प्रारंभ

सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी शिर्डी रसयात्रेनंतर १९९७ साली श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा जाहीर केली. तब्बल चार दिवसांची ही रसयात्रा होती. श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीनेच ह्या रसयात्रेचे आयोजन केलेले होते. गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर १९९७ रोजी या यात्रेस प्रारंभ झाला. सर्व श्रद्धावान बापूंच्या समवेत सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरला पोहचले आणि तिथून मग एसटीने अक्कलकोटचा प्रवास सुरु झाला. या रसयात्रेचे अतिशय सुंदर नियोजन केले होते.

श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा दिवस दुसरा

दुसर्‍या दिवशी दुपारी स्वामींच्या समाधि मंदिरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सभागृहात श्री अमृतमंथन उपासनेला सुरुवात झाली. प्रथम ’ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नमः’ या मंत्राचे बारा वेळा पठण झाले. त्यानंतर श्रद्धावानांना चिकण मातीचा गोळा व केळीचे पान स्वामींच्या पादुका बनविण्याकरिता देण्यात आले, तसेच श्री साई समर्थ पादुकांवर वाहण्यासाठी अर्चनद्रव्य देण्यात आले. पादुका बनवत असतांना श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्राचे १०८ वेळा पठण झाले.

बापूही सर्व श्रद्धावानांच्या समवेत वरिल मंत्राचे पठण करीत होते. लोण्याच्या पादुकांवरही त्याचवेळी अभिषेक होत होता. नंतर सर्व श्रध्दावानांनी पूजन केलेल्या पादुका लोण्याच्या पादुकांवर अर्पण करण्यात आल्या व सर्व पादुका दुसऱ्या दिवशी विसर्जित करण्यात आल्या. सर्व श्रद्धावानांनी सद्गुरु श्री बापूंच्या बरोबर शिवगायत्री मंत्राचे १०८ वेळा पठण केले. यानंतर आरत्या म्हणण्यात आल्या व शेवटी सर्वांनी बापूंसमवेत आनंदाने गजर केला.

दिवस तिसरा

सकाळी अक्कलकोट दर्शनाकरिता सर्व निघाले. अक्कलकोटमधील सर्व स्थळांची माहिती देण्यात आली. अक्कलकोट दर्शनाचा क्रम बापूंनी आखून दिल्याप्रमाणेच होता. अक्कलकोट दर्शन झाल्यावर वटवृक्ष मंदिरात प्रथम महाभोग करण्यात आला. सर्व श्रद्धावान आधी स्वामींच्या मूळ समाधी मंदिरात गेले. ही समाधी चोळप्पाचे घरी आहे. तेथेच स्वामी ज्या गाईचे दूध प्राशन करत त्या गाईचीही समाधी आहे.

स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर सर्वाना जोशीबुवा मठात नेण्यात आले. इथे पाटावर उमटलेल्या स्वामींच्या पाउलांचे दर्शन झाले. तद्‌नंतर वटवृक्ष मंदिरात, जेथील वटवृक्षाखाली स्वामीनी तप साधना केली, त्या मंदिरात वटवृक्षाचे दर्शन घेऊन शेवटी बाळप्पा मठात नेण्यात आले. बाळप्पा मठात स्वामींनी अंतसमयी स्वतःच्या पादुका, दंड, रुद्राक्षमाळ बाळप्पाच्या स्वाधीन केल्या होत्या त्या ठेवल्या आहेत त्याचे दर्शन सर्व श्रद्धावानांनी घेतले. बाळाप्पा मठात महाभोग करण्यात आला. त्यानंतर बापूंच्या सान्निध्यात सत्संगास सुरुवात झाली.

दिवस चौथा

श्री दत्तगुरु उपासनेस सुरुवात झाली. त्यानंतर श्री दत्तगुरु मंत्राचा १०८ वेळा जप करण्यात आला. सर्वांना परत पेरुचा प्रसाद वाटण्यात आला व संध्याकाळी ठीक ५ वाजता परतीच्या प्रवासास सुरुवात झाली.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com