्यांच्यावर संकटे कोसळली आहेत, अशा एकाकी निराधार स्त्रियांना आधार देण्याचे काम अहिल्या संघ करतोच, पण त्याव्यतिरिक्त व्यसनाधीन नवर्यामुळे हाल-अपेष्टा भोगाव्या लागणार्या स्त्रियांना आधार देण्याचे म्हणजे व्यसनमुक्तीला हातभार लावण्याचे कार्यही अहिल्या संघ करते.
शिवाय अहिल्या संघाच्या माध्यमातून वृक्षारोपण सेवाही राबविण्यात येते. अहिल्या संघातर्फे आतापर्यंत सुमारे १५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. अहिल्या संघ स्त्रियांना सक्षम बनवून त्यांचे जीवन अधिकाधिक सुन्दर करण्याबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणामध्येही सहभागी होऊन वसुन्धरेसही सुन्दर बनवण्याच्या कार्यातही हातभार लावतो.