AniruddhaFoundation-Shree Venkatesh Saptakoti Jap

विठ्‌ठल आणि व्यंकटेश ही दोन्हीही महाविष्णूचीच रुपं! जवळपास ३०० वर्षांपूर्वी रामानुजाचार्यांनी ह्या महाविष्णुची व्यंकटेशाची उपासना एका अत्यंत वेगळ्या आणि सुंदर रीतीने केली. ‘ॐ व्यंकटेशाय नम:’ ह्या अष्टाक्षरी मंत्राने ‘सप्तकोटी अर्चनम्‌’ हा विधी करून ही उपासना त्यांनी पूर्णत्वास नेली.

हीच उपासना आपल्या लाडक्या सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी वैशाख शुद्ध विनायकी चतुर्थी दि. ७ मे २००० ते मोहिनी एकादशी दि. १४ मे २००० ह्या काळात आपल्या भक्तजनांकडून करून घेतली. श्री व्यंकटेश सप्तकोटी जपाची घोषणा झाल्याबरोबरच हजारो भक्तांचा समूह ह्या समारंभाच्या तयारीसाठी उद्युक्त झाला. श्री व्यंकटेशाची ७ फूट उंच मूर्ती बनविण्यात आली. मूर्ती तयार करत असतानाच ‘सप्तचक्रांची स्थापना’ मूर्तीमध्ये करण्यात आली होती. ४९ भक्तांकडून सातही चक्रांच्या विविध मंत्रांचे पठण, तसेच अन्य ७ भक्तांकडून विशिष्ट मंत्रांचे १ कोटी वेळा पठण करून घेऊन ही सप्तचक्रे सिद्ध करण्यात आली आणि मगच त्या चक्रांची स्थापना मूर्तीमध्ये केली.

१४०० भक्त, नियोजनानुसार त्यांच्या त्यांच्या नेमलेल्या स्थानांवर बसून, संपूर्ण दिवस ‘ॐ व्यंकटेशाय नम:’ हा मंत्रजप दररोज १२ तास ह्या प्रमाणे, सात दिवस अत्यंत भक्तिभावाने करत होते. सातव्या दिवशी सकाळीच ७ कोटी जप पूर्ण झाला. परंतु तरीही सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी रात्रीपर्यंत जप चालूच ठेवला. प्रत्यक्षात ह्या १४०० नियोजित जपकांबरोबर सातही दिवस लाखो भक्तांनी हा जप केला. त्यांची संख्या तर मोजताही येणार नाही अशी होती. अत्यंत आखीवरेखीव व शिस्तबद्ध पद्धतीने हा जप चालू होता. पुरुष भक्तांनी तिरुपतीच्या परंपरेनुसार केलेले केशवपन आणि तशी विशिष्ट वेशभूषा, अष्टगंधाने रेखांकित केलेले नाम ह्यामुळे वातावरण भक्तिभावाच्या अत्यंत सुंदर पातळीवर पोहोचले होते.

   

यावेळेस ‘पापमोचन कुंड’ नावाचा पवित्र कुंड तयार केला होता. त्याभोवती प्रत्येक श्रद्धावानाने डोक्यावर पवित्र इष्टिका घेऊन प्रदक्षिणा घालण्याचा उपक्रम होता. प्रदक्षिणेच्या वेळेस ‘गोविंदा, गोविंदा, जय व्यंकटेश गोपाला’ हा जप म्हणायचा होता. ह्या इष्टिकासुद्धा अत्यंत पवित्र अशा पद्मसरोवर, पुष्करिणी तीर्थ व पापमोचन सरोवर ह्या स्थानांवरील पवित्र मृत्तिका व पवित्र जल आणून त्यापासून बनविण्यात आल्या होत्या. प्रदक्षिणा करताना जपाच्या बरोबरीनेच मनात प्रार्थना करायची होती की, हे देवा, आजपर्यंत मी खूप चुकलो असेन, पण यापुढे माझ्या हातून कमीतकमी चुका घडोत’. ही प्रार्थना व जप करत श्रद्धावान कितीही वेळा प्रदक्षिणेचा लाभ घेऊ शकत होता. कारण सर्व भक्तांसाठी हा उपक्रम विनामूल्य होता. व्यंकटेशाच्या मूर्तीस प्रत्येक दिवशी विशिष्ट प्रकारचे अलंकारीक ‘महापुष्पम्‌ हार’ घालण्यात आले, त्यांची शोभा अवर्णनीय होती. अर्पण करण्यात आलेला महाभोगही खूप आगळा-वेगळा, भव्य होता. पहिल्या व पाचव्या दिवशी फळांचा, दुसर्‍या व सहाव्या दिवशी लाडवांचा, तिसर्‍या व सातव्या दिवशी चुरमुर्‍याच्या लाडवांचा, चौथ्या व आठव्या दिवशी दही-भात असा महाभोग अर्पण करण्यात आला. ह्या महाभोगाचा प्रसाद आणि भक्तांनी आणलेला प्रसाद अनाथ संस्थांमधील विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती व गरजू व्यक्तींना वाटण्यात आला.

महाभोग अर्पण करताना पुढील मंत्र प्रत्येक वेळी ५ वेळा म्हणण्यात आला.

रमया रमणाय व्यंकटेशाय मंगलम्‌।
सर्व लोकनिवासाय श्रीनिवासाय मंगल‍म्‌।

रोजच्या आरतीमध्ये संतश्रेष्ठ पुरंदरदास यांची कन्नडमधील रचना व तामिळनाडूमधील संत कवयित्री देवी अंडाळ यांची रचना श्रध्दावान अत्यंत भक्तीभावाने म्हणत होते. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ह्या रचनांचा अर्थ भक्तगणांना समजावून सांगितला. भक्तिप्रेमाने ओथंबलेल्या आणि भक्त परमेश्‍वरातील अप्रतिम प्रेमळ नातं दर्शविणार्‍या ह्या आरत्या खूपच लयबद्ध व सुंदर होत्या.

असा हा संपूर्ण उत्सव अतिशय पवित्र वातावरणात पार पडला. प्रत्येक श्रद्धावानाने अत्यंत उत्साहाने ह्या उत्सवात सहभाग घेतला. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ह्या उत्सवाद्वारे सर्व भक्तांना चुका सुधारण्याची आणि पापमुक्तीची पवित्र संधी दिली. श्री व्यंकटेशाच्या अतिशय रसाळ, सुमधूर, उत्कट भक्तिपूर्ण आरत्या भक्तांच्या मनावर गारुड करणार्‍याच होत्या. प्रत्येक भक्त ह्या उत्सवातून एक महत्त्वाची गोष्ट शिकला की, जे सद्गुरुंना आवडत नाही ते सर्व भक्ताने सोडून दिले पाहिजे आणि आत्यंतिक प्रेम, संपूर्ण विश्‍वास आणि शारण्य सद्गुरुंना अर्पण केले पाहिजे.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com