AniruddhaFoundation-Tree-Plantation

 

प्रस्तावना

 

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या प्रेरणेने, संकल्पनेने व आशिर्वादामुळे “सदगुरु श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन” या संस्थेने परिस्थितीचे गांभीर्य व समस्येचे मूळ कारण लक्षात घेऊन “वृक्षारोपणाची मोहीम” हाती घेतली. हेच गांभीर्य व जागरुकता जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वैयक्तिक स्तरावर काही उपाययोजना सुरुही केल्या. श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, अनिरुद्ध समर्पण पथक व अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या सहयोगाने वृक्षारोपण मोहीम राबवत आहेत. संस्थेचे श्रद्धावान निष्काम भावनेने या मोहिमेत आनंदाने भाग घेतात.

 

मोठ्या प्रमाणात केलेल्या विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची, झाडा-झुडपांची लागवड ही आजवर झालेल्या बेसुमार जंगलतोड, त्यामुळे झालेली जमिनीची धूप, भूजलाची खालावलेली पातळी, जागतिक तापमानातील बदल यावर जालीम उपाय ठरू शकते.

 

वनस्पती जो प्राणवायू उत्सर्जित करतात ती आपणा सर्वांची प्राथमिक व मुलभूत गरज आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगचं (जागतिक तापमान वृद्धी) मूळ कारण असलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती ग्रहण करतात. जे आपल्या हिताचं आहे. म्हणजेच वृक्ष आपल्याला नेमकं जे हवयं तेच देत रहातात. तर जे हानिकारक आहे, अपायकारक आहे ते काढून घेतात व त्यापासून सुंदर अन्न बनवतात. फळं, फुलं बनवतात.

 

 

आपल्या प्राथमिक गरजा म्हणजे शुद्ध हवा, अन्न, पाणी या गोष्टी तर वनस्पती देतातच. परंतु अतिशय महत्वाचे म्हणजे पावसाळी ढगांना आकर्षित करून पाऊस पाडतात. या व्यतिरिक्त मानवाच्या इतर अनेक गरजा जसे कपडे, कागद, फर्निचर इत्यादि भागवतात.

 

महत्त्वाची झाडे

 

प्रथम आपण जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे झाडे लावू. अगदी आपण राहतो त्या सोसायटीत, घराच्या बाल्कनीमध्ये. प्रत्येक घरात तुळस, गुलाब, मोगरा, झिपरी, आले, कडीपत्ता ही झाडे तरी जरुर लावावीत. जेणेकरून घरातील प्राणवायूची पातळी राखण्यास मदत होईल व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होईल.

 

भूतकाळातील घटना

 

वृक्षलागवडीमुळे वातावरणात उचित बदल तर होतोच. परंतु जेव्हा जेव्हा दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीव तगून रहाण्यासाठी अमृताप्रमाणे वरदान ठरतो. इ.स. १८७३-७४ या काळात जेव्हा देशात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा बिहारमधील ग्रामस्थांचा जीव महुवा म्हणजे मोहाच्या झाडांनी वाचवला. या झाडाच्या बिया, साली, पाने, फुले, फांद्या लोकांनी वेळेला भाजून, शिजवून खाल्ल्या. अन्न म्हणून ते केवळ पौष्टीकच नव्हतं तर उत्साहवर्धकही होतं. निसर्गामध्ये असे अनेक विस्मयकारक वृक्ष आहेत, ज्यांचा प्रत्येक भाग मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे.

 

वृक्षारोपणाचे आध्यात्मिक फायदे

 

वृक्षारोपण करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कारण ते संपूर्ण मानवजातीच्या रक्षणासाठी अतिशय कल्याणकारी आहे. भविष्यातील रामराज्याच्या संकल्पनेमध्येही याचा फार महत्त्वाचा वाटा आहे.

भविष्यातील शुद्ध हवेसाठी, आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी निरोगी आयुष्यासाठी वृक्ष असायला हवेत.

 

संत तुकाराम महाराज म्हणतात, “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी” ही ओळ अत्यंत महत्त्वाची आहे.

 

परमेश्वरी योजनेनुसार प्रत्येक मनुष्यासाठी,

१००० – महावृक्ष – वड, पिंपळ, नारळ आदी

२००० – वृक्ष – आंबा, वड, फणस, पळस आदी

३००० – छोटे वृक्ष – चिकू, सिताफळ, चाफा इ.

४००० – झुडुपे – गुलाब, मोगरा, झेंडु आदी

५००० –  गवत सदृश्य रोपे – तांदूळ, गहू, मका, ऊस आदी.

असणे आवश्यक आहे. हे प्रमाण रामराज्य संकल्पनेचे एक अविभाज्य अंग आहे.

 

हा समतोल ज्या प्रमाणात ढासळतो त्या प्रमाणात संपूर्ण मानव समाजास नैसर्गिक आपत्ती व अनारोग्यास सामोर जावे लागते.

आणि म्हणूनच वनस्पती सृष्टीची, बागांची, रानांची, जंगलांची निगराणी करुया.

आमच्या घराच्या आसपासच्या जागी, शाळा, कार्यालयीन इमारतीच्या व रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष बहरू देत. आपल्याकडे असंख्य उद्याने, बागा, वने, जंगले यांचं संवर्धन होत राहू देत. आमच्या घराचे सौंदर्य वृक्ष वाढवत राहोत. परमेश्वरचरणी प्रार्थना की आमची ही वसुंधरा सदैव हरीत राहो.

 

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com