भारतीय स्त्रियांची परिस्थिती आणि आत्मबल –

आजची स्त्री कितीही शिकलेली असली तरी ती तिचे आत्मबल गमावून बसते. त्यामुळे निराशाजनक अवस्थेत अनेकविध कौटुंबिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते. वैदिक कालखंडाच्या स्त्रियांची मूळ ताकदच “आत्मबल” ही होती. हे आत्मबल पुनः स्त्रियांना मिळवून देऊन आजची, उद्याची सक्षम स्त्री घडविणे आवश्यक आहे. तरच आपला भारत पुन्हा एकदा सर्वसमर्थ होईल. कारण देश समर्थ होण्याची सुरुवात हि कुटुंबातूनच होते व एक समर्थ कुटुंब त्या कुटुंबाची समर्थ स्त्रीच घडवू शकते.

आत्मबल’ ह्या नावातच सर्व काही आहे. ’आत्मबल’ म्हणजे स्त्रियांमध्ये उपजतच असलेली आंतरिक शक्ती – अशी शक्ती जी प्रत्येक स्त्रीमध्ये असली, तरी प्रत्येक स्त्रीला त्याची जाणीव व्हावी लागते. अशी शक्ती जिच्याशी ओळख होण्याकरिता कधीकधी स्त्रीला प्रयास करावे लागतात, अशी शक्ती जी तिच्या आत खोल मनाच्या गाभ्यामध्ये दडून राहिलेली असते व हे प्रयास सुरू झाल्यानंतर हळूहळू तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनते व कालांतराने ती शक्ती तिचे व्यक्तिमत्त्वच बनते. कारण आत्मबल विकास हा कुठल्याही बाह्य उपायांपेक्षाही आतूनच होऊ शकतो. स्त्रीला तिच्यातील क्षमतांचा शोध लागला की तिच्यामध्ये जागृत झालेल्या आत्मविश्वासाने व उत्साहाने ती आयुष्याकडे बघायला लागते. मात्र आता आयुष्याकडे बघायची तिची दृष्टी बदललेली असते….त्यामुळे आता तिचे आयुष्यच बदलून जाते. कारण बदल हा आतूनच घडावा लागतो. स्त्री, मग ती मुलगी, पत्नी वा आई अशा कुठल्याही भूमिकेत असो – ती कौटुंबिक धागे मजबूत करण्यामध्ये, मुलांची व्यक्तिमत्त्वे घडविण्यामध्ये म्हणजेच पर्यायाने सशक्त समाज घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र त्याकरिता मुळात तिला स्वत:मधील शक्तीची, सकारात्मकतेची आणि प्रेम देऊ व घेऊ शकण्याच्या ताकदीची जाणीव झाली पाहिजे. कारण तुमच्याकडे जे आहे, तेच तुम्ही देऊ शकता.

आत्मबल वर्गाची स्थापना –

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू व त्यांच्या धर्मपत्नी सौ. नंदा अनिरुद्ध जोशी (नंदाई) यांच्या मार्गदर्शनाने स्त्रियांच्या आत्मबल वर्गाची स्थापना करण्यात आली. ‘श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी’ ह्या संलग्न संस्थेमार्फत जे अनेक उपक्रम राबविले जातात त्यात स्त्रियांसाठीचा हा उपक्रम म्हणजे ‘आत्मबल-विकास केंद्र’! १९९८ साली पहिल्या आत्मबल वर्गाची घोषणा करण्यात आली. त्यात अवघ्या २८ स्त्रिया होत्या. आता २०१६-१७ पर्यंत जवळजवळ १५००-१६०० स्त्रियांनी आत्मबल वर्गाचा लाभ घेतलाय. औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार अशा लांबच्या गावाहून येऊन ह्या वर्गाचा लाभ घेणार्‍या स्त्रियाही आहेत. मुंबईबरोबरच पुणे येथे ही हा वर्ग घेतला जातो.

सौ. नंदा अनिरुद्ध जोशी (नंदाई) यांचा परिचय –

गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. सौ. नंदा आत्मबल विकास स्त्रियांसाठी त्यांचा आत्मविश्वास व आंतरिक शक्ती वाढवणारा उपक्रम यशस्वीरित्या संचलित करत आहेत. त्यांनी मुंबई विद्‌यापिठामधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून आयुर्वेद व निसर्गोपचार (नॅचरोपथी) ह्या विषयांवरही त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी ब्रेल भाषेमध्येसुद्धा प्राविण्य मिळवले असून स्वत: ३ वर्षे ब्रेल भाषा शिकवली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घेतले जाणारे हे आत्मबल वर्ग स्त्रियांची आंतरिक शक्ती व आत्मविश्वास ह्यांचा विकास घडवून ह्या दोन्ही गुणांना दृढ करतात व त्यायोगे स्त्रियांना धीट, स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनण्यास मदत करून त्यांना स्वत:चीच नवी ओळख करून देतात. इंग्रजी अजिबात येत नसणाऱ्या, अगदी गंधज्ञान नसलेल्या स्त्रियांना दैनंदिन व्यवहाराला व्यवस्थित पुरे पडावे इतके इंग्रजी डॉ. सौ. नंदा अनिरुद्ध जोशी स्वत: शिकवतात.

आत्मबलची रुपरेषा –

डॉ. (सौ.) नंदा अनिरुद्ध जोशी ह्यांनी अतिशय मेहनतीने हा कोर्स तयार केलेला आहे. दर आठवड्याला एक सत्र, असे ६ महिने हा कोर्स चालतो. एखाद्या विषयाला वाहिलेली छोटी नाटुकली, चर्चासत्रे, प्रोजेक्टस आणि प्रेझेंटेशन्स अशा गोष्टी ह्या कोर्सचा भाग असतात; ज्यांचा अभ्यास करता एकीकडे ह्या कोर्सच्या विद्यार्थिनींचा बाह्य जगाशी संपर्क साधला जातो, तर दुसरीकडे त्यांचा स्वत:शीच संवादही सुरू होतो. कोर्सचे मूलभूत स्वरूप जरी दरवर्षी तेच असले, तरी दरवर्षी कथावस्तू (थीम) मात्र प्रासंगिक महत्त्वाच्या मुद्यानुसार वेगवेगळी असते.

सुनियोजित जीवनशैली ही नेहमीच सुखप्रद व सुविहित असल्याने, ह्या कोर्समध्ये इतर कौशल्यांबरोबरच, वेळेचा सदुपयोग (टाईम मॅनेजमेंट) करण्याची कला, ज्यामध्ये घर व ऑफिस हे दोन्ही सांभाळण्यात स्त्रीची जी तारेवरची कसरत होत असते, त्यामध्ये संतुलन कसे मिळवावे, एका वेळेला होऊ शकणारी अनेक कामे प्रभावीपणे कशी करावीत (मल्टीटास्किंग), ह्या बाबतीत विशेष मार्गदर्शन केले जाते.

इंग्रजीमध्ये संभाषण करता येणे ही केवळ गरजच नव्हे, तर तो एक आवश्यक गुण मानला जातो. अस्खलित इंग्रजीमध्ये संभाषण करता येण्याने जगात वावरताना आत्मविश्वास वाढतो. हे ध्यानात घेऊन ह्या कोर्समध्ये इंग्रजी संभाषणावर विशेष भर दिला जातो. ज्या स्त्रियांना इंग्रजीचा गंधही नाही त्यांच्यासाठी बाळबोध संभाषणांपासून सुरुवात केली जाते. तर ज्या स्त्रियांना इंग्रजी भाषेची ओळख आहे, पण सराव नसल्यामुळे बोलता येत नाही, त्यांना त्यानुसार आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते.

कोर्स संपताना एका सायंकाळी संगीत व अन्य कार्यक्रमांच्या सादरीकरणाचे आयोजन केले जाते. ह्या कार्यक्रमात ह्या कोर्सच्या सर्व विद्यार्थिनी – वय, व्यवसाय आदिंविषयी कुठलाही अपवाद न करता – भाग घेतात. आपल्यात काहीतरी कमी आहे ह्या गैरसमजुतीपोटी ह्या स्त्रियांना आलेल्या न्यूनगंडावर व स्टेजफीअरवर त्यांना मात करता यावी हा ह्यामागील उद्देश असतो.डॉ. (सौ.) नंदा अनिरुद्ध जोशी स्वत: जातीने हजर राहून प्रत्येक सत्राचे संचालन करतात व दर वर्षीचा कोर्स अभ्यासक्रम तयार करण्यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. इतकेच नव्हे, तर दर वर्षीच्या कोर्सच्या अखेरीस हा जो कार्यक्रम सादर होतो, त्यात प्रस्तुत होणाऱ्या नाटुकल्या व अन्य सादरीकरणांचे दिग्दर्शनही त्या करतात.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com