सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेल्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खंड ‘प्रेमप्रवास’मध्ये त्यांनी त्यांच्या पंचगुरुंचे वर्णन केले आहे, ते थोडक्यात असे आहे.
श्रीगुरुदत्त
परमेश्वर म्हणजेच स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशी चेतनतत्त्व. श्रद्धावान ह्यालाच ‘दत्तगुरु’ असे म्हणतात.
सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या पंचगुरुंपैकी प्रथम गुरु म्हणजे ‘दत्तगुरु’; अर्थात सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या आनंदमय कोशाचा स्वामी व त्यांचा करविता गुरु. श्रीसाईसच्चरितातील पुढील ओवीचा संदर्भ देऊन सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दत्तगुरुंचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
दत्तासारिखें पूज्य दैवत । असतां सहज मार्गी तिष्ठत ।
अभागी जो दर्शनवर्जित । मी काय पावत तयासी ॥
श्रीसाईनाथांचे हे शब्द म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या जीवनकार्याची दिशा आणि श्रीगुरुदत्त ह्यांच्या चरणी सद्गुरु श्रीअनिरुद्धांची असणारी अविचल निष्ठा.
श्रीगायत्रीमाता
‘गायत्री’ हेच त्या महन्मंगल आदिमातेचे प्रथम स्वरूप, आद्यस्वरूप असून, ते सदैव तरल पातळीवरूनच कार्यरत असते.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांची द्वितीय गुरु अर्थात त्यांच्या विज्ञानमय कोशाची स्वामिनी श्रीगायत्रीमाता ही त्यांची वात्सल्यगुरु आहे.
परब्रह्माची ‘आपण परमेश्वर आहोत’ ही जाणीव म्हणजेच परमेश्वरी, आदिमाता. हिलाच वेदांनी ‘गायत्रीमाता’ हे नामाभिधान दिलेले आहे.
ह्या गायत्रीस्वरूपाच्या कृपेनेच मनुष्यास कुठलेही ज्ञान व विज्ञान प्राप्त होत असते आणि उपयोगास येत असते.
श्रीराम
सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे तृतीय गुरु अर्थात प्रभु श्रीराम हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मनोमय कोशाचे स्वामी व कर्ता गुरु आहेत व रामचरित्र म्हणजेच मर्यादापालनाचे प्रात्यक्षिक.
श्रीराम ‘मर्यादापुरुषोत्तम’ नावाने ओळखले जातात.
महाप्राण श्रीहनुमंत
सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे चतुर्थ गुरु श्रीहनुमंत हे त्यांचे ‘रक्षकगुरु’ अर्थात् अद्वितीय मर्यादारक्षक.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्राणमय कोशाचे स्वामी व त्यांचे रक्षक गुरु श्रीहनुमंत स्वतःला प्रभु रामचंद्रांचा दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानतात आणि श्रीअनिरुद्ध त्या हनुमंताचा दासानुदास म्हणवून घेण्यातच स्वतःच्या जीवनकार्याची इतिकर्तव्यता मानतात.
‘मर्यादित ते अमर्याद अनंतत्व’, ‘भक्त ते ईश्वरत्व’, हा प्रवास करणारे श्रीहनुमंतच एकमेव!
श्रीसाईसमर्थ
सद्गुरु श्री अनिरुद्धांचे पंचम गुरु साईसमर्थ अर्थात सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या अन्नमय कोशाचे स्वामी व त्यांचे दिग्दर्शक गुरु आहेत.
साईबाबांचे जीवनचरित्र असलेल्या व त्याचबरोबर भक्तांच्या जीवनात विकास व आनंदाचा मार्ग दिग्दर्शित करणार्या श्रीसाईसच्चरित ह्या ग्रंथावर आधारित सद्गुरु श्रीअनिरुद्धांची प्रवचने म्हणजे श्रीअनिरुद्धांच्या आपल्या दिग्दर्शकगुरुंप्रति व श्रद्धावानांप्रति असणार्या प्रेमाचा आविष्कारच.
श्रीसाईसच्चरितातील अनेक ओव्यांमधून व्यक्त होणारी श्रीसाईंची विनम्रता, लीनता, शालीनता आणि उच्च निरभिमानता ह्यांचा संदर्भ देऊन सद्गुरु श्रीअनिरुद्ध ‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’ द्वितीय खंड ‘प्रेमप्रवास’मध्ये (पृष्ठ क्र. ३५७) म्हणतात, ‘माझ्या अन्नमय कोशाचा स्वामी व माझा दिग्दर्शक गुरु हा साईसमर्थ जर हा उच्चार करतो, तर मग मला, ‘मी कोणी श्रेष्ठ आहे’ असे म्हणण्याचा काडीचाही अधिकार नाही असे मी निश्चितपणे मानतो.’