साई निवास वास्तूचा ऐतिहासिक वारसा –

श्रीसाईसच्चरित चरित्रकार श्री हेमाडपंत म्हणजेच कै. गोविंदराव (अण्णासाहेब) रघुनाथ दाभोळकर यांचे वांद्रे येथील निवासस्थान. १९०९ साली श्री हेमाडपंत श्रीक्षेत्र शिर्डी येथील श्री सदगुरु साईबाबांच्या दर्शनास आले. पहिल्याच भेटीत श्रीसाईनाथांची धूळभेट घेऊन ते कायमचे श्रीसाईनाथांचे झाले. त्यांच्या वांद्रे येथील वास्तूला त्यांनी “साई निवास” हे नाव दिले. जिथे साईंचा निवास कायम आहे अशी वास्तू. जी वास्तू केवळ साईंची आहे ते म्हणजे साई निवास. आज ह्या वास्तूला १०० हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आजही ‘साई निवास’ सर्व साईभक्तांना साईभक्ती परंपरेची साक्ष देत दिमाखात उभे आहे. या वास्तूचा उल्लेख श्रीसाईसच्चरित ग्रंथात तर येतोच पण ह्याच साईनिवासामध्ये हा अपौरुषेय ग्रंथ लिहून पूर्ण झालेला आहे.

साई निवास साई व बापूंमधील सेतू –

या साई निवासमध्ये डॉ. अनिरुद्ध जोशींचे सततचे येणे जाणे होते. हेमाडपंतांची तिसरी व चौथी पिढी या साई निवासची सगळी जबाबदारी पार पाडत होते. हेमाडपंतांचे नातू सद्यपिपा आप्पासाहेब दाभोळकर आणि त्यांच्या धर्मपत्नी मीनावैनी यांचा डॉ. जोशी यांच्याशी स्नेह वाढला होता. २८ मे १९९६ रोजी त्यांनी सहज गप्पा मारताना श्रीसाईबाबांनी हेमाडपंतांना दिलेल्या तीन वस्तू (जपमाळ, त्रिशूळ आणि शाळीग्राम) मागितल्या. हे गुपित केवळ दाभोळकर दांपत्यांना माहित होतं आणि तीन पिढ्या जपलेलं होतं. साईनाथांनी हेमाडपंतांना सांगितले होते, “मी या तीन गोष्टी स्वतः मागेन”. त्याप्रमाणेच कुणालाही माहीत नसलेल्या ह्या तीन गोष्टी डॉ. जोशींनी मागितल्यावर विनासंकोच अप्पासाहेबांनी त्यांच्या हाती सूपूर्द केल्या. त्याच वेळी दाभोळकर दांपत्यांनी उदंड नमस्कार केला व नमस्कार करताना वर पाहिले असता दोघांनाही गुडघ्यापर्यंत ८० वर्षांचे साईनाथ व गुडघ्याच्या खाली काळी पॅन्ट असे दर्शन श्रीअनिरुद्धांच्या जागी झाले. हा दिवस होता २८ मे १९९६. हा दिवस बापूंचा प्रगटीकरण दिवस म्हणून समजला जातो आणि हे प्रगटीकरण साई निवासमध्येच झालेले आहे. १९२९ साली जिथे “तयाच्या चरणी अमितपूर्वक। लेखणी मस्तक अर्पितो” असं म्हणत साईसच्चरिताची शेवटची ओळ लिहित हेमाडपंतांनी आपला देह ठेवला त्याच साई निवासमध्ये १९९६ पासून एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली.

साई निवासमध्ये पाहण्यासारखे –

साई निवास मध्ये होळी पौर्णिमेला आलेली बाबांच्या तसबीरीची हुबेहुब प्रतिकृती श्रीअनिरुद्धांनी १९९७ साली करुन घेतली. ही ध्यानमूर्ती अतिशय विलोभनिय असून प्रत्येक जण त्यासमोर बसून ध्यान करु शकतो. तसेच या मूळ तसबीरीचेही दर्शन घेऊ शकतो. ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नमः। हा जप करु शकतो. हेमाडपंतांनी ज्या डेस्कवर बसून श्रीसाईसच्चरित ग्रंथ लिहला तो डेस्क इथे पाहण्यास मिळतो. त्याचेही दर्शन घेता येते. साई निवासमध्ये साईंच्या अस्तित्वाचा भास ठाई ठाई होतो.

तुलसी वृंदावन –

साई निवासच्या इमारती मागील रिकाम्या जागेत कै. मीनावहिनींच्या स्मृतीप्रित्यर्थ तुलसी वृंदावन उभारलेले आहे. श्रीअनिरुद्ध बापूंच्या पूर्णाकृती प्रतिमेचं व पादुकांचे दर्शन आणि तुलसी वृंदावनात प्रदक्षिणा यांचा लाभ आलेल्या भक्तांना मिळतो. तसेच ह्या ठिकाणी आपल्याला सुदिप प्रज्वलित करता येतो.

 साई निवासमधील उत्सव – 

१. होळीपौर्णिमा – श्रीसाईसच्चरितातील ४० अध्यायामधील कथेप्रमाणे याच दिवशी साईबाबांचे साईनिवासमध्ये तसबिरीच्या रुपात आगमन झाले. त्यामुळे होळीपौर्णिमा हा साईनिवासमधील मुख्य उत्सव आहे. २०१७ मध्ये ह्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे साईनिवासमध्ये शताब्दीपूर्तीचा अध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात आला होता. 

२. श्रावण महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात साईसच्चरिताच्या ११ पोथ्यांचे २४ तास रात्रौ ९ ते दुसर्‍या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत पारायण चालते. 

३. अश्विन महिन्यातील नवरात्रीमध्ये सदगुरु नवरात्री साजरी केली जाते. या उत्सवात हेमाडपंतांचा नित्य जप “साई समर्थ’ हा बाबांच्या मूळ तसबिरीसमोर बसून श्रद्धावान करतात. 

४ आषाढी एकादशीचा कार्यक्रम साई निवास मधील तुलसी वृंदावनाच्या जागेत केला जातो. 

५. साई निवास मध्ये रोज संध्या ७ वाजता आरती होते आणि आरतीनंतर एक दिवस हरिपाठ व एक दिवस शिवपाठ घेतला जातो. दर शनिवारी सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंची उपासना होते व उपासनेनंतर अनिरुद्ध पाठ घेतला जातो.

साई निवासचा पत्ता व वेळ –

साई निवास ही वास्तू मुंबईमध्ये वांद्रे स्टेशनपासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे.
पत्ता- साई निवास, सेंट मार्टिन रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई ४००५०

दर्शनाची वेळ

सकाळी ८.०० ते दु्पारी १.०० पर्यंत व सायंकाळी ४.०० ते ८.००

गुरुवारी सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com